Pooja Chavan Suicide Case | घटनेनंतर ‘गायब’ झालेल्या अरुणला पोलिसांनी ताब्यात घेतले !

305
Pooja Chavan Suicide Case

पुणे : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात (Pooja Chavan Suicide Case) पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. गेल्या दहा दिवसांपासून गायब असलेला अरुण राठोडला (Arun Rathod) पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

पोलिसांनी कमालीची गुप्तता पाळत अरुण राठोडला ताब्यात घेतले. आता याप्रकरणात त्याची चौकशी केली जाईल. अरुण राठोडची चौकशी थेट पोलीस आयुक्तालयात होण्याची शक्यता आहे.

टिकटॉक स्टार पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी  पुणे पोलिसांनी आज, अरुण राठोड याला ताब्यात घेतले आहे. कारण व्हायरल झालेल्या एक-दोन नव्हे तर तब्बल 12 ऑडिओ क्लिपमध्ये अरुण नावाचा उल्लेख होता.

पूजा चव्हाणच्या आत्महत्येच्या घटनेनंतर अरुण राठोड हा बेपत्ता झाला होता. अखेर पुणे पोलिसांनी अरुणला ताब्यात घेतले असून, त्याची चौकशी केली जाणार असल्याचे कळते.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण उघडकीस आल्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठे वादळ उठले आहे. या प्रकरणात राज्यातील मंत्र्याचे नाव आले होते. विरोधी पक्षांनी या प्रकरणाच्या चौकशीची मागणीही केली होती. 

संबंधित मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी केली होती. या आत्महत्या प्रकरणात अरुण राठोड नावाच्या व्यक्तीचे नाव समोर आले होते. सोशल मीडियावर त्याच्या आणि कथित मंत्र्यांमधील संवादाच्या ध्वनिफित व्हायरल झाल्या होत्या.

पूजा अरुण राठोडचा गर्भपात

दरम्यान, काल पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आता नवा ट्विस्ट आला होता. पूजा अरुण राठोड नावाच्या तरुणीचा यवतमाळच्या रुग्णालयात गर्भपात झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली.

त्यामुळे ही पूजा अरुण राठोड कोण? पूजा अरुण राठोड हिचा पूजा चव्हाणशी काय संबंध? पूजा अरुण राठोड हीच पूजा चव्हाण आहे का? कथित मंत्र्याने आपल्या जिल्ह्यातील रुग्णालयात हा गर्भपात घडवून आणलाय का? असे अनेक प्रश्न उपस्थित राहिले.

रिपोर्टमध्ये काय?

वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, यवतमाळचा हा रिपोर्ट आहे. या रिपोर्टवर इंग्रजीत ड्राफ्ट कॉपी असं लिहिलं असून त्या खाली शॉर्ट केस रेकॉर्ड असं लिहिलं आहे.

रिपोर्टवर प्रिंट दिनांक 17 फेब्रुवारी 2021 लिहिलं आहे. वेळ दुपारी 1.47 वाजताची लिहिली आहे. तर सेव्हड तारीख 12 फेब्रुवारी 2021 लिहिली असून वेळ संध्याकाळ 7.29 वाजताची लिहिली आहे.

तसेच 6 फेब्रुवारी 2021 रोजी दुपारी 4 वाजून 34 मिनिटांनी रुग्णालयात भरती केल्याचं त्यात नमूद करण्यात आलं आहे. म्हणजे पूजा अरुण राठोड या तरुणीवर 6 फेब्रुवारी रोजी उपचार झाल्याचं स्पष्ट होत आहे.

वॉर्ड नंबर 3 मध्ये या महिलेला दाखल करण्यात आलं असून युनिट नंबर 2 मध्ये ही तरुणी उपचार घेत असल्याचंही त्यावर नमूद करण्यात आलं आहे.

डिस्क्रिप्शनमध्ये कोणत्याही गुंतागुंतीशिवाय या महिलेचा गर्भपात करण्यात आल्याचंही त्यात स्पष्टपणे लिहिण्यात आलं आहे.

पोस्टमार्टम अहवाल काय म्हणतो?

पोलिसांच्या पंचनाम्यानुसार पूजाने नैराश्यातून आत्महत्या केली आहे. तर पूजाच्या पोस्टमार्टम रिपोर्टनुसार तिच्या डोक्याला जबर मार लागल्याने तिचा मृत्यू झाला आहे.

पोलिसांनी या प्रकरणाची आकस्मिक मृत्यू अशी नोंद करून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी पंचनाम्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पूजाने आत्महत्या केल्याचं म्हटलेलं नाही.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण काय?

मूळ परळीच्या पूजा चव्हाणचा पुण्यातील राहत्या घरातून पडून 7 फेब्रुवारीला मृत्यू झाला. पूजाने आत्महत्या केल्याचा प्राथमिक संशय आहे. स्पोकन इंग्लिश क्लासेससाठी ती भावासोबत पुण्यात रहात होती.

तिने तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केल्याचा आरोप आहे. त्यानंतर आत्महत्येशी विदर्भातील एका मंत्र्याचा संबंध असल्याची चर्चा सुरु झाली होती. भाजपने रितसर तक्रार दाखल केली.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी थेट पोलीस आयुक्तांना पत्र लिहून, चौकशीची मागणी केली. इतकं सगळं होत असताना, पूजा चव्हाण आणि कथित मंत्र्यांची ऑडिओ क्लिप समोर आली.

त्यामुळे संजय राठोड अडचणीत आले. भाजपाने या प्रकरणी राजकारण केल्याचा आरोप होऊ लागला असला तरी अरुणला अटक झाल्याने या प्रकरणातील सत्य बाहेर येऊ शकते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here