उदगीर : तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने रुग्णालयात उपचारासाठी रूग्णाना बेड उपलब्ध होत नाहीत. त्यातच गंभीर असलेल्या रुग्णांना ऑक्सिजन, उपचार, बेड मिळणे कठीण झाले आहे.
एका कोरोना बाधित गंभीर असलेली 45 वर्षीय महिला वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रयत्न व यशस्वी उपचारानंतर कोरोना मुक्त झाल्यानंतर आनंदी पतीने आभार व्यक्त करण्यासाठी डॉक्टर सर्व कर्मचाऱ्यांचा सत्कार केला आहे.
एकीकडे कोरोनामुळे अनेक बळी जात असताना वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्न व उपचारांमुळे आपली आयुष्याची जोडीदार असलेली पत्नी कोरोना मुक्त झाल्याने प्रथम ईश्वराचे उपकार मानत त्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संबंधित महिलेच्या पतीने शाल व पुष्पहार देऊन सत्कार करत ऋण व्यक्त केले आहेत.
उदगीर शहरातील आझाद नगर भागात राहणाऱ्या दायमी कौसर फातेमा अजिमोद्दिन (45 ) या कोरोना बाधित होऊन उपचारासाठी येथील शासकीय कोविड हेल्थ सेंटर मध्ये दाखल झाल्या होत्या.
त्यांच्या शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण 65 पर्यंत कमी झाले होते. त्यामुळे त्यांना ऑक्सिजनची कमतरता भासत होती अशा गंभीर परिस्थितीत कोविड हेल्थ सेंटरचे नोडल अधिकारी डॉ. शशिकांत डांगे यांच्या नेतृत्वाखाली वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या गंभीर रुग्णाला धीर देत यशस्वीरित्या उपचार केले.
सतत दहा दिवसाच्या यशस्वी उपचारानंतर दायमी कौसर फातेमा अजिमोदिन कोरना मुक्त झाल्या. या निमित्ताने अजीम दायमी यांनी covid-19 हेल्थ सेंटरचे नोडल अधिकारी डॉ. शशिकांत डांगे, वैद्यकीय अधिकारी डॉ.आदराळे, डॉ. नितीन रेकुलवाड, डॉ. मयुर कल्याने, डाॅ. विद्या सोनकांबळे, डॉ. सुवर्णमाला सुकुमार, आरोग्य कर्मचारी सचिन राजमाने, संतोष भारती, निलेश गायकवाड, पुजा गायकवाड, पुजा बनसोडे, अश्विनी शिंदे, अश्विनी गायकवाड व राजकुमार जाधव यांचा शाल व पुष्पहार देऊन सत्कार करीत त्यांच्या कार्याला सलाम केला. यावेळी नवनाथ गायकवाड, कैलास पाटील आदी उपस्थित होते.