देशात 21 दिवसांच्या कडक निर्बंधांची शक्यता | लष्कर आणि निमलष्करी दलांनाही सज्जतेचे आदेश

964

केंद्राची तयारी पूर्ण, लष्कराला दिला सज्जतेचा आदेश

नवी दिल्ली : देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशव्यापी टाळेबंदीबाबत विचार केला जावा, अशी सूचना सर्वोच्च न्यायालयाने केल्यानंतर, केंद्र सरकारही आता त्याच दिशेने पावले उचलत असल्याचे संकेत आहेत.

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी किमान 21 दिवसांचे कडक देशव्यापी निर्बंध लावण्याच्या प्रस्तावावर सरकार गंभीरपणे विचार करीत असून, यासाठी लष्कर आणि निमलष्करी दलांनाही सज्जतेचे आदेश दिले आहेत.

टाळेबंदीसदृश्य असेच हे निर्बंध राहणार असल्याने, या काळात निर्बंध व्यवस्थापनाचे अधिकार लष्कराला देण्यात येण्याची शक्यता आहे, अशी माहिती या घडामोडींशी संबंधित सूत्रांनी दिली.

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत देशात हाहाकार झाला आहे. दररोज तीन लाखांवर बाधितांची भर पडत आहे. या लाटेवर नियंत्रण मिळविण्यासाठी सरकारने सर्वच प्रयत्न केले पण त्यात पाहिजे तसे यश आले नाही. मृत्यूचा आकडाही सातत्याने वाढत आहे.

त्यातच आज सर्वोच्च न्यायालयाने देशव्यापी टाळेबंदी शक्य आहे का, यावर विचार करण्याची सूचना केंद्र आणि राज्यांना केली. याच पृष्ठभूमीवर टाळेबंदीसदृश्य कडक निर्बंध लावण्याचा प्रस्ताव केंद्रापुढे आला असल्याचे सूत्रांनी सांगितले.

काही राज्यांमध्ये टाळेबंदी जाहीर करण्यात आली असून महाराष्ट्रासह काही राज्यांनी कठोर निर्बंध लादले आहेत. सध्याच्या स्थितीत टाळेबंदी किंवा कठोर निर्बंधांचे अधिकार राज्यांकडे असल्याने, केंद्र सरकार सर्व राज्यांचे मत जाणून घेणार आहे.

कोरोनाची दुसरी लाट अतिशय भयानक सिद्ध झाल्याने, रुग्णालयांमध्ये खाटा, प्राणवायू आणि अत्यावश्यक सुविधाही कमी पडत आहेत. ही साखळी तोडणे आवश्यक असल्याने, केंद्र सरकार लवकरच कठोर निर्णय घेण्याची शक्यता आहे.

तिसरी लाट आणखी भीषण असण्याची शक्यता

कोरोनाची दुसरी लाट मे महिन्याच्या अखेरपर्यंत ओसरण्याची शक्यता असली, तरी त्यानंतर येणारी तिसरी लाट त्याही पेक्षा भयानक असण्याचा इशारा जगभरातील आरोग्य तज्ज्ञांनी दिलेला आहे.

कोरोनाचे जे नवे प्रकार समोर येत आहेत, ते सध्याच्या प्रकारांपेक्षा एक हजार पटीने जास्त घातक असल्याचेही तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे कोरोनाची तिसरी लाट थोपविण्यासाठी कठोर उपायांची आणि निर्णायक लढ्याची गरज तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here