देशात झपाट्याने कोरोनाचा संसर्ग पसरत आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह बहुतांश राज्य लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर आहेत.
या पार्श्वभूमीवर राज्यातील 98 लाख 27 हजार शेतकऱ्यांना एप्रिल ते जुलै या काळातील प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा दुसरा हप्ता 30 एप्रिलपर्यंत वाटप केला जाणार असल्याची माहिती विश्वसनिय सूत्रांनी दिली.
शेतकऱ्यांची यादी केंद्र सरकारला पीएम-किसान पोर्टलवर अपलोड केली असून त्याची पडताळणी होऊन डीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रत्येकी 2 हजारांचा सन्मान निधी दिला जाणार आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेनुसार शेतकऱ्यांना वर्षातून 3 वेळा प्रत्येकी 2 हजारांप्रमाणे 6 हजाराची मदत केली जाते. राज्यातील 1 कोटी दोन लाख शेतकऱ्यांची यादी केंद्राला पाठवली आहे.
डिसेंबर ते मार्च या काळात पहिला तर एप्रिल ते जुलैदरम्यान दुसरा आणि ऑगस्ट ते नोव्हेंबर या कालावधीत तिसरा हप्ता दिला जातो. केंद्र सरकारच्या निकषांनुसार अल्प व अत्यल्प भुधारक शेतकऱ्यांनाच दरवर्षी 6 हजारांचा सन्मान निधी दिला जातो.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधीसाठी
कोण पात्र नाही!
पती-पत्नी आणि त्यांचा 18 वर्षांवरील मुलगा यांचे एकूण क्षेत्र 2 हेक्टरपर्यंत असल्यास ते या योजनेसाठी पात्र नाहीत. तसेच जे संवैधानिक पदावर (आजी-माजी) आहेत, माजी जि. प.अध्यक्ष, माजी आमदार, खासदार आदी या योजनेसाठी अपात्र आहेत.
तसेच गेल्या वर्षी आयकर भरलेले शेतकरी ज्यांचे निवृत्तीवेतन दरमहा 10 हजार अथवा त्याहून अधिक आहे, असे शेतकरी, नोंदणीकृत व्यावसायिक डॉक्टर, वकिल, अभियंता, सनदी लेखापाल, वास्तूशास्त्रज्ञ यांनाही या योजनेतून वगळले आहे.