कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने लातूर जिल्ह्यातील खाजगी बाल रुग्णालयांनी सज्जता ठेवावी : जिल्हाधिकारी

472

लातूर : सद्यस्थितीत कोरोनाची दुसरी लाट सुरू असून लातूर जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची दैनंदिन संख्या 400 पेक्षा खाली येत आहे.

मात्र आरोग्य विभागाने दिलेल्या निर्देशानुसार पुढील काळात covid-19 ची तिसरी लाट येण्याची शक्यता असून त्या लाटेमध्ये 18 वर्षे खालील मुले बाधित होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

त्या अनुषंगाने लातूर जिल्ह्यातील सर्व खाजगी बाल रुग्णालयांनी त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या बेडची संख्या तसेच इतर आनुषंगिक साहित्याची संख्या दुप्पट करून या तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी सज्जता ठेवून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित लातूर जिल्हा covid-19 संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने आय. एम. ए. व जिल्ह्यातील खाजगी बालरोग तज्ञ सोबतच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी पृथ्वीराज बोलत होते.

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, परिविक्षाधीन सहाय्यक जिल्हाधिकारी जिथीन रहमान, उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. लक्ष्मण देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, आय.एम.ए.चे अध्यक्ष डॉ. कुलकर्णी, बालरोग तज्ञ संदिपान साबदे, डॉक्टर मुंदडा, डॉ. विनोद कंदापुरे, नाक कान घसा तज्ञ डॉक्टर शाम सोमानी, डॉक्टर काळगे, डॉक्टर राहुल लटूरीया व अन्य मान्यवर उपस्थित होते.

जिल्हाधिकारी पृथ्वीराज पुढे म्हणाले की, कोविड-19 च्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने लातूर जिल्हा प्रशासनामार्फत पूर्वतयारी करण्यात येत असून त्या अनुषंगाने खाजगी बाल रुग्णालय यांनी प्रशासनाला सहकार्य करावे व या लाटेत बाधित होणाऱ्या मुलांना तात्काळ उपचार मिळावेत यासाठी सर्व अनुषंगिक व्यवस्था आपल्या रूग्णालयात ठेवावी. तसेच यावरील उपचारासाठी आवश्यक असणार्‍या औषधांची यादी प्रशासनाला सादर करावी. सर्व औषधी उपलब्ध करून ठेवण्यात येतील असे त्यांनी सांगितले.

खासगी बाल रुग्णालय कडे असलेल्या एकूण 590 बेड संख्या ही रुग्णालयांनी किमान दुप्पट करावी. तसेच व्हेंटिलेटर, बायप व सर्व बेड ऑक्सिजनेट करावेत. विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेमार्फत ही लहान मुलांसाठी 2 कोविड केअर सेंटर ची व्यवस्था करण्यात येत आहे.

जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी जिल्ह्यातील सर्व शासकीय/ खाजगी डॉक्टर्स, नर्स व इतर आवश्यक आरोग्य कर्मचाऱ्यांना तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने चांगले व दर्जेदार प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी पृथ्वीराज यांनी दिले. Covid-19 ची संभाव्य तिसरी लाट लहान मुलांसाठी धोकादायक असल्याने ती लाट थोपवण्यासाठी सर्व बालरोग तज्ञ यांना घेऊन जिल्हास्तरीय टास्क फोर्स समितीची स्थापना करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.

सद्यस्थितीत जिल्ह्यात दुसरी लाट सुरू असून यामध्ये कोविड उपचार घेतल्यानंतर रुग्णामध्ये म्युकरमायसोसिस या आजाराची लक्षणे दिसून येत आहेत. तरी जिल्ह्यातील सर्व खाजगी रुग्णालयांनी त्यांच्याकडे या आजाराचे उपचार घेण्यासाठी येत असलेल्या रुग्णांची माहिती प्रशासनाकडून देण्यात आलेल्या प्रपत्रात तात्काळ भरुन सादर करावी. जेणेकरून संबंधित रुग्णालयांना म्युकरमायसोसिस आजारावरील औषधांच्या न्यायिक पद्धतीने पुरवठा करणे प्रशासनाला सोयीचे होणार आहे, असे जिल्हाधिकारी पृथ्वीराज यांनी सांगितले.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी गोयल यांनीही संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने स्थापन करण्यात येणाऱ्या टास्क फोर्स बाबत मार्गदर्शन केले. त्याप्रमाणेच उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक यांनी औषधी वितरणाबाबत ची माहिती बैठकीत दिली.

या वेळी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख,बाल रोग तज्ञ संदिपान साबदे, एमआयटीचे नाक कान घसा तज्ञ डॉ. शाम सोमानी, आयएमएच्या अध्यक्षा डॉक्टर कुलकर्णी, डॉ. मुंदडा यांनी तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत तसेच ही लाट आल्यानंतर त्यावरील औषधी कोणत्या वापराव्यात याबाबतची माहिती प्रशासनाला दिली. तसेच या संभाव्य तिसर्‍या लाटेत आयएमए व सर्व खाजगी बाल रुग्णालये प्रशासनाला सर्वोतपरी सहकार्य करतील असे आश्वासन उपस्थित डॉक्टर्सनी दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here