खाजगी डॉक्टरांनी शासकीय रुग्णालयात एक दिवस स्वेच्छेने सेवा द्यावी : जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.

641

लातूर : जिल्हयात कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गाला आळा घालण्यासाठी खाजगी डॉक्टरांनीही पूर्ण क्षमतेने शासनास मदत करण्याची गरज निर्माण झाली आहे.

त्यामुळे जिल्ह्यातील सर्व खाजगी डॉक्टरांनी शासकीय रुग्णालयास एक दिवस स्वेच्छेने सेवा द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी आज येथे केले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहामध्ये आयोजित जिल्हयातील वैद्यकीय संघटना आणि अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. लक्ष्मण देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे आणि विलासराव देशमुख विज्ञान संस्था आणि वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.सुधीर देशमुख, आयएमएच्या अध्यक्षा डॉ.काळे, निमा (NIMA) चे अध्यक्ष, आयडीएचे अध्यक्ष उपस्थित होते.

जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी उपस्थित वैद्यकीय संस्थेतील अध्यक्ष व संस्थेतील अधिकाऱ्यांकडून त्यांच्या असोसिएशनची माहिती घेतली. सध्याच्या जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

त्यामुळे रुग्णालयात बेड आणि औषधांचे नियोजन करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. परंतु या काळात शासकीय कोव्हिड केअर सेंटर्स मध्ये डॉक्टरांची संख्या कमी पडते आहे.

त्यामुळे खाजगी डॉक्टरांनी या सेंटर्समध्ये एक दिवस स्वेच्छेने सेवा देणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे लातूर जिल्हयातील इंडियन मेडिकल असोसिएशन, नॅशनल इंडिग्रेटेड मेडिकल असोसीएशन आणि इंडियन डेंटल असोसीएशनच्या डॉक्टरांनी शासकीय कोविड केअर सेंटर्समध्ये स्वेच्छेने आपली सेवा द्यावी, असेही आवाहन त्यांनी यावेळी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here