लातूर : जिल्हयात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणावर वाढलेला आहे. रुग्णांना ऑक्सिजन, औषधे आणि खाट उपलब्ध होणे कठीण झाले आहे.
या विपरीत परिस्थितीत रुग्णालये आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांनी या महामारीवर मात करण्यासाठी एकमेकांशी समन्वयात राहुन काम करण्याची आवश्यकता आहे असे प्रतिपादन राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केले.
आज उदगीर येथील पशुवैद्यकीय महाविद्यालय येथे उदगीर व जळकोट तालुक्यातील कोव्हिड-19 सद्य-स्थितीचा आढावा व उपाय योजना संदर्भात आयोजित बैठकी प्रसंगी बोलत होते.
यावेळी उपविभागीय अधिकारी प्रविण मेंगशेट्टी, जिल्हा अतिरिक्त शल्यचिकिस्तक डॉ. हरीदास, तहसिलदार राजेश्वर गोरे, नगरपालिका मुख्य अधिकारी भारत राठोड, डॉ. दत्ता पवार, डॉ. शशिकांत देशपांडे, डॉ. प्रशांत चोले, डॉ.माधव चंबुले, सुधीर जगताप, डॉ. बिराजदार, पंचायत समितीचे सभापती प्रा. शिवाजी मुळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस बस्वराज पाटील नागराळकर, उदगीर काँग्रेसचे तालुका अध्यक्ष कल्याण पाटील, शिवसेना नेते चंद्रकांत टिंगटोल उपसिथत होते.
उदगीर व जळकोट तालुक्यातील लॉकडाऊन विषयी माहिती घेऊन यात येणाऱ्या सर्व अडचणीचे निवारण करण्या संबंधी आवश्यक सूचना केल्या.
ते म्हणाले ऑक्सीजन आणि रेमडेसीवीर बाबत खाजगी आणि शासकीय रुग्णालयांनी चांगले समन्वय ठेवणे आवश्यक आहे. तहसीलदारांनी यासाठी एक विशेष अधिकारी नियुक्त करावा तसेच उदगीर येथे रुग्णांना बेड उपलब्ध व्हावा यासाठी एक हेल्पलाईन नंबर ही कार्यान्वित करावा जेणे करुन रुग्णांच्या नातेवाईकांची गैरसोय होणार नाही.
सर्व कोरोना सेंटर्स, हॉस्पीटल्स आणि डेडिकेटेड हॉस्पीटल येथे विद्युत सेवा सुरळीत ठेवावी. फायर ऑडिट करुन घ्यावेत, कोणत्याही कारणास्तव रुग्णांची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्यावी असे निर्देश उपस्थित डॉक्टरांना व प्रशासकीय अधिकाऱ्यांना देण्यात आले.
शासकीय आणि खाजगी डॉक्टरांच्या समन्वयाचे महत्व विषद करतांना राज्यमंत्री म्हणाले की, कोरोना काळात आपल्या जीवाची पर्वा न करता अविरत काम करणारे सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रुग्णांच्या आरोग्य व आयुष्याला प्राधान्य देऊन एकमेकांच्या समन्वयात राहण्या बरोबरच सुसंवाद राखणेही आवश्यक आहे.
सर्व खाजगी डॉक्टरांनी ऑक्सीजन व रेमडेसिवीर बाबत शासनाच्या आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करणे अपेक्षित आहे. आवश्यक असेल तेंव्हाच रुग्णांना या औषधी व ऑक्सीजन देण्यात यावे.
तसेच खाजगी दवाखान्यात उपलब्ध असलेले रिकामे ऑक्सीजन सिलेंडर त्वरित परत करावे आणि वाढती रुग्ण्संख्या लक्षात घेता जंबो सिलेंडर खरेदी करावे असा सल्लाही राज्यमंत्री बनसोडे यांनी यावेळी दिला.