पुणे : पूजा चव्हाण Tik Tok Star च्या आत्महत्येचे प्रकरण अजून ताजे असतानाच पुण्यातचं अजून एका Tik Tok Star ने आत्महत्या केली आहे.
सोशल मीडियावरच्या आभासी जगात स्टार असलेल्या समीर गायकवाड (Tik Tok Star Sameer Gaikwad) याने रविवारी संध्याकाळी आत्महत्या केली.
पुण्यातल्या राहत्या घरी गळफास घेऊन त्याने आपली जीवनयात्रा संपवली. प्रेमकरणातून त्याने आत्महत्या केल्याची चर्चा आहे परंतु ठोस कारण अजून समोर येऊ शकलेलं नाही.
शहरातील वाघोलीच्या केसनंद फाट्यावरील मिकासा सोसायटीत टिकटॉक स्टार समीर मनीष गायकवाड (वय 22) राहतो.
आपल्या राहत्या घरी रविवारी संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास त्याने पंख्याला साडीच्या मदतीने गळफास लावून आपल्या आयुष्याचा दुर्वैवी शेवट केला.
“समीरने कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली, हे आणखी समजू शकलेलं नाही. पोलीस सर्व अंगाने तपास करत आहेत”, अशी माहिती लोणीकंद पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी समीरचा चुलत भाऊ प्रफुल्ल गायकवाड याने लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
समीरने गळफास लावल्याचं समजताच परिसरात धांदल उडाली. याचदरम्यान त्याला जवळच्या रुग्णालायात दाखल केलं गेलं. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. अगदी काही क्षणात त्याने मृत्यूला कवटाळलं होतं.
कोण होता समीर गायकवाड?
समीर गायकवाड हा Tik Tok या App वर अतिशय लोकप्रिय होता. 22 वर्षीय समीरला हजारो लोक Tik Tok वर फॉलो करायचे. अनेक प्रकारचे विषय हाताळत व्हिडीओ तयार करुन तो Tik tok वर अपलोड करायचा.
त्याचे व्हिडीओ नेटकऱ्यांच्याही प्रचंड पसंतीस उतरायचे. याशिवाय समीर गायकवाडच्या इन्स्टावरही तुफान फॉलोअर्स होते. इन्स्टावर त्याच्या फॉलोअर्सची संख्या 2 लाख 80 हजार इतकी आहे.