मुंबई: शर्जील उस्मानी पाताळात गेला तरी त्याला सोडणार नाही, असं वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले होते.
आता ते पाताळात जाऊन शर्जीलला कधी पकडून आणणार, असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. शर्जील उस्मानी ही उत्तर प्रदेशातील घाण आहे, आमच्याकडील नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी सुनावले.
बुधवारी राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान मुख्यमंत्री ठाकरे बोलत होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरून भाजपला लक्ष्य केले. भाजपने आम्हाला हिंदुत्त्व शिकवू नये, तुमची तेवढी पात्रता नाही.
बाबरी मशीद पडल्यानंतर सगळे येरेगबाळे पळून गेले, पण बाळासाहेब ठाकरे एकटे ठामपणे उभे राहिले. केंद्रात सहा वर्ष भाजपची सत्ता असताना राम मंदिराच्या निर्माणासाठी भाजपने कायदा केला नाही.
शेवटी सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला. त्यानंतर आता भाजप राम मंदिराच्या नावाने वर्गणी गोळा करत आहे. मात्र, या सगळ्यानंतर राम मंदिराचे शिल्पकार म्हणून भाजपलाच आपले नाव हवे, असा टोला उद्धव ठाकरे यांनी हाणला.
सुधीरभाऊंना पाहून नटसम्राट आठवला
विरोधकांची चर्चा ऐकून नटसम्राट पाहिल्याचा भास झाल्याचा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगावला. मुनगंटीवारांच्या भाषणादरम्यान नटसम्राटमधील मी अथ्थेलो, मी आहे हॅम्लेट असा भास झाला. पण शेवटी कुणी किंमत देतं का किंमत अशी स्थिती असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले.
मुनगंटीवार यांच्या भाषणादरम्यान देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांना भीती वाटत होती, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला. त्याचबरोबर मी आणि मुनगंटीवार हाडाचे कलाकार आहोत. पण कलेला राजकारणात वाव नाही.
मात्र, मुनगंटीवार यांना संधी मिळाली की त्यांची कला उफाळून येते. पण सुधीरभाऊ तुमच्यातला कलाकार मारु नका, अशा खोचक सल्लाही मुख्यमंत्र्यांनी मुनगंटीवारांना दिला आहे.
संभाजीनगरच्या मुद्द्यावरुन भाजपला टोला
औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याच्या मुद्द्यावरुन भाजप आणि शिवसेनेत जोरदार राजकारण पाहायला मिळत आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांनी संभाजीनगरच्या मुद्द्यावरुन शिवसेनेवर आणि पर्यायानं मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती.
त्याला आज मुख्यमंत्र्यांनी प्रत्युत्तर दिले. इतकच नाही तर जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव दिल्यावरुनही मुख्यमंत्र्यांनी भाजपवर शरसंधान साधले.
वल्लभाई पटेल यांचे नाव हटवून नरेंद्र मोदींचे नाव त्या स्टेडियमला दिले आहे. आता त्या स्टेडियमवर भारत प्रत्येक मॅच जिंकणार, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी लगावला.