Rajneta News Headlines | एक नजर महत्वाच्या बातम्यांवर

201

• भारतीय अर्थव्यवस्था पुढच्या दहा वर्षांत जगात तिसरी मोठी अर्थव्यवस्था – सीईआरबीचा दावा.

• पायाभूत सुविधा क्षेत्राच्या विकासासाठी सरकार कटीबद्ध – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची ग्वाही.

• आंदोलनाच्या बळावर कायदे रद्द करण्याची मागणी, लोकशाहीला घातक – केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले.

• मराठवाड्याच्या रेल्वेप्रश्नी सर्वसामान्यांनी पुढाकार घ्यावा – रेल्वे प्रश्नांचे अभ्यासक ओमप्रकाश वर्मा यांचं आवाहन.

• राज्यात नवे दोन हजार आठशे चोपन्न कोविडग्रस्त; मराठवाड्यात नव्या १४६ रुग्णांची नोंद.

• लातूर इथल्या रेल्वे बोगी प्रकल्पात पहिला कोच शेल तयार.

• ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत भारताच्या उपाहारापर्यंत तीन बाद नव्वद धावा.

भारतीय अर्थव्यवस्था
पुढच्या दहा वर्षांत जगातली तिसरी मोठी अर्थव्यवस्था होईल, असा दावा, ब्रिटनमधल्या आर्थिक आणि व्यापार संशोधन केंद्र सीईआरबीनं केला आहे. सीईआरबीनं आपल्या वार्षिक अहवालात ही बाब नमूद केली आहे.

पाचव्या क्रमांकावर असलेली भारतीय अर्थव्यवस्था, चालू आर्थिक वर्षात रुपया कमजोर झाल्यानं, ब्रिटनच्या मागे पडली. मात्र पुढच्या वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेत ९ टक्के वाढ होईल, २०२५ मध्ये भारतीय अर्थव्यवस्था ब्रिटनला मागे टाकून जगात पाचवी, २०२७ मध्ये जर्मनीला मागे टाकत चौथी, तर २०३० मध्ये जपानला मागे टाकून जगातली तिसरी मोठी अर्थव्यवस्था होईल, असं या अहवालात म्हटलं आहे.

पायाभूत सुविधा

क्षेत्राच्या विकासासाठी सरकार कटीबद्ध असल्याची ग्वाही केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. ते आकाशवाणीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

२२ हरित द्रुतगती महामार्गांच्या बांधकामांमुळे प्रवास आणि वाहतूक क्षेत्रात आमुलाग्र बदल होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. देशात कुटीरोद्योग तसंच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना चालना देण्यासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी पावले उचलत असल्याचं गडकरी यांनी सांगितलं.

दरम्यान, देशातली गावं ‘स्मार्ट व्हिलेजेस’मध्ये परिवर्तित करण्यासाठी युवकांनी गावाकडे चलण्याचं आवाहन नितीन गडकरी यांनी केलं आहे. ते काल नागपूर इथं अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या राष्ट्रीय अधिवेशनात यशवंतराव केळकर युवा पुरस्कार प्रदान केल्यानंतर बोलत होते.

कृषी क्षेत्रातल्या उल्लेखनीय योगदानासाठी बिहारचे युवा कार्यकर्ते मनीष कुमार यांना गडकरी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

युवकांनी गावांमध्ये जाऊन व्यवसाय करा, त्यासाठी सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग – एमएसएमई मंत्रालयाच्यावतीने सर्व ती मदत करण्यात येईल, असं आश्वासन गडकरी यांनी दिलं.

अतिवृष्टी नुकसानभरपाई

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानभरपाईसाठी केंद्राकडे अंतिम अहवाल पाठवताना संदर्भ तसंच आराखड्यांसह मुद्देसूद आकडेवारी सादर करण्याची सूचना केंद्रीय पाहणी पथकानं केली आहे.

या पथकानं काल नागपूर इथं विभागीय आयुक्त संजीवकुमार यांच्यासोबत झालेल्या बैठकीत ही माहिती दिली. केंद्राकडे पायाभूत सुविधा, कृषी, तसंच पशुधनाच्या नुकसानाची आकडेवारी सादर करताना राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन मदत निधीच्या निकषांप्रमाणे मागणी करणं आवश्यक असल्याचं या पथकानं सांगितलं.

आंदोलनाच्या बळावर

कायदे रद्द करण्याची मागणी, लोकशाहीला घातक असल्याचं, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे, ते काल मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. संविधानाने कायदे बनवण्याचा आणि त्यात दुरुस्ती करण्याचा अधिकार संसदेला दिला आहे.

लोकशाहीत आपले प्रश्न मांडण्यासाठी आंदोलन करण्याचाही सर्वांना अधिकार आहे. मात्र सुधारित कृषी कायदे रद्द करा या मागणीचा अट्टहास शेतकरी आंदोलक करत असल्याचं, आठवले म्हणाले.

या कायद्यांमध्ये दुरुस्तीसाठी आंदोलकांनी केंद्रसरकारशी चर्चा करावी, आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात या दुरुस्तीसाठी सरकार तयार असल्याचं आठवले यांनी सांगितलं. हे कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे आहेत.

आपल्या शेतमालाला जिथे जास्त भाव मिळेल तिथे तो विकण्याचा अधिकार या नव्या कायद्यानुसार मिळाला आहे, त्यासोबतच कृषी उत्पन्न बाजार समितीची यंत्रणा सुद्धा कायम राहणार आहेत, याकडे आठवले यांनी लक्ष वेधलं.

अयोध्येत उभारल्या जात

असलेल्या राम मंदिरासाठी येत्या १५ जानेवारीपासून २७ फेब्रुवारीपर्यंत देशभरात निधी संकलन अभियान राबवलं जाणार आहे.

श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासचे कोषाध्यक्ष गोविंददेवगिरी महाराज यांनी काल औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या अभियानाच्या माध्यमातून देशभरात चार लाख गावातल्या ११ कोटी कुटुंबांपर्यंत तर महाराष्ट्रातल्या एक कोटी चाळीस लाख कुटुंबांपर्यंत पोहोचणार असल्याचं गोविंददेवगिरी महाराज यांनी सांगितलं.

राज्यात हे अभियान १४ जानेवारीपासून १५ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. दहा, शंभर आणि एक हजार रुपयांच्या कुपनद्वारे राममंदीर उभारणीसाठी निधी संकलित केला जाणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी

आज सकाळी ११ वाजता आकाशवाणीवरच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रम मालिकेचा बहात्तरावा भाग असेल.

आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या, आकाशवाणीचं संकेतस्थळ आणि मोबाईल अॅपवरून, तसंच आकाशवाणी, डीडी न्यूज, पंतप्रधान कार्यालय आणि माहिती प्रसारण मंत्रालयाच्या यू ट्यूब वाहिन्यांवरूनही या कार्यक्रमाचं प्रसारण केलं जाणार आहे.

आकाशवाणीवर या कार्यक्रमाच्या हिंदी भाषेतल्या प्रसारणानंतर, लगेचच प्रादेशिक भाषांमधला अनुवाद प्रसारित केला जाईल. प्रादेशिक भाषांमधल्या अनुवादाचं रात्री आठ वाजता पुनःप्रसारण होणार आहे.

देशातल्या विनाचालक

रेल्वेगाडीचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या सोमवारी उद्घाटन होणार आहे. सध्या दिल्ली मेट्रोच्या मार्गावर ही गाडी धावणार आहे.

ही गाडी पूर्णपणे स्वयंचलित असल्यानं, मानवी चुकीची शक्यता राहणार नाही, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्रिसूत्रीचं पालन करण्याचं आवाहन प्रसिद्ध अभिनेते सुबोध भावे यांनी केलं आहे.

लडाखचे खासदार जामयांग नामग्याल

यांचा काल मुंबईत स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीनं सत्कार करण्यात आला. केंद्राचे प्रमुख कार्यवाह राजेंद्र वराडकर आणि कार्यकारी सदस्य के. सरस्वती यांच्या हस्ते नामग्याल यांना सावरकरांची मूर्ती आणि चरित्रपर ग्रंथ देऊन सन्मानित करण्यात आलं. खासदार नामग्याल हे साहित्याचे व्यासंगी आहेत.

वाचन आणि लेखन हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विशेष पैलू आहेत, २०१३ मध्ये त्यांचा एक काव्यसंग्रहही प्रकाशित झाला आहे. सेंद्रीय शेतीचा प्रचार करण्यात त्यांचा कायम पुढाकार राहिला आहे.

मुंबईतल्या स्पंदन

या संस्थेचे महंमद रफी पुरस्कार काल प्रदान करण्यात आले. दिवंगत संगीतकार कल्याणजी यांना ‘महंमद रफी जीवन गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला, कल्याणजी यांचे पुत्र विजू शाह यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

एक लाख रुपये आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्कारचं स्वरुप आहे. प्रसिद्ध पार्श्वगायक शब्बीर कुमार यांना ‘मोहम्मद रफी पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आलं.

५१ हजार रुपये आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. आमदार विधीज्ञ आशिष शेलार यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.

प्रसिद्ध नाटककार, साहित्यिक महेश एलकुंचवार यांना यावर्षीचा दिलीप चित्रे स्मृती साहित्य जीवनगौरव सन्मान जाहीर झाल्याबद्दल ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी काल नागपुरात त्यांचा सत्कार केला.

आत्महत्याग्रस्त शेतकरी

कुटुंबातल्या एकल महिलांवर आधारित तेरवं या नाट्यसंहितेसाठी लेखक श्याम पेठकर यांना रा. श. दातार नाट्य पुरस्कार जाहीर झाला असून, सामाजिक कार्यकर्त्या अरुणा सबाने यांना कार्यकर्ता प्रबोधन पुरस्कार जाहीर झाला आहे.

या दोन्ही मान्यवरांचाही राऊत यांनी काल सत्कार केला. साहित्यिक, सांस्कृतिक, आणि राजकीय चळवळीचे केंद्र असणाऱ्या नागपूर शहरातल्या तीन नामवंतांना साहित्य तसंच सामाजिक क्षेत्रात मिळालेले पुरस्कार विदर्भासाठी भूषणावह असल्याची भावना, राऊत यांनी व्यक्त केली आहे.

मराठवाड्याच्या रेल्वेप्रश्नी

स्थानिक लोकप्रतिनिधी आणि सर्वसामान्यांनी पुढाकार घ्यावा, असं आवाहन, मराठवाडा रेल्वे प्रश्नाचे अभ्यासक ओमप्रकाश वर्मा यांनी केलं आहे.

काल औरंगाबाद इथं गोविंदभाई श्रॉफ स्मृती पुरस्कार, वर्मा यांना प्रदान करण्यात आला, या पुरस्काराला उत्तर देताना ते बोलत होते. २१ हजार रुपये आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरुप आहे.

मराठवाड्याच्या रेल्वेप्रश्नांचा गोविंदभाईंनी आंदोलनं तसंच पत्रव्यवहार करून सातत्यानं पाठपुरावा केला होता, त्यांच्या पश्चात मात्र रेल्वेप्रश्नांबाबत बेवारस झाल्याची खंत वर्मा यांनी व्यक्त केली.

राज्यात कोविड रुग्ण संख्या

काल दोन हजार आठशे चोपन्न नवीन कोविड बाधित रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या १९ लाख सोळा हजार दोनशे छत्तीस झाली आहे.

काल ६० रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या विषाणू संसर्गामुळे झालेल्या मृत्यूंची एकूण संख्या, ४९ हजार एकशे एकोणनव्वद झाली असून, मृत्यू दर दोन पूर्णांक ५७ शतांश टक्के इतका आहे.

काल एक हजार पाचशे सव्वीस रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. राज्यात आतापर्यंत १८ लाख सात हजार आठशे चोवीस रुग्ण, कोरोना विषाणू मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ९४ पूर्णांक ३४ शतांश टक्के इतका झाला आहे. सध्या राज्यात ५८ हजार एक्क्याण्णव रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

मराठवाड्यात काल फक्त औरंगाबाद जिल्ह्यात दोन कोविडग्रस्ताचा मृत्यू झाला. तर विभागात नव्या १४६ रुग्णांची नोंद झाली.

औरंगाबाद जिल्ह्यात काल ३३ नवे रुग्ण आढळले. लातूर तसंच जालना जिल्ह्यात प्रत्येकी १९, बीड आणि परभणी जिल्ह्यात प्रत्येकी २२, नांदेड १८, उस्मानाबाद ८, तर हिंगोली जिल्ह्यात काल कोविड संसर्ग झालेले पाच नवीन रुग्ण आढळले.

दरम्यान, औरंगाबाद रेल्वेस्थानकावर काल २२७ प्रवाशांची RTPCR चाचणी करण्यात आली, परवा चाचणी केलेल्यांपैकी चार प्रवासी बाधित आढळून आले आहेत.

औरंगाबाद विमानतळावर काल ४७ प्रवाशांची RTPCR चाचणी करण्यात आली, परवा चाचणी केलेल्यांपैकी पाच विमान प्रवासी बाधित आढळले आहेत.

परभणी जिल्ह्यात नागरिकांच्या शरीरात कोरोना विषाणू विरूध्द लढण्याकरता अँटिबॉडीज प्रतिपिंडकं तयार झाली आहेत का, हे तपासण्याकरता भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद – आयसीएमआरची ११ पथकं दाखल झाली आहेत.

या पथकांनी सेलू, जिंतूर, परभणी, मानवत, सोनपेठ, पालम, तसंच पूर्णा तालुक्यातून रक्तनमुने संकलित केले आहेत. कोरोना विषाणू संसर्गाविरूध्द लढण्याकरता हे सर्वेक्षण महत्त्वाचं ठरणार आहे. आयसीएमआरच्या पथकांनी बीड जिल्ह्यातही दहा गावांमधून चारशे रक्तनमुने संकलित केले आहेत.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथ खडसे

यांना अंमलबजावणी संचलनालय – ईडीनं नोटीस बजावली आहे. काल धुळे जिल्ह्यात शिरपूर दौऱ्यावर असताना, खडसे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. येत्या बुधवारी, ३० डिसेंबरला चौकशीसाठी इडी कार्यालयात हजर राहण्याबाबत समन्स बजावण्यात आल्याची माहिती खडसे यांनी दिली.

केंद्र सरकारने केलेल्या

कृषी कायदाच्या विरोधात पंजाबसह अनेक राज्यातले शेतकरी मागील ३० दिवसांपासून दिल्लीत आंदोलन करत आहे, त्यांच्या समर्थनार्थ शिवसेनेच्या औरंगाबाद शाखेच्या वतीनं शीख बांधवांसोबत काल शहरातल्या उस्मानपुरा इथं धरणे आंदोलन करण्यात आलं. शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात अनेक पदाधिकारी तसंच कार्यकर्ते सहभागी झाले.

लातूर इथल्या रेल्वे बोगी प्रकल्पात

पहिला कोच शेल तयार झाला आहे. आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी ही माहिती दिली. सुशासन दिनाचं औचित्य साधून केंद्र सरकारने मराठवाड्याला ही भेट दिल्याबद्दल निलंगेकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच रेल्वे मंत्री पियुष गोयल यांचे आभार व्यक्त केले आहेत.

हा राज्यातला पहिला तर देशातला चौथा रेल्वे बोगी प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे मराठवाड्यातल्या ५० हजारांहून अधिक तरुणांना रोजगार प्राप्त होणार असून औद्योगिक विकासालाही चालना मिळणार आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया
दरम्यान कसोटी किक्रेट मालिकेच्या दुसऱ्या सामन्यात उपाहारापर्यंत भारताच्या तीन बाद नव्वद धावा झाल्या आहेत. शुभमन गील ४५ तर चेतेश्वर पुजारा १७ धावांवर बाद झाले.

कर्णधार अजिंक्य रहाणे दहा तर हनुमा विहारी १३ धावांवर खेळत आहेत. दरम्यान, काल सकाळी ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

मात्र भारतीय गोलंदाजांसमोर ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १९५ धावांतच संपुष्टात आला. मालिकेत पहिली कसोटी जिंकून ऑस्ट्रेलिया संघ एक शून्यनं आघाडीवर आहे.

नांदेड इथल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची

पीएच.डी प्रवेश पात्रता परीक्षा पेट- २०२० दोन टप्प्यामध्ये घेतली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात येत्या २९ डिसेंबरला तर दुसऱ्या टप्प्यात येत्या १० जानेवारीला परीक्षा होणार आहे.

विद्यापीठाने निर्धारित केलेल्या नांदेड, लातूर तसंच परभणी शहरातल्या परीक्षा केंद्रावर या परीक्षा घेण्यात येणार आहेत. परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. रवि सरोदे यांनी ही माहिती दिली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here