आपण देशातील वेगवेगळ्या भागात जाऊन मोहीम राबवणार असल्याचं भारतीय किसान युनिअनचे नेते राकेश टिकैत यांनी जाहीर केलेलं आहे.
भारतीय किसान युनिअनने नव्या कृषी कायद्यांसंबंधी देशभरात जागृती करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
दुसरीकडे शेतकऱ्यांनी ६ फेब्रुवारीला देशव्यापी ‘चक्का जाम’ची घोषणादेखील केली आहे. या सर्व घडामोडींदरम्यान राकेश टिकैत यांनी शेतकरी आंदोलनासंबंधी एक मोठी घोषणा केली आहे.
राकेश टिकैत यांनी ‘जोपर्यंत कायदा मागे घेत नाही, तोपर्यंत घऱवापसी नाही’ असा नारा दिला आहे.
यावेळी त्यांनी शेतकरी आंदोलन ऑक्टोबरच्या आधी संपणार नाही असं मोठं विधान केलं आहे. ‘हे आंदोलन ऑक्टोबरच्या आधी संपणार नाही. हे आंदोलन लवकर संपणार नाही,’ असं ते म्हणाले आहेत.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिल्ली-उत्तर प्रदेश सीमेवर गाझीपूर येथे भेट घेतल्यानंत राकेश टिकैत यांनी हे वक्तव्य केलं आहे. संजय राऊत यांनी शेतकरी आंदोलनाला शिवसेनेचा जाहीर पाठिंबा असल्याचं सांगितलं आहे.
संजय राऊत यांच्या भेटीसंबंधी बोलताना राकेश टिकैत यांनी सांगितलं आहे की, “जर विरोधक येऊन आम्हाला पाठिंबा देत असतील तर त्यामध्ये काहीच समस्या नाही. पण त्यांनी याचं राजकारण करु नये. जर कोणी नेते भेटायला येत असतील तर आम्ही काहीच करु शकत नाही”.
संजय राऊत भेटीनंतर काय म्हणाले
शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सकाळी आम्हा सर्व खासदारांना आदेश दिला. ज्याप्रकारे सरकारतर्फे अन्याय, दहशत केली जात आहे.
त्यांच्या पाठीशी उभं राहणं, पाठबळ देणं आपलं कर्तव्य आहे. उद्धव ठाकरे यांचा निरोप, संवेदना घेऊन आपण येथे पोहोचलो आहोत, असं त्यांनी सांगितलं.
देशातील प्रत्येक राजकीय पक्षाने येथे येऊन आपल्या भावना व्यक्त करण कर्तव्य आहे, असं मत यावेळी त्यांनी व्यक्त केलं.
राकेश टिकैत आणि आम्ही आधी दूरध्वनीवरुन बोललो होतो. पण फोनवरुन बोलणं आणि प्रत्यक्षात मैदानात येऊन पाठिंबा देणं हे महत्वाच आहे. यामुळे प्रत्यक्ष रणभूमीवर येऊन पाठिंबा जाहीर केला, अशी माहिती संजय राऊत यांनी यावेळी दिली.
६ फेब्रुवारीला चक्का जाम आंदोलन
६ फेब्रुवारी रोजी शेतकरी संघटनांकडून देशव्यापी चक्का जाम आंदोलन केलं जाणार आहे. संयुक्त किसान मोर्चाचे नेते बलबीर सिंह राजेवाल यांनी घोषणा केली आहे.
दुपारी १२ ते ३ या वेळेत राज्य तसंच राष्ट्रीय महामार्ग रोखले जाणार आहेत. दिल्ली व आसपासच्या परिसरात इंटरनेट सेवा खंडीत करण्यात आल्याबद्दल तसंच इतर मुद्द्यांवरुन हे आंदोलन केलं जाणार आहे.