महाबळेश्वर : जागतिक महिला दिनी येथील मुख्याध्यापक असलेल्या दिलीप रामचंद्र ढेबे याने दहावीमध्ये शिकणार्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार केला.
त्यानंतर पीडित विद्यार्थिनीने दाखल केलेल्या तक्रारीवरून दिलीप ढेबे याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दिलीप ढेबे यास मंगळवारी सातारा येथील विशेष न्यायालयात हजर करण्यात आले.
तेव्हा त्याला सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, मुख्याध्यापकाच्या या निंदनीय कृत्याचा सर्वच स्तरातून निषेध केला जात आहे. येथील महिलांनी अशा नराधमास कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
देशभर महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा होत असताना महाबळेश्वर शहर एका हायस्कूलच्या मुख्याध्यापकाने केलेल्या कुकर्माने हादरले.
दिलीप रामचंद्र ढेबे (वय 50, रा. मेटगुताड) याने विद्यालयातील दहावीमध्ये शिकत असलेल्या 15 वर्षीय मुलीवर शाळेच्या प्रयोगशाळेत व हॉलमध्ये वारंवार जबरदस्तीने शारिरिक संबंध प्रस्थापीत करून त्या मुलीवर अत्याचार केले होते.
याबाबत या शाळेतील एका विद्यार्थीनीनेच शाळेतील मुख्याध्यापक हे या पिडीत मुलीशी नेहमी लगट करतात, अशी तक्रार चाईल्ड हेल्पलाईन नंबर 1098 वर फोन करून दिली होती. त्यामुळेच हा प्रकार उघडकीस आला.
हेल्पलाईनवरून आलेल्या तक्रारीची गंभीर दखल घेण्यात आली. गेली पाच दिवस महाबळेश्वर पोलिस या प्रकरणाचा तपास करत होते. आरोपी व पिडीत विद्यार्थीनीचा पत्ता महाबळेश्वर पोलिसांनी शोधून काढला.
पिडीत मुलीला पोलिसांनी विश्वासात घेतल्यानंतर मुलीने आपल्यावर होत असलेल्या अत्याचाराचा पाढाच वाचला. मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून महाबळेश्वर पोलिसांनी नराधम मुख्याध्यापकाच्या मुसक्या आवळल्या.
दरम्यान मंगळवारी या मुख्याध्यापकास सातारा येथील विशेष न्यायालयात हजर केले असता त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तपास पोलिस निरिक्षक बी. ए. कोंडुभैरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक अब्दुल बिद्री,पो हवा श्रीकांत कांबळे करत आहेत.
चाईल्ड हेल्पलाईनवरून प्रकरण उघडकीस
जिल्हा पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल,अप्पर पोलिस अधीक्षक धीरज पाटील व वाई उपविभागीय पोलिस अधिकारी शीतल जान्हवे-खराडे यांच्या आदेशान्वये सातारा जिल्हा भरोसा सेल, पोलिस काका व पोलिस दीदी अंतर्गत करण्यात आलेल्या जनजागृतीमुळे महाबळेश्वरातील अत्याचाराचा प्रकार उघडकीस आला आहे.
याबाबत वरिष्ठ पातळीवरून आदेश आल्यानंतर 23 फेब्रुवारी रोजी पोलिस उपनिरीक्षक अब्दुल हादी बिद्री, पो.हवा. पुरुषोत्तम जाधव व महिला पोलिस कॉन्स्टेबल शालिनी पवार यांनी महाबळेश्वर येथील खासगी हायस्कूलमध्ये सातारा पोलीस भरोसा सेल यांच्यामार्फत मुलींमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी प्रत्येक वर्गातून मुलींच्या समस्या तसेच छेडछाड, लैंगिक सतवणूक याबाबत मार्गदर्शन करण्यात आले होते.
चाईल्ड हेल्प लाईन नंबर 1098 व सातारा भरोसा सेल नं.100 नंबर वर माहिती देण्याबाबत व ही माहिती देणार्याचे नाव गुप्त ठेवण्याबाबत देखील आवाहन करण्यात आले होते.
या माहितीमुळे याच शाळेतील एका विद्यार्थीनीने शाळेतील मुख्याध्यापक दिलीप ढेबे हे पिडीत मुलीशी नेहमी लगट करतात, अशी तक्रार चाईल्ड हेल्पलाईन नंबर 1098 वर फोन करून केली होती.
या तक्रारीची खातरजमा महाबळेश्वर पोलिसांनी केली असता ही तक्रार खरी असल्याचे निष्पन्न झाले. संबंधित पिडीत मुलीची फिर्याद घेवून महाबळेश्वर पोलीसांनी त्या शाळेच्या नराधम मुख्याध्यापकावर सोमवारी गुन्हा दाखल केला.