प्रादेशिक बातम्या | राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा

401

कोरोना विषाणू रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होत आहे, त्यामुळे संपूर्ण काळजी घेण्याचं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. (Regional News | A quick review of state news)

प्रत्येक नागरिकाने सर्व सुरक्षा उपायांचं पालन करावं. ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांनी, न घाबरता, लसीकरण करुन घ्यावं.

नाक आणि तोंडाला मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात वेळोवेळी साबणाने धुवावेत. हात आणि तोंड स्वच्छ ठेवावं. या सहज सुलभ उपायांचा अवलंब करा आणि सुरक्षित रहा.

• येत्या ११ ते १४ एप्रिल दरम्यान व्यापक सार्वजनिक लसीकरण मोहीम आयोजित करण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन.
• कोविडशी लढण्यात महाराष्ट्र मागे नाही, लढ्यात कुठलंही राजकारण आणू नये मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांकडे मागणी.
• राज्याला लसींचा पुरेसा पुरवठा करण्यासाठी केंद्र सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद – आरोग्य मंत्री राजेश टोपे.
• राज्यात ५६ हजार २८६ नवे कोविड रुग्ण; मराठवाड्यात ८४ जणांचा मृत्यू तर सहा हजार ६०८ बाधित.
• कोरोना विषाणू संसर्गाच्या गंभीर आणि भयावह स्थितीचा धैर्यानं सामना करण्याचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचं आवाहन.
• केंद्र सरकारच्या उच्चस्तरीय पथकांनी राज्यात अनेक जिल्ह्यांचा दौरा करत कोविड साथीमुळे निर्माण झालेल्या स्थितीचा घेतला आढावा.
आणि
• माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची सीबीआय चौकशी रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार.

व्यापक सार्वजनिक लसीकरण मोहीम

येत्या ११ ते १४ एप्रिल दरम्यान व्यापक सार्वजनिक लसीकरण मोहीम आयोजित करण्याचं आणि याला उत्सवाच्या रुपात साजरा करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. कोविड परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी काल दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधताना ते बोलत होते. ११ एप्रिलला महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आणि १४ एप्रिलला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे.

युवकांनी लसीकरणासाठी ज्येष्ठ नागरिक आणि गरजवंतांना मदत करावी, असं आवाहनही पंतप्रधानांनी यावेळी केलं. विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता, लहान प्रतिबंधित क्षेत्र करण्यावर त्यांनी भर दिला. महाराष्ट्र, छत्तीसगढ, पंजाब, मध्य प्रदेश, गुजरातसह अन्य काही राज्यांमध्ये कोरोना विषाणूची दुसरी लाट आली असून, इतरही राज्यांमध्ये प्रभाव वाढत असल्याबद्दल पंतप्रधानांनी चिंता व्यक्त केली. राज्यांनी अधिकाधिक चाचण्या करण्यावर भर द्यावा, असं ते म्हणाले.

मास्क वापरण्याचं महत्व, आणि कोविड नियमांचं पालन करण्यासंदर्भात जनजागृती आवश्यक असल्याचं पंतप्रधानांनी यावेळी नमूद केलं.
दरम्यान, संपूर्ण देश कोविडशी लढत असताना महाराष्ट्र देखील कुठेही मागे नव्हता आणि नाही असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत सांगितलं. देशातल्या सर्व पक्षांच्या नेत्यांना या लढ्यात कुठलंही राजकारण आणू नये म्हणून सांगावं अशी आग्रही मागणी त्यांनी यावेळी पंतप्रधानांकडे केली.

हाफकिनला लस उत्पादन करण्यासाठी राज्य शासनानं पाठवलेल्या प्रस्तावाला लवकर मान्यता मिळाल्यास लसीकरण आणखी वाढवता येईल, तसंच राज्यातली परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लसीचा जादा पुरवठा, ऑक्सीजन तसेच व्हेंटीलेटर्स उपलब्ध करून द्यावे अशी विनंती ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे केली.

केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ.हर्षवर्धन यांच्याशी संपर्क साधला : राजेश टोपे

राज्याला कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधात्मक लसींचा पुरेसा पुरवठा होत नसून, आपण यासंदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ.हर्षवर्धन यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचं, राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत प्रसार माध्यमांशी बोलत होते.

केंद्र सरकार १५ एप्रिल नंतर साडेसात लाखाऐवजी १७ लाख लसींची मात्रा पाठवणार असलं, तरी ते देखील पुरेसं नाही, असं टोपे म्हणाले, आपल्या राज्याला साडेसात लाख फक्त लस दिलेली आहे. याच्या तुलनेमधे उत्तर प्रदेश साधारणपणे अठ्ठेचाळीस लाख, मध्य प्रदेश साधारण चाळीस लाख, गुजरात साधारण तीस लाख आणि हरियाणा चोवीस लाख. राज्यामधे सगळ्यात जास्त जवळजवळ पंचावन्न टक्के अक्टीव्ह केसेस जो राज्य आहे, त्याला साडेसात लाख आणि बाकीच्यांना चाळीस, पन्नास, साठ लाखांच्या दरम्यान का? हा साधा प्रश्न माझा आहे. सात दिवसाला आम्हाला चाळीस लाख व्हॅक्सिन्स लागतातच. आणि त्यामुळे आम्हाला आठवड्याला चाळीस लाख दिले पाहिजे एका महिन्याला एक कोटी साठ लाख दिले पाहिजे तरच आम्ही आमची गती मेंटेन करू शकू.

रेमडीसीवर इंजेक्शनच्या उत्पादक कंपन्यांच्या अधिकाऱ्यांशी आपण चर्चा केली, तसंच राज्यातल्या प्राणवायूच्या पुरवठ्याबाबतही उपाययोजना करण्यात येणार असल्याची माहिती, त्यांनी दिली.

राज्यात काल ५६ हजार २८६ कोविड रुग्णांची नोंद

यामुळे राज्यभरातल्या कोविडबाधितांची एकूण संख्या ३२ लाख २९ हजार ५४७ झाली आहे. काल ३७६ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, ५७ हजार २८ झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ७७ शतांश टक्के झाला आहे. काल ३६ हजार १३० रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत २६ लाख ४९ हजार ७५७ रुग्ण, कोरोना विषाणू मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ८२ पूर्णांक शून्य पाच शतांश टक्के झाला आहे. सध्या राज्यभरात पाच लाख २१ हजार ३१७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

मराठवाड्यात काल नव्या ६ हजार ६०८ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद

तर ८४ रुग्णांचा या संसर्गानं मृत्यू झाला. मृतांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या २२, नांदेड जिल्ह्यातल्या २६, परभणी दहा, लातूर आठ, जालना आणि हिंगोली जिल्ह्यात प्रत्येकी सहा, तर बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यात प्रत्येकी तीन रुग्णांचा समावेश आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात काल एक हजार ३६२ रुग्ण आढळले. नांदेड जिल्ह्यात एक हजार ४५०, लातूर एक हजार १००, परभणी ७१३, बीड ७११, जालना ६१८, उस्मानाबाद ४८९, तर हिंगोली जिल्ह्यात २५५ नवे रुग्ण आढळून आले.

कोरोना राज्यातली गंभीर आणि भयावह

कोरोना विषाणू संसर्गाची राज्यातली गंभीर आणि भयावह स्थिती लक्षात घेता, या स्थितीला धैर्यानं, सामूहिकपणानं आपण सामोरं गेलं पाहिजे, असं आवाहन, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी जनतेला केलं आहे.

याला आता पर्याय राहिलेला नसून नाईलाजानं या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी, वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार राज्य सरकारला कठोर निर्बंध लागू करावे लागत असल्याचं, त्यांनी सामाजिक संपर्क माध्यमांद्वारे नमूद केलं आहे.

गेल्यावर्षी आणि यावर्षीची संसर्गाची आकडेवारीही त्यांनी मांडली. केंद्र सुद्धा या संकटातून राज्याला मदत करण्यासाठी पूर्णपणे सहकार्याची भूमिका घेत आहे, असं सांगून पवार यांनी, आपण या संदर्भात कालच देशाच्या आरोग्य मंत्र्यांशी संपर्क साधल्याचं सांगितलं.

निर्बंध शिथिल करण्याच्या मागणीवर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा

कोरोना विषाणू संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्र्वभूमीवर राज्यात लागू निर्बंध शिथिल करण्याच्या मागणीवर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून दोन दिवसात निर्णय घेऊ, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. ते काल सोलापूर जिल्ह्यात पंढऱपूर इथं या संदर्भात मागणी करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या बैठकीत बोलत होते.

पंढरपूर पोटनिवडणुकीच्या प्रचारही पवार यांनी यावेळी केला. त्यांच्या उपस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षाचे नेते कल्याण काळे यांनी या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

केंद्र सरकारच्या पथकाने राज्याच्या कोविड परिस्थितीचा आढावा घेतला

केंद्र सरकारनं पाठवलेल्या उच्चस्तरीय पथकांनी काल राज्यांच्या अनेक जिल्ह्यांचा दौरा करुन, कोविड साथीमुळे निर्माण झालेल्या स्थितीचा आढावा घेतला. राज्याचा आरोग्य विभाग आणि जिल्हास्तरावरच्या स्थानिक अधिकाऱ्यांना कोविड साथीवर देखरेख, नियंत्रण आणि प्रतिबंधात्मक उपाय योजण्याच्या कामात मदत करण्यासाठी, ही केंद्रीय पथकं पाठवण्यात आली आहेत.

राज्याच्या ३० जिल्ह्यांचा दौरा ही पथकं करत आहे. औरंगाबाद जिल्ह्यात डॉ.अभिजीत पाखरे यांच्या नेतृत्वाखालच्या पथकानं, वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर, गृहविलगीकरणातल्या रुग्णांच्या देखरेखीवर विशेष लक्ष देण्याची सूचना केली आहे. पथकानं काल शहरातल्या कोविड उपचार केंद्रांना भेट देऊन पाहणी केली.

बीड जिल्ह्यातही केंद्रीय पथकाच्या डॉ.रक्षा कुंदल आणि डॉ.कुशवाह यांनी, कोविड परिस्थितीचा आढावा घेतला. आरोग्य विभागातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीत, त्यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना, सध्या बाधित असलेल्या रूग्णांवरील उपचार, औषधी, मनुष्यबळ याबाबत सविस्तर चर्चा केली.

परभणी जिल्ह्यात केंद्रीय पथकातल्या डॉ.दिनेश बाबू आणि डॉ.रंजन सोळंकी या दोन सदस्यांनी, कोविड सुश्रृषा केंद्र आणि लसीकरण केंद्रांना भेटी दिल्या. हे पथक पुढील तीन दिवस परभणी जिल्ह्यात असणार आहे.

नांदेड जिल्ह्यातही केंद्रीय पथकानं जिल्हा रुग्णालयात जाऊन तिथल्या सुविधांची पाहणी केली. केंद्रीय पथकानं अहवाल सादर केल्यानंतर, जिल्हा प्रशासनाला काही मार्गदर्शक सूचना मिळतील अशी अपेक्षा, नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ.विपिन ईटनकर यांनी व्यक्त केली.

लातूर जिल्ह्यात या पथकातल्या डॉ.तुषार नेले आणि डॉ.आलोककुमार साहू यांनी, विविध कोविड कक्षांना भेटी दिल्या. गृहविलगीकरणात असतानाही बाहेर फिरणाऱ्या रुग्णांवर आळा घालण्याच्या सूचना त्यांनी यावेळी प्रशासनाला केल्या. जालना जिल्ह्यात या पथकातल्या डॉ.महेश चंद्रा आणि डॉ.विनिता गुप्ता यांनी पाहणी केली.

चार दिवस हे पथक जालना जिल्ह्यातल्या कोविड परिस्थितीचा आढावा घेणार आहे. सांगली, धुळे, यवतमाळ, बुलडाणा, सोलापूर या जिल्ह्यातही केंद्रीय पथकानं काल भेटी देऊन, परिस्थितीचा आढावा घेतला.

या वस्तूंचा अत्यावश्यक सेवेत समावेश

‘ब्रेक द चेन’ अभियानाअंतर्गत दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, अंडी, मांस, मासे, जनावरांचा चारा आदी बाबींचा, अत्यावश्यक सेवेत समावेश करण्यात आल्याची माहिती, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी दिली. या सर्वांना सहाय्यभूत ठरतील अशा सेवा, त्यांची वाहतूक आणि त्यांचे विक्रेते यांच्या सेवा समाविष्ट करण्यात आल्या असून, संबंधितांनी कोविड – १९ च्या शासनानं दिलेल्या निर्देशांचं पालन करणं आवश्यक असल्याचंही, केदार यांनी सांगितले.

भारतीय जनता पक्षाच्या व्यापारी आघाडीचा लॉकडाऊनला विरोध

औरंगाबाद जिल्ह्यात वाढत्या कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर, ब्रेक द चेन अभियानामध्ये लागू निर्बंध हे टाळेबंदीच असल्याचा आरोप करत, भारतीय जनता पक्षाच्या व्यापारी आघाडीनं याला विरोध केला आहे. आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी यासंदर्भातलं निवेदन काल जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना सादर केलं असून, दुकानं उघडण्याचा इशारा दिला आहे.

स्वस्त धान्य दुकानदारांना आर्थिक मदत

कोरोना विषाणू संसर्गामुळे मृत्यमूखी पडलेल्या स्वस्त धान्य दुकानदारांना आर्थिक मदत, तसंच सर्वांना विमा संरक्षण द्यावं, अशी मागणी या दुकानदारांच्या संघटनेनं केली आहे. या मागणीसाठी एक मे पासून धान्य वाटप बंद करत संपावर जाण्याचा इशारा, संघटनेतर्फे देण्यात आला आहे. राज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी या संदर्भातलं निवेदन नाशिक इथं जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलं.

प्रदेश युवक काँग्रेसतर्फे राज्यभर रक्तदान शिबिरं

राज्यात कोरोना विषाणू संसर्गाची दुसरी लाट झपाट्यानं पसरत असताना रक्ताचा तुटवडाही मोठ्या प्रमाणात भासत असल्यानं, प्रदेश युवक काँग्रेसतर्फे राज्यभर रक्तदान शिबिरं आयोजित करण्यात येणार आहेत. या अंतर्गत २५ हजार पिशव्या रक्तसंकलन करण्याचा निर्धार केला आहे, अशी माहिती युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी दिली.

नव्याने कोविड सुश्रुषा केंद्र सुरू केले

नांदेड शहरात कोविड-19 ची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन, नांदेड जिल्हा प्रशासनानं गाडेगाव रोड इथल्या हजरत फातेमा शाळेत नव्याने कोविड सुश्रुषा केंद्र सुरू केलं आहे. डॉ.झाकीर हुसैन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष एम.झेड.सिद्दिकी यांनी या भागात कोविड सुश्रुषा केंद्र सुरू करावं, अशी मागणी केली होती.

टाळेबंदीच्या विरोधात निदर्शनं

परभणी जिल्ह्यातल्या व्यापाऱ्यांनी काल टाळेबंदीच्या विरोधात निदर्शनं करत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केलं. कोविड-19 च्या संदर्भातले सर्व नियम पाळून दुकानं उघडण्याची परवानगी प्रशासनानं द्यावी अशी मागणी यावेळी व्यापाऱ्यांनी केली.

नांदेड जिल्ह्यात मुखेड इथंही छोटे व्यापारी आणि व्यवसायिकांनी काल तहसील कार्यालयासमोर दोन तास बसून धरणे आंदोलन केलं.

लातूर जिल्ह्यात नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती

लातूर जिल्ह्यातल्या सर्व खाजगी कोविड रुग्णालयात रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सोयी सुविधा आणि औषधोपचार मिळण्याच्या दृष्टीने जिल्हास्तरावरुन २२ नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

या अधिकाऱ्यांना रुग्णालयातील खाटा, प्राणवायूची उपलब्धता, व्हेंटीलेटर, रेमडेसीवीर इंजेक्शन उपलब्धता, यासारख्या बाबींची तपासणी करून अहवाल देण्याच्या सूचना, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी दिल्या आहेत.

नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेण्याचं आवाहन

उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी त्रिसूत्रीचं पालन करावं आणि पात्र नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेण्याचं आवाहन उस्मानाबाद चे आमदार कैलास पाटील यांनी केलं आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व नागरिकांना माझी विनंती आहे की, आपल्या देशात त्रिसूत्री लावून दिलेली आहे की, वारंवार हात धुणे, मास्कचा वापर करणे आणि गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळणे या त्रिसुत्रीचा वापर करून आपण स्वतःचा आणि कुटुंबाचा बचाव करू शकतो.

आपण या त्रिसुत्रीचं पालन करावं, असं मी आपल्याला आवाहन करतो. शासनाच्या वतीने सध्या लसीकरण मोहीम राबवली जात आहे. पंचेचाळीस वर्ष वयावरील सर्व नागरिकांनी कसल्याही प्रकारची मनात भीती न बाळगता बिनदीक्कतपणे आपण लसीकरण करून घेऊन स्वतःचा आपण या रोगापासून बचाव करण्याचा प्रयत्न करावा.

केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागानं आता अनिल देशमुख यांची सखोल चौकशी करावी

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची केंद्रीय अनवेषण विभाग सीबीआय चौकशी रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयानं खंडणी प्रकरणी अनिल देशमुख यांची चौकशी करण्याचे आदेश दिले होते, त्याला देशमुख आणि राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं.

सीबीआयला प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले असून, उच्च न्यायालयाच्या निर्णयात हस्तक्षेप करणार नसल्याचं सांगून सर्वोच्च न्यायालयानं, या याचिका फेटाळून लावल्या.

केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागानं आता अनिल देशमुख यांची सखोल चौकशी करावी आणि या प्रकरणातलं सत्य बाहेर आलं पाहिजे, असं विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते काल नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

सचिन वाझेंचे या संदर्भातलं पत्र सर्वांना विचार करायला भाग पडणारं आहे. या पत्रातला मजकूर राज्य आणि पोलिसांच्या प्रतिमेसाठी चांगला नसल्याचं फडणवीस म्हणाले.

जालना-नांदेड या नियोजित महामार्गाच्या प्रगतीचा आढावा घेतला

राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी काल बैठकीत मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला जोडणाऱ्या जालना-नांदेड या नियोजित महामार्गाच्या प्रगतीचा आढावा घेतला. सुमारे १७८ किलोमीटर लांबीच्या या महामार्गासाठी १२ हजार कोटी रूपयांचा खर्च अपेक्षित आहे. या महामार्गामुळे नांदेड-औरंगाबाद हे अंतर केवळ अडीच ते तीन तासांत पूर्ण करता येणार आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here