Regional News Bulletin | प्रादेशिक बातम्यांचा वेगवान आढावा

196

Regional News Bulletin | प्रादेशिक बातम्या

• कोविड लसीकरणाची आज देशात रंगीत तालीम; राज्यात जालन्यासह चार जिल्ह्यांचा समावेश.

• राज्यात कोविड लसीकरणासाठी प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे सज्ज – आरोग्य मंत्री राजेश टोपे.

• पर्यावरणपूरकता ही सर्वाची जीवनशैली बनावी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं आवाहन.

• अपारंपरिक स्रोतातून येत्या पाच वर्षात राज्य सरकारचं १७ हजार ३६० मेगावॅट वीजनिर्मितीचं उद्दिष्ट.

• क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती ‘महिला शिक्षण दिन’ तसंच ‘सावित्री उत्सव’ साजरी करण्यात येणार.

• राज्यात तीन हजार पाचशे २४ नवे कोविडग्रस्त; मराठवाड्यात नव्या २३४ रुग्णांची नोंद.

• डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू के पी सोनवणे यांचं निधन.

• परभणी जिल्ह्यात शौचालयाचा नियमित वापर न करणाऱ्या नागरिकांवर कारवाईची सूचना.

कोविड लसीकरणासाठी

आज देशभरात रंगीत तालीम होणार आहे. कोविड लसीकरणातल्या संभाव्य अडचणी जाणून घेत, त्या दूर करण्यासाठी उपाययोजना करणं, हा या रंगीत तालिमीचा उद्देश आहे.

राज्यात पुणे, नागपूर, नंदुरबार आणि जालना या चार जिल्ह्यात ही रंगीत तालीम होईल. या चारही जिल्ह्यातल्या प्रत्येकी तीन आरोग्य केंद्रात प्रत्येकी २५ जणांची अभिरुप लसीकरणासाठी निवड करण्यात आली आहे.

आज प्रत्यक्षात लस टोचण्यात येणार नाही, मात्र लसीकरणासाठी आवश्यक मार्गदर्शक सूचनांप्रमाणे सर्व प्रक्रिया राबवली जाणार आहे.

जालना जिल्ह्यातल्या तीन आरोग्य केंद्रांमध्ये जालना शहरातलं जिल्हा रुग्णालय, अंबड इथलं उपजिल्हा रुग्णालय, तसंच बदनापूर तालुक्यातल्या शेळगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचा समावेश आहे.

राज्यात कोविड लसीकरणासाठी

प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे सज्ज झाली असून, केंद्र शासनानं मान्यता देताच कोणत्याही क्षणी लसीकरण सुरू करता येईल, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

काल हिंगोली इथं एका खासगी रुग्णालयाच्या उद्घाटन कार्यक्रमानंतर बोलत होते. आतापर्यंत १६ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरणाचं प्रशिक्षण देण्यात आलं आहे.

लसीकरणासंदर्भात आतापर्यंत जाणवलेल्या कमतरतांबाबत केंद्र शासनाला कळवण्यात आलं असल्याचं टोपे यांनी सांगितलं.

सांगली जिल्ह्यात इस्लामपूर

इथल्या प्रकाश वैद्यकीय रुग्णालयात कोविड प्रतिबंधक लसीकरण चाचणीच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली. केंद्रीय आरोग्य मंत्रालय, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद – आय सी एम आर आणि राष्ट्रीय विषाणू परीक्षण संस्था यांच्या वतीनं ही चाचणी केली जात आहे.

हैदराबाद इथल्या भारत बायोटेक कंपनीने तयार केलेल्या कोव्हॅक्सिन या लसीची देशातल्या २६ वैद्यकीय संस्थांमध्ये चाचणी सुरू असून, सांगली जिल्ह्यातलं प्रकाश रुग्णालय हे या चाचणीसाठी मान्यता मिळालेलं राज्यातलं एकमेव खासगी रुग्णालय  आहे.

देशात कोविड लसीच्या आपत्कालीन

वापराला परवानगी देण्यासंदर्भात दिल्लीत काल बैठक झाली. राष्ट्रीय औषध नियामक मंडळाच्या तज्ज्ञ समितीच्या या बैठकीत सीरम इन्स्टिट्यूट, भारत बायोटेक, फायजर इंडिया, आदी औषध निर्मात्या कंपन्यांनी आपल्या लसीच्या आपत्कालीन वापरासाठी मागितलेल्या परवानगीवर चर्चा झाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं

कोविड प्रतिबंधाविषयक जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. अभिनेते अरुण नलावडे यांनी या मोहिमेत सहभागी होत, नागरिकांना त्रिसुत्रीचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे.

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातही मातीशी

आपला संपर्क अबाधित राहायला हवा, पर्यावरणपूरकता ही सर्वाची जीवनशैली बनावी, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. माझी वसुंधरा ई शपथ या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल प्रारंभ झाला, त्यावेळी ते बोलत होते.

मुख्यमंत्र्यांसह पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, यांच्यासह मंत्रिमंडळातले मान्यवर सदस्य, विविध स्थानिक स्वराज्य संस्था तसंच कार्यालयातले अधिकारी, पदाधिकारी आणि कर्मचारी दूरदृष्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून या उपक्रमात सहभागी झाले. यासर्वांनी यावेळी माझी वसुंधरा ई शपथ घेतली.

दरम्यान, ‘महाराष्ट्र पोलिसांच्या सूर्यप्रकाशाइतक्या स्वच्छ कर्तृत्वावर कुणीही डाग लावू शकत नाही, या शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलिसांचं कौतुक केलं आहे. मुख्यमंत्र्यांनी काल मुंबई पोलीस आयुक्तालयाला भेट देऊन कोविड योद्धे तसेच उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या.

कोविडच्या संकट काळात पोलिसांनी मोठी कामगिरी बजावली, आता हे नवीन वर्ष पोलीस दलासाठी तणावमुक्तीचे जावो, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार

यांनी काल पहाटे पुणे जिल्ह्यात कोरेगाव भीमा इथं विजयस्तंभाला मानवंदना दिली. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष विधीज्ञ प्रकाश आंबेडकर, यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मर्यादित नागरिकांच्या उपस्थितीत हा सोहळा साजरा व्हावा, या आवाहनाला प्रतिसाद दिल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनतेचे आभार मानले.

वस्तू आणि सेवा कर – जीएसटी

विभागाने गेल्या महिन्यात एक लाख १५ हजार १७४ कोटी रुपये महसूल संकलित केला आहे, त्यापैकी केंद्राचा वाटा २१ हजार ३६५ कोटी तर राज्य सरकारांचा वाटा २७ हजार ८०४ कोटी रुपये एवढा आहे. जीएसटी लागू केल्यापासून हे सर्वाधिक कर संकलन आहे.

बांधकाम क्षेत्राला चालना

देण्यासाठी घेतलेला मुद्रांक शुल्क कपातीचा निर्णय लाभदायक ठरला असल्याचं, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं आहे.

या योजनेमुळे सप्टेंबर ते डिसेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत २०१९ च्या तुलनेत दस्तनोंदणीत ४८ टक्के तर राज्याच्या महसुलात ३६७ कोटी रुपयांनी वाढ झाली. त्यामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेने तसंच उद्योगक्षेत्राने गती घेतल्याचं त्यांनी सांगितलं. घर खरेदी करणाऱ्यांसाठीही हा निर्णय फायदेशीर असल्याचं थोरात म्हणाले.

अपारंपरिक ऊर्जा निर्मितीच्या माध्यमातून

राज्य शासनाने येत्या पाच वर्षात १७ हजार ३६० मेगावॅट वीजनिर्मितीचे उद्दिष्ट ठेवलं आहे. ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी ही माहिती दिली.

या १७ हजार ३६० मेगावॅट वीज निर्मिती व्यतिरिक्त दरवर्षी एक लाख सौर कृषीपंप तसंच अन्य माध्यमातून मोठ्या प्रमाणात सौर ऊर्जा निर्मितीचे उद्दीष्ट ठेवण्यात आलं आहे, यामुळे राज्याच्या कृषी तसंच औद्योगिक विकासाला मोठी गती मिळू शकेल, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले

यांची जयंती ‘महिला शिक्षण दिन’ म्हणून साजरी करण्यात येणार आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली. या दिवशी शाळांमध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारीत भाषणं, निबंध, वक्तृत्व स्पर्धा, परिसंवाद तसंच एकांकिकांचं आयोजन करण्यात येईल.

सर्व शासकीय तसंच निमशासकीय कार्यालयं आणि शाळांमध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात येईल. स्त्री शिक्षणात कार्यरत शिक्षिका, अधिकारी, सामाजिक कार्यकर्त्या यांना सावित्रीबाई यांच्या नावे पुरस्कार देण्यात येणार आहेत. या निमित्तानं ऑनलाईन तसेच ऑफलाईन चर्चासत्रही घेतली जाणार असल्याचं, गायकवाड यांनी सांगितलं.

दरम्यान, सावित्रीबाई फुले यांची जयंती राज्यात ‘सावित्री उत्सव’ म्हणून साजरी करणार असल्याचं, महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी सांगितलं आहे. ‘उत्सव सावित्रीचा, जागर स्त्री शक्तीचा’ ही मध्यवर्ती संकल्पना ठरवून त्यानुसार प्रत्येक अंगणवाडी, मिनी अंगणवाडी स्तरावर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहितीचं त्यांनी दिली.

राज्यात काल तीन हजार पाचशे २४ नवीन कोविड बाधित रुग्ण आढळले

त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या १९ लाख ३५ हजार सहाशे ३६ झाली आहे. काल ५९ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या विषाणू संसर्गामुळे दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, ४९ हजार पाचशे ८० झाली आहे. तर मृत्यू दर सध्या दोन पूर्णांक ५६ शतांश टक्के इतका कायम आहे.

काल चार हजार दोनशे ७९ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. राज्यात आतापर्यंत १८ लाख ३२ हजार आठशे २५ रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ९४ पूर्णांक ६९ शतांश टक्के इतका झाला आहे. सध्या राज्यात ५२ हजार चौऱ्याऐंशी रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

मराठवाड्यात काल चार कोरोना विषाणू बाधित 

रुग्णांचा मृत्यू झाला, तर नव्या २३४ रुग्णांची नोंद झाली. मृतांमध्ये बीड जिल्ह्यातल्या दोन, तर जालना तसंच परभणी इथं प्रत्येकी एका कोविडग्रस्ताचा समावेश आहे. दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्यात काल नवे ८२ कोविडग्रस्त आढळले, नांदेड जिल्ह्यात ४८, उस्मानाबाद २७, लातूर २६, जालना २२, बीड १७, परभणी ८, तर हिंगोली जिल्ह्यात काल चार नवीन कोविड बाधितांची नोंद झाली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू 

तसंच माजी उच्च शिक्षण संचालक के पी सोनवणे यांचं काल वृद्धापकाळानं निधन झालं. ते ८१ वर्षांचे होते. जून २००० ते २००५ या दरम्यान त्यांनी विद्यापीठाच्या कुलगुरुपदाची जबाबदारी सांभाळली. विद्यापीठ परिसराच्या विकासात त्यांचं मोठं योगदान आहे. त्यांच्या पार्थिव देहावर काल पुण्यात अंत्यसंस्कार करण्यात आले.

जळगाव इथल्या डॉ.तेजोमयी भालेराव यांनी 

तयार केलेल्या केळफुल इन्स्टंट सूपला पेटंट जाहीर झालं आहे. मधुमेहावर अत्यंत गुणकारी असलेलं हे केळफुलाचं सूप हिमोग्लोबीन वाढीसाठीही लाभदायक ठरणार असल्याचं, डॉ.भालेराव यांनी सांगितलं.

भारतीय पेटंट संस्थेनं त्यांच्या या संशोधनाला पेटंट जाहीर केलं आहे. केळीचे घड विकसीत होत असताना, गळून पडणाऱ्या केळफुलाची भुकटी आणि काही औषधी घटकांच्या मिश्रणातून भालेराव यांनी इन्स्टंट सूप भुकटी तयार केली आहे.

परभणी जिल्ह्याच्या ग्रामीण भागात 

शौचालयाचा नियमित वापर न करणाऱ्या नागरिकांवर कारवाईची सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी केली आहे.

स्वच्छ भारत मिशन आणि ग्रामीण पाणी पुरवठा विभागांतर्गत अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. शासनाच्या विविध योजना ग्रामीण भागातल्या नागरिकांपर्यंत सक्षमपणे पोहोचवण्यासाठी टाकसाळे यांनी या बैठकीत आवश्यक त्या सूचना केल्या.

जालना नगरपालिकेच्या स्थायी समितीच्या 

अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापतीपदांसाठीची निवडणूक बिनविरोध झाली आहे. स्थायी समितीच्या अध्यक्षपदी नगराध्यक्ष संगीता गोरंट्याल यांची तर उपाध्यक्षपदी फरहाना अब्दुल अन्सारी यांची निवड झाली आहे.

फरहीन सय्यद अजहर, पूनम राज स्वामी, हरेश देवावाले, आमेरखान आणि संगीता बोबडे यांची विविध समित्यांच्या सभापतीपदावर तर नंदकिशोर गरदास, उषाबाई पवार, भास्कर दानवे यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली.

लातूर जिल्ह्याच्या पाण्याच्या आवश्यकतेनुसार

मांजरा धरणात उपलब्ध पाणीसाठा, त्यावर पिण्यासाठीच्या पाण्याचं आरक्षण, रब्बी हंगामात सिंचनासाठी सोडायचं पाणी या बाबींचा जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी आढावा घेतला. उपलब्ध पाणी काटकसरीने वापरलं जावं, पाण्याचा अपव्यय होणार नाही किंवा पाणी वाया जाणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश देशमुख यांनी यावेळी दिले.

नांदेड जिल्हा परिषेदतले अधिकारी 

तसंच कर्मचाऱ्यांनी माझी वसुंधरा अभियानांतर्गत आज पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनासाठी शपथ घेतली. सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर ठोंबरे यांनी सर्व अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांना ही शपथ दिली.
लातूर इथं जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी पी यांनी सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना हरित शपथ दिली. चाकूर जवळ रामवाडी झरी खुर्द या गावी वृक्ष चळवळीतले कार्यकर्ते तसंच सह्याद्री देवराई च्या सदस्यांनी ४०० वर्षापूर्वीच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील महावृक्षाजवळ वसुंधरेच्या रक्षणाची शपथ घेतली.
 
लातूर जिल्ह्यात ४०८ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी 
दाखल एकूण उमेदवारी अर्जांपैकी ९ हजार ९३८ अर्ज वैध ठरले आहेत. उपजिल्हाधिकारी गणेश महाडीक यांनी ही माहिती दिली. उमेदवारी अर्ज परत घेण्याची अंतिम तारीख ४ जानेवारी आहे. त्यानंतर या निवडणुकीचं चित्र स्पष्ट होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here