रेखा जरे हत्याकांड | बोठेच्या बंगल्याची झडती, रिव्हॉल्व्हर जप्त; लुकआऊट नोटीस जारी

196

अहमदनगर : यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा व सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे याच्या घराची शुक्रवारी पोलिसांनी झडती घेतली.

या झडतीत बोठे याचे रिव्हॉल्व्हर व इतर काही वस्तू जप्त करण्यात आल्या असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी सांगितले. जरे यांच्या हत्याकांडाचा उलगडा होताच बोठे फरार झाला. तो परदेशात पळून जाऊ नये, यासाठी पोलिसांनी विमानतळ व्यवस्थापनांना बोठे याच्याबाबतची लुकआऊट नोटीस जारी केली आहे.

परदेशात पळून जाण्याचा मार्ग बंद 

रेखा जरे यांची ३० नोव्हेंबर रोजी रात्री नगर-पुणे महामार्गावरील जातेगाव घाट परिसरात हत्या झाली होती. या हत्याकांडात पोलिसांनी आतापर्यंत पाच आरोपींना अटक केली आहे. या आरोपींकडून मिळालेल्या माहितीनुसार या हत्येची सुपारी बोठे व सागर भिंगारदिवे यांनी दिल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

भिंगारदिवे याला अटक झाली असली तरी बोठे मात्र फरार झाला. फरार होताना त्याने त्याचे मोबाईल घरीच ठेवले होते. पोलिसांनी मोबाईल जप्त केले आहेत, तसेच बोठे याच्या शोधासाठी विविध ठिकाणी पाच पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत.

शुक्रवारी दुपारी तपासी अधिकारी अजित पाटील यांच्या व एलसीबीच्या पथकाने बोठे याच्या नगर शहरातील बालिकाश्रम रोडवरील जिद्द या बंगल्याची झडती घेतली. यावेळी पोलिसांना बोठे याचे रिव्हॉल्व्हर मिळून आले. बोठे याच्याकडे शस्त्र परवाना आहे, तसेच तपासात महत्त्वपूर्ण ठरतील अशा काही वस्तूही मिळून आल्या आहेत.

कितीही पळाला तरी ..

हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार बोठे याचा पोलिसांकडून चौफेर शोध सुरू आहे. तो कुठे थांबू शकतो याचा अंदाज घेऊन पोलीस शोध घेत आहेत. येणाऱ्या काळात गरजेनुसार त्याचे बँक अकाउंटही गोठविले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

या हत्याकांडानंतर पसार झालेल्या बोठे याला कोण आश्रय देऊ शकते, याचीही माहिती पोलीस घेत आहेत. त्यामुळे कितीही पळाला तरी पोलीस बोठे याच्या मुसक्या आवळणारच हे निश्चित आहे.

पोलिसांच्या तपासाचे कौतुक

जरे यांची हत्या झाल्यानंतर अवघ्या २४ तासांत पोलिसांनी या घटनेचा उलगडा करीत मारेकऱ्यांसह इतर आरोपींना अटक केली, तसेच मुख्य सूत्रधाराचेही नाव समोर आणले. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी स्वत: या तपासात लक्ष घातले होते.

तपास अधिकारी अजित पाटील व स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल ककटे यांच्या पथकानेही मोठे परिश्रम घेतले. या गुन्ह्याचा जलदगतीने तपास झाल्याने पोलिसांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

बोठेच्या अटकेनंतरच होणार उलगडा

हत्याकांडात पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली असली तरी सुपारी देऊन ही हत्या का केली, हे अद्याप गुलदस्त्यात आहे.
जरे यांची हत्या का केली ही बाब बोठे यालाच माहीत असल्याचे अटकेत असलेला आरोपी सागर भिंगारदिवे याने पोलिसांना सांगितले. त्यामुळे बोठे याला अटक झाल्यानंतरच या हत्याकांडाचा खुलासा होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here