अहमदनगर : ‘यशस्विनी महिला ब्रिगेड‘ च्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या खून प्रकरणातील फरार असलेला मुख्य आरोपी पत्रकार बाळ बोठे याला अद्याप हुडकून काढण्यात पोलीस अपयशी ठरलेले आहेत.
बाळ बोठे यास अटक झाली तर नगरमधील ‘कथित हनी ट्रॅप‘ ची पाळंमुळं खणून काढण्यात पोलीस यशस्वी होतीलच यात शंकाच नाही, मात्र अद्याप बोठे फरार आहे हे वास्तव आहे.
दरम्यान पोलिसांनी पारनेरच्या न्यायालयात ‘स्टँडिग वॉरंट’ मिळवण्यासाठी अर्ज केला आहे. वॉरंट मिळाल्यानंतर पोलिसांना राज्यात आणि अन्य राज्यांतही आरोपीचा शोध घेण्यास मदत होणार आहे.
अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली. पोलिसांनी बोठे याच्या शोधासाठी पाच पथके नियुक्त केली असली तरी त्यांना अद्याप बोठेचा ठावठिकाणा लागलेला नाही.
सत्र न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे तर उच्च न्यायालयातही त्याने याविरोधात अपील करण्यात आलेले नाही तर तो सापडत देखील नाही.
त्यामुळे आता पोलिसांनी पुढील प्रक्रिया सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून अटकेसाठी स्थायी वॉरंट मिळण्यासाठी अर्ज करण्यात आला आहे. त्यावर सोमवारी सुनावणी होणार आहे.
बाळ ज बोठेचा पोलिसांनी ४० ठिकाणी शोध घेतला. नगर जिल्हा तसेच अन्य जिल्ह्यांतही पोलिस जाऊन आले. मात्र तो मिळू शकलेला नाही.
पोलिसांच्या हाती अनेक पुरावे लागलेले आहेत मात्र तपासकामी सदर माहिती गोपनीय ठेवण्यात आलेली आहे . पोलिसांचा ‘स्थायी वॉरंट’ अर्ज मंजूर झाला तर न्यायालयाचे हे वॉरंट सर्व पोलिसांना पाठविण्यात येईल.
त्यामुळे नगरच नव्हे तर अन्य कोठेही तेथील पोलिसांना आरोपी दिसला तर ते पोलिसही आरोपीला अटक करू शकतात. याशिवाय आरोपीचा फोटो आणि माहितीच्या आधारे नागरिकांनाही आवाहन करता येऊ शकते.
सापडत नसलेल्या आरोपीला पकडण्यासाठी ही एक प्रक्रिया असते. यापुढे जाऊन सीआरपीसी ८२ नुसार मालमत्ता जप्तीची कारवाई नंतर सुरू केली जाऊ शकते.
दरम्यान, या अगोदर पोलिसांनी जरे यांच्या घराची तीन-चार वेळा झडती घेतली आहे. यामध्ये बरीच माहिती आणि बोठे यास दोषी ठरवण्यासाठी पुरावे ठरतील अशा गोष्टी पोलिसांच्या हाती आल्या आहेत.
बोठे याच्या घराची झडती पोलिसांनी अगोदरच घेतलेली आहे. आतापर्यंतच्या तपासात बऱ्याच गोष्टी उघड झाल्याचे पोलिसांना सांगितले आहे मात्र बोठे हाती येईपर्यंत सदर माहिती गोपनीय ठेवण्यात आलेली आहे.
रेखा जरे यांच्या हत्येला ३० तारखेला एक महिना पूर्ण झाला त्यानिमित्त कुटुंबियांच्या पुढाकारातून ३० तारखेला संध्याकाळी कँडल मार्च आयोजित केला होता.
त्यामध्ये विविध संस्था-संघटनांनी भाग घेतला. कापड बाजारातील भिंगारवाला चौक ते माळीवाडा बसस्थानकाजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत हा कँडल मार्च नेण्यात आला आणि अनेक मान्यवरांची भाषणे झाली.