Rekha Jare Murder Case | रेखा जरे यांच्या मुलाने काढलेला ‘तो’ फोटो ठरला महत्वाचा ‘धागा’

231

नगर: ‘यशस्विनी महिला ब्रिगेड’ च्या अध्यक्षा व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या हत्या प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. हा तपास करताना जरे यांच्या मुलाने गाडीमधून आरोपीचा काढलेला फोटो तपासाचा महत्त्वपूर्ण ‘धागा’ ठरला आहे.

नगर-पुणे महामार्गावरील जातेगाव घाट शिवार येथे सोमवारी (३० नोव्हेंबर) रात्री आठ वाजताच्या सुमारास रेखा जरे यांची गळा चिरून हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर मारेकरी फरार झाले होते.

मात्र, गाडीला कट मारल्याच्या कारणावरून रेखा जरे यांच्याशी वाद घालणाऱ्यांपैकी एकाचा फोटो गाडीत बसलेल्या जरे यांच्या मुलाने आपल्या मोबाइलमध्ये काढला होता. पोलिसांनी हाच फोटो व्हायरल करून या हल्लेखोराबद्दल कोणाला माहिती असल्यास कळवण्याचे आवाहन केले होते. तसेच या हल्लेखोराचा स्वतंत्रपणे शोध घेण्यासाठी ६ पथकेही विविध ठिकाणी पाठवली होती.

व्हायरल केलेल्या फोटोमुळे पोलिसांच्या पथकांच्या शोध मोहिमेला यश येऊन तीन जणांना पोलिसांनी अटक केली. या तिघांनी दिलेल्या माहितीवरून आणखी दोन जणांना पोलिसांनी अटक केली व त्यानंतर या सर्वांची चौकशी केली असता रेखा जरे यांच्या हत्येची सुपारी देणाऱ्या मुख्य सूत्रधाराचे नाव समोर आले आहे. आता या सूत्रधाराच्या मागावर पोलीस असून त्यानंतर ही हत्या का झाली?, याचे कारण स्पष्ट होणार आहे.

हे आहेत आरोपी

१) पत्रकार बाळ ज. बोठे ( रा. बालिकाश्रम रोड, नगर) : मुख्य सूत्रधार, फरार

२) सागर उत्तम भिंगारदिवे (रा. शास्त्रीनगर, केडगाव, नगर)

३) फिरोज राजू शेख (रा. राहुरी, नगर)

४) ज्ञानेश्वर शिवाजी शिंदे (रा. श्रीरामपूर, नगर)

५) आदित्य सुधाकर चोळके (रा.कोल्हार, ता. राहाता, नगर)

६) ऋषिकेश वसंत पवार (रा. प्रवरानगर, राहाता)

फरारी सूत्रधाराचा शोध सुरू

रेखा जरे हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधारापर्यंत पोहचण्यात पोलिसांना यश आले आहे. तीनच दिवसांत पोलिसांनी प्रकरणाचा छडा लावला. नगमधील ज्येष्ठ पत्रकार बाळ ज. बोठे हे या हत्याप्रकरणात सूत्रधार आहेत व यातील आणखी एका आरोपीच्या मदतीने सुपारी देऊन बोठे यांनी ही हत्या घडवून आणल्याचे तपासात समोर आले आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी ही माहिती आज पत्रकार परिषदेत दिली. बोठे फरारी आहेत व त्यांच्या अटकेसाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. त्यांच्या घराची झडती घेऊन काही वस्तू जप्त करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here