मुंबई : गेल्या काही दिवसांपासून औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
त्यामुळे महाविकास आघाडीचे तळ्यात मळ्यात सुरु आहे. परस्पर विरोधी भूमिका मांडण्यात येत आहे.
राज्यात महाविकास आघाडीच्या माध्यमातून सत्तेवर असलेल्या शिवसेनेने औरंगाबादचे संभाजीनगर असे नामांतर करण्याबाबत शिवसेनेने आग्रही भूमिका घेतली आहे.
त्याच वेळी काँग्रेसने नामांतराला विरोध केला आहे. दरम्यान, औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी नामांतराच्या मुद्द्यावर भाष्य केले आहे. ते म्हणाले की, औरंगाबादचं नामांतर हा मुद्दा महाविकास आघाडी सरकारच्या अजेंड्यावरील विषय नाही.
त्यामुळे याबाबत वेगळं काही बोलण्याचा प्रश्नच येत नाही. टीव्ही नाईन मराठी या वृत्तवाहिनीशी बोलताना नवाब मलिक यांनी हे विधान केले आहे.
दरम्यान, महाविकास आघाडीला पाठिंबा देणारा मित्रपक्ष असलेल्या समाजवादी पक्षानेही औरंगाबादच्या नामांतराला विरोध केला होता.
अबू आझमी यांची भूमिका
औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावर प्रतिक्रिया देताना अबू आझमी म्हणाले होते की, शहरांची जिल्ह्यांची नावे बदलून काही फायदा नाही. नामांतर करून विकास होत नाही.
संभाजी महाराजांचे नाव द्यायचे असेल तर ते रायगड जिल्ह्याला द्या, त्यापेक्षा महाराष्ट्राचे नामांतर करा आणि छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्र असे नाव द्या, असा सल्ला अबू आझमी यांनी दिला होता.
नामांतर करायचं असेल तर नवे जिल्हे निर्माण करा. त्यांना नाव द्या. औरंगाबाद, अहमदनगर यांची नावे बदलून उपयोग नाही.