प्रजासत्ताक दिनानिमित्त महाराष्ट्राचा संत परंपरेवर आधारीत चित्ररथ राजपथावर दाखल होणार

272

नवी दिल्ली : यंदा प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी राजपथावर महाराष्ट्रातल्या संत परंपरेवर आधारित चित्ररथ असणार आहे. 

राजपथावर यावेळी दिसणाऱ्या महाराष्ट्राच्या चित्ररथाची पहिली झलक समोर आली असून सध्या या चित्ररथाचे काम अंतिम टप्प्यात आहे.

चित्ररथाच्या प्रारंभी वारकरी संप्रदायाचा पाया रचणारे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महारांजाची 8 फुटांची आसनस्थ मूर्ती आहे. त्यांच्या मुर्ती समोर ‘ज्ञानेश्वरी ग्रंथ’ दर्शविण्यात आला आहे.

हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि वारकरी संप्रदायाच्या इमारतीचे कळस असणारे संत तुकाराम महाराज यांची भेट दर्शविणारा चित्ररथ सामील होणार आहे.

प्रत्येकी 8 फुट उंचीचे दोन पुतळे उभारण्यात आले आहेत. या पाठोपाठ राज्यातील संतांचे व कोटयावधी भक्तांचे दैवत असणा-या पांडुरंगाची कटेवर हात असणारी 8.5 फुट उंचीची लोभस मूर्ती उभारण्यात आली आहे.

चित्ररथाच्या शेवटच्या भागात 8 फुट उंचीचा ‘संतवाणी’ हा ग्रंथ उभारण्यात आला आहे व यावर संतांची वचने लिहण्यात आली आहेत. या सर्व पुतळयांची बांधणी पूर्ण झाली असून त्यावर रंग काम सुरु आहे.

चित्ररथाच्या दोन्ही बाजूस संत एकनाथ, संत जनाबाई,  संत नरहरी, संत नामदेव, संत कान्होपात्रा, संत शेख महंमद,संत सावता, संत दामाजीपंत, संत गोरोबा, संत सेना, संत चोखामेळा यांच्या प्रतिकृती असणार आहेत.

गतवर्षी प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्राचा चित्ररथ नसल्यानं राजकारण तापले होते. दरम्यान, प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या संचलनामध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथ नेहमीच चर्चेचा विषय ठरला आहे.

महाराष्ट्राची उज्ज्वल परंपरा 

1980 मध्ये ‘शिवराज्याभिषेक’ या महाराष्ट्राच्या चित्ररथाने अव्वल क्रमांक मिळवला होता. तसेच 1983 मध्ये बैलपोळा हा महाराष्ट्राचा चित्ररथानेही क्रमांक पटकावला होता.

त्यानंतर 1993, 1994, 1995 अशा सलग तीन वर्षी महाराष्ट्राच्या चित्ररथांनी प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात क्रमांक पटकावला होता.

तसेच पंढरीच्या वारीवर साकारण्यात आलेल्या महाराष्ट्राच्या चित्ररथाने पहिला क्रमांक पटकावला होता. तसेच त्यानंतर 2018मध्ये साकारण्यात आलेल्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या चित्ररथाने पहिला क्रमांक पटकावला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here