भोपाळ : इंदौरमधील गर्भवतीच्या हत्या प्रकरणाचा सनसनाटी खुलासा झाला आहे. गर्भवती महिलेची सैनिक पतीनेच हत्या केल्याचं तपासात उघड झालं आहे.
धक्कादायक म्हणजे आठ महिन्यांची गरोदर असलेल्या पूजा अस्के हिची गेल्या आठवड्यात गळा दाबून हत्या करण्यात आली होती. आरोपी पतीला त्याच्या दोघा भावांनी हत्येसाठी मदत केली. त्यापैकी एक भाऊ पोलिसात जवान आहे.
पती सैन्यात, दीर पोलिसात
मध्य प्रदेशातील इंदौर पोलिसांनी पूजा हत्याकांडाचं गूढ उकललं आहे. आठ महिन्यांची गर्भवती असलेल्या पूजाचा मारेकरी दुसरा-तिसरा कोणी नाही, तर तिचा पतीच निघाला.
पूजाच्या पतीने त्याच्या दोघा धाकट्या भावांसह पत्नीची हत्या केली. त्यानंतर तो साळसूदपणाचा आव आणत राहिला. पूजाचा पती जितेंद्र अस्के 34 व्या बटालियन कंपनीचा कमांडर आहे. तर दीर राहुल अस्के पोलिस जवान आहे. त्याची पोस्टिंग छिंदवाडामध्ये आहे.
मध्य प्रदेशातील इंदौर शहरात मल्हारगंज भागात ही घटना घडली. कमला नेहरु कॉलनीतील रामदुलारी अपार्टमेंटमध्ये गेल्या शनिवारी पूजा उर्फ जान्हवी हिची गळा दाबून हत्या करण्यात आली होती.
दीरावर संशय
या प्रकरणात आधी तिच्या दीराचे नाव समोर आले. पोलिसांनी संशयातून दोन्ही दीरांना ताब्यात घेतले होते. पूजाचा नवरा जितेंद्र स्वतःला निर्दोष असल्याचे भासवत होता.
पोलिसांनी दीरांकडे कसून चौकशी केली असता आरोपींनी हत्येची धडाधड कबुली दिली. आपल्या मोठ्या भावानेच हत्येचा कट रचल्याचे धाकट्या भावांनी सांगितले.
आरोपी जितेंद्रचा दुसरा विवाह
पूजा ही आरोपी जितेंद्रची दुसरी पत्नी होती. धारमध्ये राहणाऱ्या अनू नावाच्या महिलेसोबत जितेंद्रचा पहिला विवाह झाला होता. तिला जितेंद्रपासून अपत्यही आहेत.
मात्र ही गोष्ट लपवून जितेंद्रने पूजा उर्फ जान्हवीसोबत दुसरा विवाह केला. पूजाला जितेंद्रच्या खोटारडेपणाविषयी समजताच भयंकर चीड आली. तिने थेट अनूला फोन लावला. त्यावरुन दोघींमध्ये वादावादी झाली.
पहिल्या पत्नीची आत्महत्येची धमकी
अनूने जितेंद्रला फोन करुन मुलांसह आत्महत्या करण्याची धमकी दिली. त्यामुळे घाबरलेल्या जितेंद्रने घरी धाव घेतली. तिथे जितेंद्रचा पोलीस भाऊ राहुल आणि मावसभाऊ नवीन आधीच पोहोचले होते. त्यावेळी तिघांनी मिळून पूजाचा काटा काढण्याचा कट रचला.
राहुल आणि नवीन लगेचच पूजाच्या घरी गेले. तिथे दोघांनी तिची गळा दाबून हत्या केली. पूजाच्या नातेवाईकांनी जितेंद्रवर गंभीर आरोप केले होते. मात्र पोलिसांनी दीर राहुल आणि नवीन यांना अटक केली.
जितेंद्रने मात्र आपल्याला काहीच माहित नसल्याचा दावा केला. मात्र चौकशीत दोन्ही भावांनी दादाची पोलखोल केली. पोलिसांनी मुख्य आरोपी जितेंद्र अस्के यालाही बेड्या ठोकल्या आहेत. मल्हारगंज पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.