आयुष्याच्या उत्तराधार्त जीवनसाथी सोबत असावा म्हणून जोडीदार निवडला आणि तो जर गुन्हेगार निघाला तर आयुष्याच्या उत्तरार्धात पश्चाताप करायची वेळ येते.
अशीच एक घटना समोर आली आहे, मोनिका मलिक असे ह्या लुटारू नवरीचे नाव असून उत्तर प्रदेशातील गाझियाबाद पोलिसांनी तिला अटक केली आहे.
कारण तिला विवाह करण्याचे जणू व्यसनच लागले होते. फक्त १० वर्षात तिने तब्बल आठ जणांशी संसार थाटला मात्र काही दिवस संसार करून ती घरातील सर्व दागिने आणि रोख रक्कम घेऊन फरार होत होती.
फसवणूक झाल्याप्रकरणी तिचा आठवा पती जुगल किशोर यांनी तिच्याविरोधात फिर्याद दिली होती. जुगल किशोर यांचे वय तब्बल ६६ वर्षे असून त्यांना देखील चुना लावून ही अशीच फरार झाली होती मात्र आता तिला गजाआड करण्यात आले आहे.
उपलब्ध माहितीनुसार, लुटारू नवरीचे नाव मोनिका मलिक असून दिल्ली येथील खन्ना विवाह संस्थेशी तिने संपर्क साधला आणि आपले प्रोफाइल त्यांच्याकडे रजिस्टर केले.
जुगल किशोर हे गाझियाबाद येथील रहिवासी आहेत. गेल्यावर्षी त्यांच्या पत्नीचे निधन झाल्याने आणि त्यांचा मुलगाही वेगळे राहू लागल्याने त्यांनी दुसरे लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.
त्यांची मेट्रोमोनियल साईटच्या वतीने जुगल किशोर आणि मोनिका मलिक यांची भेट घडवण्यात आली. यावेळी तिने आपण घटस्फोटित असल्याचे सांगितले होते.
सुरुवातीला काही काळ डेटींग केल्यावर जुगल किशोर आणि मोनिका मलिक यांनी 2019 मध्ये या दोघांनीही न्यायालयात लग्न केले.
उतरत्या वयात सहचारिणी मिळाल्याने जुगल किशोर आनंदी होते, मात्र त्याचवेळी नवीन नवरीच्या डोक्यात वेगळाच प्लॅन शिजत होता.
लग्न झाल्यावर दोन महिन्यांतच ही लुटारू नवरी घरातून दागिने आणि रोख रक्कम घेऊन फरार झाली. यानंतर जुगल किशोर यांनी संबंधित मेट्रोमोनियल साईटशी संपर्क साधला.
मात्र त्यांनी हात वर केले तसेच जुगल किशोर यांनाच खोट्या गुन्ह्यात अडकवू असे धमकावले. याच मॅट्रिमोनी ऑफिसमधून त्यांना मोनिकाच्या पहिल्या पतीसंदर्भात माहिती तर मिळाली मात्र हा तिचा नेहमीचा धंदा असल्याचे देखील समजले.
जुगल किशोर यांना आपल्या पत्नीचा इतिहास ऐकून धक्काच बसला आणि त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि मोनिका विरोधात तक्रार नोंदवली.
पोलिसांनी तपास केला असता या नवरीने 10 वर्षांत तब्बल 8 लग्न केल्याचे आणि सर्वांना याच पद्धतीने लुटल्याची धक्कादायक माहिती समोर आली.
विशेष म्हणजे हे सर्व विवाह खन्ना विवाह संस्थेनेच निश्चित केले होते. यानंतर पोलिसांनी मोनिका, तिचे कुटुंबीय आणि मेट्रोमोनियल संस्थेविरोध आयपीसी कलम 419, 420, 380, 384, 388 आणि 120 बी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
मोनिका मलिक सध्या पोलिसांच्या ताब्यात असून इतरही आणखी कोणाची फसवणूक झाली असेल तर त्यांनी पुढे येऊन तक्रार दाखल करावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे .