म्हसरूळ (जि.नाशिक) : आपल्या अनैतिक संबंधात अडसर ठरत असलेल्या पतीचा काटा काढल्याचे, भावाचा काटा काढल्याचे आपण नेहमी ऐकतो वाचतो.
सोलापूर जिल्ह्यातील घटना ताजी असताना अशीच धक्कादायक घटना नाशिक जिल्ह्यात घडली आहे.
जर जन्म देणारी जननीच आपल्या पोटच्या गोळ्याची वैरिण झाली तर त्या निष्पाप लेकराला कोण वाचवेल?
आई आपल्या लेकराला मारून टाकू शकते ही कल्पनाही करवत नाही.
केवळ स्वत:च्या अनैतिक संबंधासाठी ज्या लेकराला आपल्या उदरात नऊ महिने वाढवून कळा सोसून जन्म दिला.
त्याचाच कर्दनकाळ ही माता बनली आहे. आडगाव परिसरात हा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे.
निर्दयी मातेनेच रचला कट
गेल्या २१ डिसेंबरला घराबाहेर खेळताना पडल्याने जखमी झालेल्या नांदूर नाका येथील सातवर्षीय मुलास त्याच्या आईने जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते.
डॉक्टरांनी तपासून त्यास मृत घोषित केले होते. त्यानुसार आडगाव पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
मात्र पोलिसांच्या चौकशीत हा संतापजनक प्रकार उघड झाला आहे.
संशयित सोमनाथ ऊर्फ योगेश वसंत कुऱ्हाडे (वय २२, रा. साईनगर, नांदूरगाव) याचे एका २४ वर्षीय महिलेसोबत अनैतिक संबंध आहेत.
तिला पहिल्या पतीपासून झालेल्या मुलाचा सांभाळ करावा लागेल व तो अनैतिक संबंधात अडसर निर्माण होता.
सोमनाथ हा त्या मुलास नेहमी कमरेच्या बेल्टने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत होता.
विशेष म्हणजे आई समोर मारत असल्याचे तपासात धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
२१ डिसेंबरला रात्री साडेनऊच्या सुमारास त्याने या मुलास राहत्या घराच्या भिंतीवर डोके जोरात आपटले.
दुसऱ्या दिवशी (दि. २२) सकाळी मुलाच्या आईने त्याला जखमी अवस्थेत चुकीचे नाव सांगून जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते.
चौकशी केली असता
त्या वेळी तिने सर्व प्रकार माहीत असतानाही वैद्यकीय अधिकाऱ्यांना खोटी माहिती दिली होती.
विशेष म्हणजे पोटचा मुलगा मृत झाल्यानंतरही मृतदेह ताब्यात न घेता ती पळून गेली.
त्यामुळे संशय बळावल्याने पोलिसांनी अधिक चौकशी केली असता, खरा प्रकार समोर आला.
या प्रकरणी आडगाव पोलिसांत दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.
दोघांना अटक करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक इरफान शेख तपास करीत आहेत.
फरारी प्रियकर-प्रेयसीला अटक
अनैतिक संबंधांमध्ये अडसर ठरणाऱ्या सातवर्षीय बालकाची हत्या करून फरार झाले होते.
या नराधम प्रियकर व त्यास मदत करणाऱ्या निर्दयी मातेस आडगाव पोलिसांनी जेरबंद केले आहे.
आडगाव परिसरात हा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे.