Sachin Vaze Arrested | सचिन वाझे यांना अखेर अटक | 13 तासांच्या झडतीनंतर NIAची कारवाई

175
Sachin waze

मुंबईः मुकेश अंबानींच्या अँटेलिया बंगल्याशेजारी स्कॉर्पिओमध्ये स्फोटके ठेवल्याच्या प्रकरणात तब्बल 13 तासांच्या चौकशीनंतर एपीआय सचिन वाझे (Sachin Vaze) यांना NIA कडून अटक करण्यात आली आहे.

शनिवार (13 मार्च) सकाळी 11 वाजल्यापासून रात्री 11.30 वाजेपर्यंत त्यांची चौकशी सुरू होती, अखेर 13 तासांच्या चौकशीअंती त्यांना अटक करण्यात आली आहे.

मुंबईतील मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाबाहेर स्कॉर्पिओ कारमध्ये आढळलेल्या स्फोटकांप्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) ही कारवाई केली आहे.

एनआयए कडून सचिन वाझे यांची शनिवारी दिवसभर कसून चौकशी करण्यात आली. कंबाला हिल येथील एनआयए कार्यालयात सचिन वाझे सकाळी ११.३०च्या सुमारास गेले होते.

तिथे तब्बल १२ तास मॅरेथॉन चौकशी केल्यानंतर रात्री ११ वाजून ५० मिनिटांनी वाझे यांना अटक करण्यात आली आहे. याबाबत एनआयएच्या एका अधिकाऱ्याने अधिकृत माहिती दिली आहे.

वाझे यांना रविवारी सुट्टीकालीन कोर्टात हजर केले जाण्याची शक्यता आहे. मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाबाहेर कारमिखाइल रोडवर स्फोटकांसह स्कॉर्पिओ कार पार्क करण्यात आली होती.

या प्रकरणात सहभाग असल्याच्या संशयावरून सचिन वाझे यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. भारतीय दंड विधानाच्या २८६, ४६५, ४७३, ५०६ (२), १२० ब आणि ४ (अ) (ब) (इ) तसेच स्फोटक पदार्थ अधिनियम १९०८ अन्वये सचिन वाझे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाझे यांच्यावरील अटकेच्या कारवाईने एकच खळबळ उडाली असून हा राज्य सरकारसाठीही मोठा धक्का मानला जात आहे. वाझे यांच्यावर या प्रकरणात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर आरोप केले होते.

सचिन वाझे यांना निलंबित करून अटक करा अशीही मागणीही त्यांनी केली होती. मात्र, आधी चौकशी मग शिक्षा असा पवित्रा घेत सरकारने वाझे यांची केवळ खात्यांतर्गत बदली केली होती. आता वाझे यांना एनआयएने अटक केल्याने हे प्रकरण अधिकच गंभीर बनले आहे.

दरम्यान, अंबानी यांच्या घराजवळ ज्या कारमध्ये स्फोटकं ठेवण्यात आली होती त्या कारचा मालक मनसुख हिरन यांच्या मृत्यूप्रकरणी एटीएस मार्फत सचिन वाझे यांचा जबाब नोंदवण्यात आला होता.

त्यापाठोपाठ एनआयएने स्फोटकांप्रकरणी सचिन वाझे यांची चौकशी सुरू केली होती. त्यामुळे संभाव्य अटक टाळण्यासाठी वाझे यांनी ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयात शुक्रवारी अटकपूर्व जामीन अर्ज केला होता.

या अर्जावर शनिवारी सुनावणी झाली असता वाझे यांना अंतरिम संरक्षण देण्यास ठाणे न्यायालयाने नकार दिला होता. प्रथमदर्शनी मनसुख यांच्या मृत्यू प्रकरणात वाझे यांचा सहभाग असल्याचे दिसते असेही न्यायालयाने यावेळी नमूद केले होते.

दुसरीकडे वाझे यांची एनआयएकडून चौकशी सुरू होती. मुंबईतील एनआयए कार्यालयात वाझे यांच्यावर एनआयएच्या पथकाने प्रश्नांचा भडीमार केला. त्यानंतर रात्री उशिरा वाझे यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली.

कोर्टाने नोंदवले ‘हे’ महत्त्वाचे निरीक्षण

मनसुख हिरन मृत्यू प्रकरणात सचिन वाझे यांच्या विरोधात प्रथमदर्शनी पुरावे दिसत असल्याचे नमूद करत ठाणे न्यायालयाने वाझे यांना अंतरिम संरक्षण नाकारले आहे.

मनसुख हिरन यांच्या मृत्यूनंतर पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाला असे दिसते असे निरीक्षणही कोर्टाने नोंदवले आहे.

अतिरिक्त सरकारी वकील विवेक कडू यांनी सचिन वाझे यांना अंतरिम संरक्षण देण्यास कोर्टात आक्षेप नोंदवला व एटीएसकडून करण्यात आलेल्या कार्यवाहीची माहिती दिली.

त्याआधारावर कोर्टाने वाझे यांना अंतरिम संरक्षण नाकारले व वाझे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर १९ मार्च रोजी पुढील सुनावणी ठेवली. पुढील सुनावणीत कोर्ट एटीएसचं म्हणणं ऐकून घेणार आहे.

सचिन वाझे यांनी शुक्रवारी ठाणे न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. मनसुख हिरन प्रकरणी एटीएसने जो एफआयआर दाखल केला आहे.

त्यात कोणाच्या नावाचा उल्लेख नसल्याकडे लक्ष वेधत वाझे यांनी अटकेपासून संरक्षण मागितले आहे. त्यामुळे आता १९ मार्च रोजी होणारी सुनावणी महत्त्वाची ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here