Sachin Vaze: सचिन वाझेंनी चौकशीत घेतली बड्या अधिकाऱ्यांची नावे | दोन्ही गाड्यांच्या चालकांची ओळखही पटली

417
Sachin waze

मुंबई: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ कारमध्ये आढळलेल्या स्फोटकांप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) अटक केलेल्या सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे (Sachin Vaze) यांना विशेष न्यायालयाने २५ मार्चपर्यंत NIA कोठडी सुनावली आहे. 

त्याचवेळी ही स्फोटके पेरण्यामागील मास्टरमाईंड शोधण्यासाठी एनआयएने मुंबई गुन्हे अन्वेषण शाखेच्या गुन्हे गुप्त वार्ता (सीआययू) विभागातील अधिकाऱ्यांची कसून चौकशी सुरू केली आहे.

सचिन वाझे यांच्या नेतृत्वाखाली काम करीत असलेले दोन अधिकारी व दोघा वाहनचालकांची साडेनऊ तास चौकशी करण्यात आली. आणखीही काही अधिकाऱ्यांना चौकशीसाठी बोलावले जाण्याची शक्यता आहे.

अंबानींच्या घराजवळ कार  नेऊन ठेवण्यामागील उद्देश काय होता? भीती दाखवून त्यांना काय साध्य करायचे होते, याचा तपास  सुरू आहे.

केवळ स्वतःच्या हिमतीवर वाझे इतके मोठे धाडस करू शकत नाहीत, त्यांच्या पाठीशी वरिष्ठ अधिकारी व राजकीय वरदहस्त असल्याचा अधिकाऱ्यांना संशय आहे. ते कोणाच्या संपर्कात होते, याची माहिती घेतली जात आहे. याचदरम्यान आता महत्वाची माहिती एनआयएच्या हाती लागल्याचे सांगण्यात येत आहे.

एका मराठी वृत्तावाहिनीने दिलेल्या वृत्तानूसार,  NIA ने या कटात सहभागी असलेल्या स्कॉर्पिओ आणि इनोव्हा या दोन्ही गाड्यांच्या चालकांची ओळख पटवली आहे.
NIA लवकरच या दोन्ही चालकांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करणार आहे. तर दुसरीकडे सचिन वाझे यांनी एनआयएच्या चौकशीदरम्यान मुंबई पोलीस दलातील एका बड्या अधिकाऱ्याचे नाव घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता याप्रकरणातील आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ जिलेटिनच्या कांड्या असलेल्या स्कॉर्पिओच्या पाठीमागे पांढऱ्या रंगाची इनोव्हा सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत होती. ही गाडी क्राईम ब्रँचच्याच वाझे कार्यरत असलेल्या गुन्हे गुप्त वार्ता (सीआययू)ची असल्याचे स्पष्ट झाले आहे. एनआयएच्या अधिकाऱ्यांनी रविवारी ती गाडी जप्त केली.

हत्येचाही गुन्हा दाखल करणार

सचिन वाझे यांच्यावर ज्वालाग्राही पदार्थ बाळगणे, घातपाताचा कट रचणे आदी गुन्हे दाखल आहेत. त्याचबरोबर मनसुख हिरेन यांच्या हत्येच्या गुन्ह्याची कलमे  लवकरच लावली जातील, असे सुत्रांनी सांगितले.

गुन्ह्यासाठी पोलीस यंत्रणेचा वापर

सचिन वाझे यांनी गंभीर गुन्ह्याच्या कामात पोलीस वाहने, आपल्या अधिपत्याखालील अधिकारी, कर्मचारी आणि अन्य यंत्रणेचा सर्रास वापर केला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संमतीशिवाय हे करणे शक्य नसल्याचे पोलीस वर्तुळातून सांगण्यात येते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here