काही दिवस शांततेने सुरू असलेल्या दिल्लीतील आंदोलनाला प्रजासत्ताक दिनी हिंसाचाराचे गालबोट लागले.
रस्त्यावर कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्यासाठी उभ्या असलेल्या पोलीसांच्या अंगावर ट्रॅक्टर घालून त्यांना जीवे मारण्याचा माथेफिरूपणा काही लोकांनी केला.
इतकेच नव्हे तर प्रजासत्ताकाच्या पवित्र दिवशी अनेक जण झुंडीने लाल किल्ल्यावर घुसले आणि आपले धार्मिक निशाण तिरंग्याच्या शेजारी लावण्याचे राष्ट्रद्रोही कृत्य केले.
सारा देश प्रजासत्ताक दिनाची झालेली विटंबना पाहून हळहळत होता. आंदोलन करणे हा शेतकऱ्यांचा हक्क आहे, गेली ३५ वर्षे चळवळीत मी तो हक्क बजावत आलो आहे पण प्रजासत्ताक दिनी घडलेला प्रकार अभूतपूर्व होता ते आंदोलन नव्हते तर पूर्वनियोजित घातलेला धुडगूस होता.
कृषी कायद्याच्या विरोधात सुरूवातीला काहीसे प्रामाणिकपणे चाललंय असे वाटणारे आंदोलन दिवसागणिक दिशाहीन होत गेले. अनेक दिवस चाललेल्या चर्चेतून तीन कायद्याबाबत सरकार सुधारणेची लवचिक भूमिका घेत असताना तथाकथित ६० हून अधिक शेतकरी नेते ताठर भूमिका घेवू लागले.
यावरून या आंदोलनाच्या आड लपलेले राजकारण उघड झाले. इंग्लीश गाणं गाणारी पॉप स्टार रीहाना हीचे या आंदोलनावरील ट्वीट वजा भाष्य हा राजकारणाचाच एक भाग आहे.
- सुरुवातीला मला वाटले रीहाना ही कोणीतरी आंतरराष्ट्रीय ख्यातीची अर्थशास्त्रज्ञ आहे की काय? बयेनं भारतीय शेतकऱ्यांच्या आंदोलनाची दखल घेतली आहे म्हणजे निश्चितच तिच्या कडे शेतकरी प्रश्नाविषयी काही तरी भलेबुरे विचार असतील म्हणून मी माध्यम चाळली तर बया चक्क इंग्लिश गाणी गाणारी निघाली.
गुगलबाबाने सांगितले की अर्धनग्न अवस्थेत गाणारी ही पॉप गायिका तब्बल ४४०० कोटी ची मालकीण आहे. फोर्ब्ज मासिकाने जगातील १०० प्रभावशाली महिलात २०२० साली हीची निवड केली होती.
फॅशन व्यवसायात हीच बऱ्यापैकी नाव आहे. आपल्या व्यस्त व्यवसायातून रीहानाला गाझीपूर सीमेवर बसलेला माझा शेतकरी भाऊ दिसला हे बघून क्षणभर मला तीचं कवतुक वाटलं.
आपल्या ४४०० कोटीच्या प्रचंड संपत्ती मधून बया काही कोटी रूपये आंदोलनाला मदत म्हणून पाठवते की काय असे वाटत असतानाच प्रसार माध्यमांनी बातमी दिली की दिल्ली आंदोलनावर दोन शब्द बोलायला या बयेने १८ कोटी रूपये घेतले आहेत !!
शंका घ्यायला जागा आहे कारण या आधी सामाजिक आंदोलनावर आपली बुध्दी पाजळल्याची उदाहरणे मला दिसली नाहीत. काही महिन्यांपूर्वी चीनचे सैनिक भारतीय भूमीचा लचका तोडण्यासाठी आत शिरले होते तेंव्हा या घुसखोरी विरोधात तोंड उघडताना ही बया दिसली नाही.
तैवान कित्येक वर्षे झाली स्वतंत्र राष्ट्र आहे पण चीन त्याच्या स्वातंत्र्याला मान्यता द्यायला तयार नाही. हाँगकाँगचे नागरीक अनेक वर्षे चीनच्या जोखडातून मुक्त होण्यासाठी धडपडत आहेत. त्यांना स्वतंत्र राष्ट्र म्हणून जगायचे आहे.
त्यासाठी तेथील लोक वरचेवर रस्त्यावर उतरून आंदोलन करीत असतात. त्यांच्याबद्दल रिहाना या गानकोकिळेला कंठ फुटल्याचे कधी ऐकीवात आले नाही किंवा या दडपलेल्या जनतेसाठी घेतलेल्या एखाद्या चॅरीटी शो साठी बयेन नृत्य केल्याचे आढळले नाही.
जगाचे तापमान वाढून निसर्गचक्रात बदल होवून जगभर वादळ आणि महापूराने शेतकरी उद्ध्वस्त होतोय. त्या विरोधात या बयेने शेतकऱ्यांच्या बाजूने चार सहानुभूतीचे शब्द बोलल्याचे कधी कानी पडले नाही.
अन्नावाचून आफ्रिकन देशांतील आपले हजारो नीग्रोवंशीय बांधव तडफडून मरत असताना रिहानाच्या ह्रदयाला पाझर फुटल्याचे कधी दिसले नाही. शेती तोट्यात गेल्याने कर्जबाजारी झालेल्या भारतातील लाखो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.
या विषयी बोलायला या बयेची दातखीळ बसली होती की काय?…. अचानक भारतीय प्रजासत्ताक दिनादिवशी झालेल्या विटंबनेमुळे अवघा भारत व्यथित असताना आमच्या जखमेवर मीठ चोळणारे वक्तव्य रिहानाने करावे या पाठीमागील षडयंत्र ओळखायला फार काही मेंदूला ताण द्यायची गरज नाही.
आंदोलनाच्या आडून देशात गोंधळ माजवणाऱ्या लोकांनीच रिहानाला सुपारी दिली असणार. प्रजासत्ताक दिनीच्या दंगलीने दिल्ली आंदोलनाने सहानुभूती पूर्णपणे गमावली आहे.
गोंधळ माजवणारे राजकीय लोक उघड्यावर पडले आहेत. त्यांच्या आब्रूची लक्तरे प्रसारमाध्यमांनी जगभर दाखवली आहेत. आपली गेलेली पत झाकण्यासाठी राजकीय मंडळींनी रिहानासारख्या नामक परदेशी ठिगळाची मदत घ्यावी हे अधिकच केविलवाणं दिसतं आहे.
आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्यांना गल्लीत कोण ओळखत नाही. दिल्लीत कोण विचारत नाही. त्यामुळे पैसे देऊन का होईना रिहानासारखी गायिका बोलावून आंदोलनाचे तुणतुणे अजून काही दिवस वाजवत राहण्यापलिकडे दुसरा पर्याय या कावेबाजापुढे नाही…!
तुम्ही शोले या गाजलेल्या चित्रपटातील मेहबूबा ओ मेहबूबा या गाण्याची दृष्ये बघितली आहेत काय? गब्बर सिंग या कुख्यात दरोडेखोराला एक टोळी चोरून शस्रे पुरवत असते पण पोलीसांच्या नजरेतून वाचण्यासाठी ही टोळी नाचगाण्याच्या काफील्याचा वेष धारण करून जंगलात जाऊन गब्बर सिंगला शस्त्रे पुरवते. या काफिल्यातही रिहानासारखी थिरकणारी नृत्यांगना आहे.
गाणे संपल्यानंतर जय आणि वीरू दारूगोळा पेटवून देवून गब्बरसिंगची रसद तोडतात. शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्यावर दरोडा घालायला आलेल्या टोळीतील पैसे देऊन आणलेली नृत्यांगना या पलिकडे रिहानाला फारसे महत्त्व नाही.
भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि लतादीदींनी या बयेला फटकारून योग्य तेच केले आहे. सचिन आम्ही भारतीय शेतकरी तुझ्या बरोबर खांद्याला खांदा लावून उभे आहोत कोणी काही ही म्हणू दे तू असाच या राष्ट्रविरोधी टोळीला फटकावत रहा.
दीदी आपण गायलेल्या ” ए मेरे वतन के लोगो जो शहीद हुये उनकी जरा याद करो कुर्बानी…” या अजरामर गाण्यापुढे अशा अनेक टिटव्यांची टिवटिव निष्प्राण होवून पडते…
शब्दांकन –
आमदार सदाभाऊ खोत
साभार : फेसबुक