सीएमओच्या ट्विटर अकाउंटवर ‘संभाजीनगर’ | बाळासाहेब थोरात यांची तीव्र नाराजी

169

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यालयाकडून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या एका पत्रकावरून महाविकास आघाडीमध्ये मतभेदाची ठिणगी पडली आहे.

या पत्रकात औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर करण्यात आल्यामुळं काँग्रेस संतापली आहे. ‘सरकारी कामकाज हा कायदेशीर दस्तऐवज असतो, याचे भान बाळगावे,’ अशी संतप्त प्रतिक्रिया महसूलमंत्री व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.

औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराच्या नामांतराचा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून ऐरणीवर आला आहे. महाविकास आघाडीच्या घटक पक्षांमध्ये या मुद्द्यावरून मतभेद आहेत.

शिवसेना नामांतराबद्दल आग्रही आहे तर, काँग्रेसचा त्यास विरोध आहे. ही संधी साधून भाजपनं हा मुद्दा लावून धरला आहे.

CMO Maharashtra
@CMOMaharashtra

Jan 6, 2021

Replying to @CMOMaharashtra

मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज पुढीलप्रमाणे निर्णय घेण्यात आले. #मंत्रिमंडळनिर्णय

त्यातच मुख्यमंत्री कार्यालयाच्या ट्विटर अकाउंटवरून राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयाची माहिती देताना औरंगाबादचा उल्लेख ‘संभाजीनगर’ करण्यात आल्यामुळं काँग्रेस कमालीची संतप्त झाली आहे. बाळासाहेब थोरात यांनी तात्काळ ट्वीट करून नाराजी बोलून दाखवली आहे.

‘महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार हे किमान समान कार्यक्रमावर चालते, भारतीय राज्यघटनेची मूलतत्त्वे हा किमान समान कार्यक्रमाचा गाभा आहे.

सामाजिक सलोखा टिकून राहावा यासाठी कोणत्याही शहराच्या नामांतरणाला आमचा ठाम विरोध आहे,’ असं थोरात यांनी ठणकावून सांगितलं आहे.

नाव बदलण्यास काँग्रेसचा विरोध

राज्यातील महाविकास आघाडी सरकार किमान समान कार्यक्रमावर आलेले आहे. औरंगाबाद विभागाच्या विभागीय आयुक्तांनी अहवाल दिलेला असला तरी काँग्रेसची ही भूमिका नाही.

औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याचा विषय किमान समान कार्यक्रमात नाही. नाव बदलण्याचा विषयावर आमचा विश्वास नाही, असंही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी म्हटलंय.

शिवसेनेच्या मागणीला राज्य सरकारमध्ये सहकारी पक्ष असलेल्या काँग्रेसनं विरोध केला आहे. नाव बदलणं हा काँग्रेसचा कार्यक्रम नाही, अशा गोष्टींना विरोध राहील, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केलं आहे.

विकास करण्याला आमच्याकडून प्राधान्य राहील. महाविकास आघाडी सरकार किमान समान कार्यक्रमावर स्थापन झालं आहे.

शिवसेना आपल्या भूमिकेवर ठाम

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतंच केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री हरदिप पुरी यांना पाठवत औरंगाबाद विमानतळाचं छत्रपती संभाजी महाराज असं नामांतर करण्याची मागणी केली आहे.

त्याचबरोबर शिवसेनेचे नेते अरविंद सावंत यांनी काँग्रेसला औरंगजेब तुमचा आदर्श आहे का? असा रोखठोक सवाल केला आहे. त्यामुळे शिवसेना औरंगाबाद शहराच्या नामांतराच्या भूमिकेवर ठाम असल्याचं स्पष्ट झालं आहे.

सर्वसामान्यांच्या आनंदासाठी काम करावं

सरकार म्हणून सर्वसामान्यांच्या आनंदासाठी काम करावं, तेढ निर्माण करण्याचं काम नको. आमचा सत्तेत समान वाटा आहे.

काँग्रेसचा कोणत्याही शहराच्या नामांतराला विरोधच आहे, महाविकास आघाडीचं ध्येय सर्वसामान्यांचं कल्याण करणं आहे, असं थोरातांनी स्पष्ट केलं.

तीन पक्षांमध्ये मतमतांतरं होऊ शकतात, पण याचा सरकारवर काहीही परिणाम नाही. चर्चेने सर्व प्रश्न सोडवू. संजय राऊत यांनी तिन्ही पक्ष एकत्र कसे राहतील, याची अग्रलेखातून काळजी घेतली, असंही बाळासाहेब थोरात म्हणाले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here