संभाजीनगर नामांतर शिवसेनेसाठी ‘अजेंडा तर महाविकास आघाडीचा ‘पायावर धोंडा’

352

महाविकास आघाडीधील शिवसेना आणि काँग्रेस या दोन सत्ताधारी पक्षात औरंगाबाद शहराच्या नामांतराच्या मुद्द्यावरून वाद पेटला आहे.

काँग्रेस व राष्ट्रवादीचा विरोध नामांतराला असला तरी संजय राऊतांनी मात्र कॉंग्रेसच्या मनात संभाजी महाराज आहेत, असे सांगुन कॉंग्रेसच्या विरोधाची धार कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. 

बाळासाहेब थोरात व अजित पवारांनी थेट आणि उघड विरोध करताना मिनिमम प्रोग्राम असा नाही असे सांगितले आहे.हे सर्व घडत असताना मुख्यमंत्री ठाकरे यांच्या (सीएमओ) कार्यालयाने सलग दोन दिवस औरंगाबाद शहराचा संभाजीनगर असा उल्लेख केला.

यावरून काँग्रेसने तीव्र शब्दांत आक्षेप घेत महाविकास आघाडी बनविताना शहरांच्या नामांतरांचा विषय हा किमान समान कार्यक्रमाचा भाग नव्हता.

तुमचा अजेेंडा असेल पण आमचा मिनिमम प्रोगाम असा नव्हताचे असे सांगुन टाकले. शहरांची नावे बदलून विकास होत नाही, अशी टीकाही केली आहे.

औरंगाबादचे नाव बदलून संभाजीनगर करण्यास काँग्रेसचा विरोध आहे आणि पुढेही राहणार असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले आहे.

तसेच शहराचे नाव बदलून विकास होत नसतो, असा टोलाही त्यांनी अप्रत्यक्षरित्या मित्रपक्ष शिवसेनेला लगावला होता. त्याला मुख्यमंत्र्यांनी महाविकास आघाडीचा समान कार्यक्रम नसला तरी आमचा हक्काचा मुद्दा असल्याचे सांगत जोरदार प्रत्युत्तर दिले.

संभाजीनगर असा उल्लेख करण्यात नवीन ते काय? आम्ही वर्षानुवर्षे तेच लिहीत-बोलत आलो आहे आणि तेच करत राहणार असे सांगुन टाकले.

औरंगजेब काही सेक्युलर नव्हता. त्यामुळे आमच्या समान किमान कार्यक्रमाच्या अजेंड्यात जो काही सेक्युलर हा शब्द आहे, त्यात औरंगजेब बसत नाही, असे जोरदार प्रत्युत्तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस पक्षाला दिले आहे.

या दणकेबाज डायलॉग नंतर सध्या काँगे्रस नेते अद्यापतरी आपले तोंड उघडून जाहीर मतप्रदर्शन केलेले नाही. त्यामुळे काँगे्रस खदखदत असली तरी धमकावण्यापलिकडे काही करणार नाही याची शिवसेनेला पूर्ण खात्री आहे.

कारण कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या तयारीत असताना औरंगाबाद नामांतराचा विषय मंत्रीमंडळापूढे चर्चेसाठी आणावा आणि जर विरोध झाला तर सर्व जबाबदारी काँगे्रस आणि राष्ट्रवादीवर ढकलता येईल आणि जर दोघापैकी एकाने विरोध केला तर विषय ताणून ठेवता येईल हा सेनेचा सुप्त मनसुबा आहे.

खरेतर औरंगाबाद शहराच्या नामांतराचा मुद्दा गेल्या 20 वर्षापासून चर्चेत आहे. स्व.बाळासाहेबांनी जनतेच्या मनात संभाजीनगर कोरुन ठेवलेले आहे.

त्यावर फक्त सेनेला शिक्कामोर्तब करायचे आहे. शिवसेना जर बाळासाहेबांनी दिलेली ही शिदोरी वाया घालवली आणि सत्तेत असूनही नामांतराची संधी व्यर्थ घालविली.

एका अर्थाने शिवसेनेसाठी संभाजीनगर नामांतर अजेंडा असला तर महाविकास आघाडीने प्रतिष्ठेचा विषय केला तर पायावर धोंडा ठरणार आहे. कारण महाविकास आघाडी या मुद्यावर आमने सामने आली आहे.

तर महापालिका निवडणूकीत भाजपा अब्रुचे धिंडवडे काढल्याशिवाय राहणार नाही, याची पूरती जाणीव सेनेला आहे. त्यामुळे नामांतराचा मुद्दा सेनेसाठी इकडे आड तिकडे विहीर अशी असली तरी खरी सत्व परिक्षा पाहणार आहे.

आता पुन्हा शिवसेना आणि काँग्रेसमध्ये या मुद्यावरुन मतभेद निर्माण झाले आहेत. औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर व्हावे, अशी भूमिका शिवसेनेने घेतली आहे.

मात्र, काँग्रेसने त्याला विरोध दर्शविला आहे. या मुद्यावरुन काँग्रेस आपल्या भूमिकेवर सातत्य ठेवून आहे. तर यावरुन आम्ही हिंदूत्व अजेंडा सोडून दिलेला नाही.

हे दाखवून देण्याचा शिवसेनाचा प्रयत्न असल्याचे राजकीय विश्लेषक सांगत असले तरी शिवसेने समोर हा मुद्दा तडीस नेण्याशिवाय पर्याय देखील उरलेला नाही.

जर नामांतराचा मुद्दा सोडून दिल्याचा मेसेज जनतेत गेला तर महापालिका निवडणूकीत भाजपाला स्वतःच्या हाताने नामांतराचा मुद्दा दिल्यासारखा होणार आहे.

शिवसेनेचा हिंदूत्व अजेंडा, तर काँग्रेसचा विरोध

श्रीराम मंदिर व्हावे, अशी शिवसेनेची पहिल्यापासून भूमिका होती. त्यासाठी स्वतः उद्धव ठाकरे आयोध्येत जावून रामलल्लाचे दर्शन घेवून आले होते. आता महाविकास आघाडीमध्ये असतानाही आम्ही हिंदूत्व सोडलेले नाही.

हे दाखवून देण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नादाला लागून शिवसेनेने हिंदूत्व सोडून दिले आहे, अशी टीका भाजपकडून होत आहे व महापालिक निवडणूकीत अधिक प्रमाणात होईल.

यामुळे शिवसेना आपल्या हिंदूत्व अजेंड्याशी ठाम आहे हे दाखविण्याची धडपड करीत असल्याचे दिसत असले तरी खरी राजकीय कोंडी काँगे्रसची होणार आहे.

सध्या औरंगाबाद नामांतराच्या मुद्यावरुन काँग्रेसने घेतलेली भूमिका त्यांच्या स्तरावर राजकीय अपरिहार्यता आहे. जर राजकारण करायचे असेल तर मुस्लिम मतांचे राजकारण सोडून परवडणारे नाही.

कारण औरंगाबादमध्ये एमआयएम पक्ष वाढलेला आहे. त्यात आता औरंगाबादचे नामांतर झाल्यास मुस्लिम मते एमआयएमकडे जातील, अशी काँग्रेसला चिंता सतावत आहे.

त्यामुळे औरंगाबादच्या नामांतराला काँग्रेसकडून विरोध होत आहे. हा विरोध राजकीय असला तरी आगामी काळात हिंदू मतांची वजाबाकी कॉंग्रेसला धोक्याचे ठरणार आहे.

काँगे्रसच्याही काही कार्यकर्त्यांचा नामांतराला पाठींबा असल्याचे खाजगीत सांगतात. सेनेच्या लोकसभा पराभवानंतर एमआयएमची डोकेदुखी औरंगाबाद मधील जनतेने अनुभवली आहे.

त्यामुळे कॉंग्रेससाठी नामांतर झाले तरी नुकसान ठरलेले आहे, जर नामांतर झाले नाही आणि काँगे्रसची आडकाठी नामांतराआड आली हा मेसेज मतदारात गेला तर कपाळमोक्ष अटळ आहे.

महापालिका निवडणूक केंद्रस्थानी

औरंगाबाद महापालिका निवडणूक केंद्रस्थानी ठेवून हा मुद्दा प्रत्येक पक्ष आपली भूमिका ठरवत आहे. शिवसेनेने देखील महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून औरंगाबादच्या नामांतराबाबत आपली भूमिका घेतली आहे.

नामांतराची भूमिका मागे घेतली तर शिवसेनेवर भाजप हिंदूत्व सोडून देण्याची टीका करेल. त्यासाठी शिवसेना आपला हिंदूत्व अजेंडा टिकवून ठेवत असल्याचे दिसते.

या सर्व घडामोडीत भाजपाच्या दोन्ही हातात लाडू आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँगे्रस नामांतराला विरोध करणार आणि सेना हा मुद्दा पुढे रेटत राहणार या वादात महाविकास आघाडी फसली तरी भाजपाचा फायदाच आहे.

जर नामांतर वादावादीत लांबणीवर पडले तर मात्र महापालिका निवडणूकीत नामांतराचा विषय भाजपासाठी सर्वात मोठा अजेंडा राहणार आहे.

तेव्हा आगामी काळात नामांतर झाले तर सेनेचा फायदा दिसत असला तरी त्याचा परिणाम महाविकास आघाडीच्या भवितव्यावर होणार आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here