सांगली पोलिसांकडून अडीच कोटी किंमतीच्या सोन्याच्या दरोड्याचा 24 तासात छडा | पाच आरोपी जेरबंद

142

सांगली: सांगली जिल्ह्यातील जत येथे गुरुवारी मध्यरात्री एका सराफाला मारहाण करुन त्याच्याकडच्या अडीच कोटी रुपये किंमतीच्या सोन्याची लूट करण्यात आली होती.

या प्रकरणाचा अवघ्या 24 तासात छडा लावण्यात सांगली पोलिसांना यश आलंय. या प्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून सव्वा दोन कोटी रुपये किंमतीचे सोने हस्तगत करण्यात आले आहे. 

पोलिसांच्या माहितीनुसार, सांगलीच्या जत तालुक्यातील आटपाडी येथील सराफ व्यावसायिक बाळासाहेब सावंत हे सोने विक्री करण्यासाठी नांदेडला निघाले होते.

मध्यरात्री दोनच्या सुमारास ते शेगाव जवळील माणेवस्ती येथे लघुशंकेसाठी गाडीतून उतरले. याचवेळी त्यांचा ओमनी गाडीतून पाठलाग करणाऱ्या पाच अज्ञात दरोडेखोरांनी व्यापारी सावंत व त्यांच्या जोडीदारास बेदम मारहाण केली.

त्यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकण्यात आली. त्यानंतर त्याच्याकडून 2 कोटी 26 लाख 13 हजार रुपये किंमतीचे 4 किलो 530 ग्रॅम सोने लुटण्यात आले.

सराफ व्यावसायिक सावंत यांच्यासोबत असणारा कामगार प्रविण चव्हाण याच्याही डोळ्यात यावेळी चटणी टाकत चार जणांनी दरोडा टाकला होता. या प्रकरणी जत पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

अटक करण्यात आलेल्या आरोपीमध्ये सराफ व्यावसायिकाच्या एका कामगाराचा समावेश असून तोच या प्रकरणाचा मास्टर माईन्ड असल्याचे समोर आले आहे.

या दरोड्याच्या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली होती. घटनेची दखल घेऊन सांगली पोलीस अधीक्षक गेडाम यांनी तातडीने पथके तैनात करत तपास सुरु केला होता.

पोलिसांनी केलेल्या चौकशीत असे समोर आले की त्या कामगारानेच त्याच्या इतर साथीदारांच्या मदतीने दरोडा टाकला होता. त्यानंतर चव्हाण आणि त्याच्या चार साथीदारांनाही अटक केली.

त्यांच्याकडून लुटलेले सव्वा दोन कोटी रुपयांच्या सोन्याच्या बिस्किटांसह त्यांच्या ताब्यातील रिव्हॉल्वर आणि ओमनी गाडी असा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.

पोलिसांच्या तीन पथकानी संयुक्तपणे ही कारवाई केलीय. याप्रकरणी प्रविण चव्हाण, विजय नांगरे, विशाल कारंडे, तात्यासाहेब गुसाळे, वैभव माने यांना अटक करण्यात आली आहे.

जत आणि स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी याबाबत सखोल तपास करत सावंत यांचे कामगार प्रविण चव्हाण याला ताब्यात घेतले आणि त्याची चौकशी सुरु केली.

गुन्हा नोंद झाल्यापासून अवघ्या चोवीस तासात पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला. या कामगिरीबद्दल स्थानिक गुन्हे अन्वेशन विभागाच्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना सांगली पोलीस अधीक्षक दिक्षीत गेडाम यांनी 50,000/- रुपये बक्षीस जाहीर केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here