मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तब्बल दहा महिन्यानंतर पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना आजपासून शाळेची घंटा पुन्हा एकदा ऐकू आली. शाळेत बालकांची किलबिल सुरु झाली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच पहिल्या टप्प्यात नववी ते बारावीचे वर्ग प्रत्यक्षपणे सुरु करण्यात आले होते. जिथे कोरोनाचा प्रभाव कमी आहे तिथे शाळा सुरु करण्यात येत आहेत.
आजपासून दुसऱ्या टप्प्यात पाचवी ते आठवीचे वर्ग सुरु झाले आहेत. 23 नोव्हेंबरपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्याच्या शिक्षण विभागातर्फे घेण्यात आला.
मात्र, करोना परिस्थिती पाहता महापालिका आणि जिल्हा स्तरावर शाळांबाबत निर्णय घेण्याची मुभा सरकारने दिली होती. त्यानुसार आज शाळा सुरु होत आहेत.
पालकांचं संमतीपत्र घेऊनच विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देण्यात येणार आहे. तशा सूचना पालकांना देण्यात आल्या आहेत. तसेच, शिक्षकांना आरटीपीसीआर चाचणीचे बंधन करण्यात आलं आहे.
दुसरीकडे शाळेच्या निर्जंतुकीकरणासह कोव्हिडचे नियम पाळणंही बंधनकारक करण्यात आलं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळांमध्ये अनेक उपाययोजना करणं गरजेचं आहे.
विद्यार्थी आणि कमर्चाऱ्यांचं थर्मल स्क्रीनिंग, ऑक्सिमीटर तपासणी यांसारख्या सुरक्षा उपायांचं पालन शाळांमध्ये करावं लागणार आहे.
पहिलाच दिवस असल्यानं विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे, तसं पालकांच्या संमतीशिवाय विद्यार्थ्यांना प्रवेश नसल्याचं शिक्षक सांगत आहेत.
मुंबई मध्ये मात्र अद्याप शाळा सुरु झालेल्या नाहीत. राज्यातील इतर भागांत मात्र शाळा आजपासून सुरु करण्यात आल्या आहेत. पुणे, नाशिक, औरंगाबाद, पालघरमध्ये आजपासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरु करण्यात येत आहेत.
पुणे महापालिकेच्या हद्दीतील शाळा सुरु करण्यास आजपासून परवानगी देण्यात आली आहे. मात्र सुरक्षेचे सगळे निकष पूर्ण करणाऱ्या 60 ते 65 शाळाच आज पहिल्या दिवशी सुरु करण्यात आल्या आहेत.