पुणे : राज्यात सध्या पूजा चव्हाण प्रकरण चर्चेत आहे. वनमंत्री संजय राठोड यांचे या प्रकरणाशी संबध असल्याचे आरोप होत असल्याने या प्रकरणाची चांगलीच चर्चा होत आहे.
याच दरम्यान तिच्या नातेवाईकांनी अतिशय सनसनाटी आरोप केला आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता अजून एक वळण मिळाले आहे.
या संबंधित कथित ऑडिओ क्लिप्स देखील व्हायरल झाल्याने हे प्रकरण अधिकच गूढ होत चाललं आहे. तर, पूजाला न्याय मिळावा अशी सर्वसामान्य जनतेची भावना आहे.
ही घटना घडल्याच्या दिवसांपासून वनमंत्री संजय राठोड हे गायब आहेत. त्यांचा फोनही लागत नाही. या आरोपांवर त्यांनी अद्याप कोणत्याही प्रकारचा खुलासा न केल्याने संशय अधिक बळावत असल्याचा आरोप भाजप कडून केला जात आहे.
पूजा चव्हाणच्या नातेवाईक शांताबाई राठोड म्हणाल्या की, पूजानी आत्महत्या केली नाही. पूजाला ज्या यवतमाळच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते.
तिथेच तिला मारले असावे आणि पुण्यातील बिल्डींगवरून फेकले असावे. असा संशय राठोड यांनी व्यक्त केलाय. पूजा ही आत्महत्या करणारी मुलगी नव्हती. तिने आत्महत्या केली नाही तर तिचा घातच झालाय. असे देखील शांताताई राठोड म्हणाल्या आहेत.
या आरोप-प्रत्यारोपांमुळे राज्यातील राजकीय वातावरण ऐन थंडीत चांगलेच तापलेले आहे. संजय राठोड यांनी मात्र अद्यापही या विषयावर मौन बाळगलं असून त्यांचं नाव समोर आल्यापासून यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात अद्याप कोणताच खुलासा पोलिस प्रशासनाने केला नाही. यामुळे पूजा चव्हानच्या नातेवाईक शांताताई राठोड यांनी पोलीस तपासावर संशय व्यक्त केलाय.