व्हेंटीलेटरवरील महिलेसोबत अश्लील चाळे | वॉर्डबॉयला अटक

209

राजस्थान मध्ये महिला अत्याचाराच्या घटना सतत घडत आहेत. आता तर चक्क रुग्णालयात व्हेंटीलेटरवर असलेल्या महिलेचा लैंगिक छळ करण्यात आला आहे.

हा संतापजनक व धक्कादायक प्रकार जयपूरमध्ये उघडकीस आला आहे. येथील एका रुग्णालयात व्हेंटीलेटरवर असलेल्या आणि जवळपास गुंगीत असलेल्या एका महिलेचा लैंगिक छळ करण्यात आला. रुग्णालयातील वॉर्डबॉयनेच हे काम केल्याचे उघडकीस आलं असून त्याला अटक करण्यात आली आहे.

जयपूरमध्ये शॅल्बी रुग्णालयातला हा प्रकार असून पीडित महिलेच्या तोंडावर ऑक्सिजन मास्क लावण्यात आला होता. तिचे हात बांधलेले होते. या महिलेवर सोमवारी संध्याकाळी शस्त्रक्रिया करण्यात आली होती आणि तिची गुंगी पूर्णपणे उतरली नव्हती.

शस्त्रक्रियेनंतर या महिलेला वेदना होत होत्या, मात्र भुलीचं इंजेक्शन दिल्यामुळे ती गुंगीतच होती. तिच्या या असहाय्यतेचा फायदा उचलत वॉर्डबॉयने तिच्या शरीराला अनेकवेळा नको तिथे स्पर्श केला. हा सगळा प्रकार रात्री उशिरापर्यंत सुरू होता असं कळालं आहे. खुशीराम असं या वॉर्डबॉयचं नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे.

खुशीरामची ड्युटी रात्री 8 वाजता सुरू व्हायची. वॉर्डमध्ये आलेल्या रुग्णांची पाहणी करण्याचं काम त्याच्यावर सोपवण्यात आलं होतं. रुग्णावर शस्त्रक्रिया करण्यात आली असेल तर त्याला केव्हा शुद्ध येते आहे हे पाहून डॉक्टरांना कळवण्याची जबाबदारी त्याच्याकडे होती. पीडित महिलेवर शस्त्रक्रिया करण्यात आल्यानंतर तिच्या अंगावर एक चादर घालण्यात आली होती. शस्त्रक्रियेनंतर तिच्या शरिरावर एकही कपडा नव्हता.

खुशीराम जेव्हा तिच्या वॉर्डमध्ये आला तेव्हा या महिलेच्या अंगावर फक्त चादर घातली आहे हे पाहून त्याच्यातील जनावर जागृत झाले. त्याने किमान 6-7 वेळा या महिलेला नको तिथे हात लावला. ही महिला गुंगीच्या औषधामुळे गुंगीत होती, मात्र तिला कोणीतरी तिच्या शरीराला वाईट स्पर्श करत असल्याचे कळत होते. हालचाल करता येत नसल्याने सहन करण्यापलिकडे या महिलेच्या हातात काहीच उरले नव्हते.

मंगळवारी सकाळी या महिलेची चौकशी करायला नर्स आली तेव्हा पीडितेने तिच्याकडे तक्रार करू नये म्हणून खुशीराम तिच्या शेजारी उभा राहून तिला धमकावण्याचा प्रयत्न करत होता. महिलेचा पती आला तेव्हा तिने त्याच्याकडे पेन आणि कागद मागितला. त्याद्वारे तिने घडलेला प्रकार नवऱ्याला सांगितला. यानंतर त्याने तातडीने पोलीस ठाणे गाठत तक्रार नोंदवली. यानंतर पोलिसांनी खुशीरामला अटक केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here