माणुसकी शरमली | मुलासमोर ठेचून पत्नीचा खून, पती पसार

204
Aurngabad wife murder case

औरंगाबाद : पती पत्नीत वाद टोकाला गेल्यानंतर सुखी संसाराची राख होते. चिमुकली मुल यात निष्पाप भरडली जातात. एक कुटुंब उध्वस्त होते, अशीच एक काळीज पिळवटून टाकणारी घटना औरंगाबादेत घडली आहे.

रागाच्या भरात पतीने मुलासमोरच डंबेल्सचा रॉड आणि कपडे धुण्याच्या दगडाने ठेचून पत्नीचा खून केला. त्यानंतर घराला कुलूप लावून तो पसार झाला. 

यावेळी पतीने मुलालाही मारहाण केली. ही थरारक घटना मंगळवारी (दि. १६) पहाटे दोन ते तीन वाजेच्या सुमारास पिसादेवी भागातील रुक्मिणी स्क्वेअर अपार्टमेंटमधील फ्लॅटमध्ये घडली.

काळीज पिळवटून टाकणारी धक्कादायक गोष्ट म्हणजे, तीन वर्षांची चिमुकली दिवसभर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आईच्या अंगावर खेळली. यात तिचे हात-पाय आणि अंग रक्ताने माखले होते.

कविता सिद्धेश त्रिवेदी (वय ३२, रा. पिसादेवी परिसर) असे मृत महिलेचे नाव आहे. तिचा पती सिद्धेश गंगासागर त्रिवेदी हा पसार आहे. तो बाजार समिती, जाधववाडी येथे कनिष्ठ लिपिक म्हणून नोकरीला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कविता व सिद्धेश या दांपत्याला आठ वर्षांचा मुलगा रुद्र व तीन वर्षांची मुलगी ऋचा अशी दोन अपत्ये आहेत.

मम्मीला पप्पाने मारले 

धक्कादायक म्हणजे, दिवसभर रुद्रने छोटी बहीण ऋचाचा सांभाळ केला. तिला पाणी पाजणे, बिस्कीट खायला देणे हे सर्व त्याने केले.

संध्याकाळ झाल्यावर चिमुकली ऋचा धाय मोकलून रडू लागली. त्यालाही न राहवल्याने तोही रडू लागला आणि शेजाऱ्यांना आवाज गेला. त्यानंतर ही घटना उघडकीस आली.

आठ वर्षांचा मुलगा रुद्र हा दुसरीत शिकतो. तो पोलिसांशी बोलला असून पप्पानेच मम्मीला व मलाही मारहाण केली, असे त्याने सांगितले. ही माहिती सहायक पोलिस निरीक्षक विश्वास पाटील यांनी दिली.

कुलूप तोडल्यावर विदारक दृष्य 

कविताचा खून करून सिद्धेश घराला कुलूप लावून पसार झाला होता. मुले रडायला लागल्यानंतर संध्याकाळी साडेसात वाजता हा आवाज शेजाऱ्यांच्या कानी आला.

त्यांनी जाऊन पाहिले तर बाहेरून कुलूप अन् आतमध्ये मुले रडत असल्याचे लक्षात आले. त्यांनी तत्काळ अन्य शेजाऱ्यांना ही माहिती देऊन कुलूप तोडले.

त्यानंतर कविता रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. त्यांनी ही माहिती चिकलठाणा पोलिसांना दिली. संध्याकाळी साडेआठ वाजता पोलिस घटनास्थळी पोहोचले.

फ्लॅट संस्कृतीचे भयाण वास्तववादी चित्र

एक फ्लॅटमध्ये पहाटे पती पत्नीचा खून करून घराला कुलूप लावून पसार होतो. त्यांची आठ आणि पाच वर्षांची मुले दिवसभर त्याच घरात रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आईच्या मृतदेहाच्या बाजूला रडत बसतात.

तरीही दिवसभर हा प्रकार शेजारी म्हणवणाऱ्या कोणाच्याही लक्षात येत नाही. थेट संध्याकाळी साडेसात वाजता त्यांचे लक्ष या घटनेकडे जाते, हे फ्लॅट संस्कृतीचे विदारक चित्र यानिमित्ताने समोर आले आहे.

व्हॅलेटाईन डे साजरा केला

११ तारखेला रुद्रचा वाढदिवस झाला. कविता आणि सिद्धेश यांनी तो मोठ्या थाटात साजरा केला होता. विशेष म्हणजे १४ फेब्रुवारीला या दांपत्याने व्हॅलेंटाईन डे देखील मोठ्या उत्साहात साजरा केला होता.

त्यानंतर १६ फेब्रुवारीच्या पहाटेच सिद्धेशने कविताचा खून केला. यामागे नक्कीच मोठे कारण असण्याची शक्यता पोलिस वर्तवित आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here