दिल्लीत प्रजासत्ताक दिनी शेतकरी आंदोलकांकडून करण्यात आलेल्या हिंसाचारावरुन भाजपा नेते आशिष शेलार यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.
जवान आणि पोलिसांच्या समर्थनार्थ शरद पवार यांची फेसबुक पोस्ट का पडली नाही? रोज वचवच करणारे संजय राऊत देशातील जवान आणि पोलिसांच्या बाजूने का बोलले नाहीत? अशी संतप्त विचारणा आशिष शेलार यांनी केली आहे.
शेतकऱ्यांशी चर्चा न करण्याच्या आरोपांवर उत्तर देताना ते म्हणाले की, कोर्टासमोर केसेस आहेत….सुप्रीम कोर्टाचं आम्ही ऐकणार नाही, समितीसमोर जाणार नाही, कोणाचे ऐकणार नाही.
कित्येक दिवस कृषीमंत्री नम्रपणे चर्चा करत असताना हेटाळणी केली जात आहे. हे सगळं कशाचं द्योतक आहे. त्यामुळे शिवेसना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने संयमाची भाषा करु नये. माथेफिरुंचे समर्थक म्हणून काम करु नये.
हिंसाचार करणाऱ्यांविरोधात एक चकार शब्द काढला नाही. रोज वचवच करणारे संजय राऊत देशातील जवान आणि पोलिसांच्या बाजूने का बोलले नाहीत.
कधी काळी आवश्यक असल्यावर फेसबुक पोस्ट टाकणारे शरद पवार साहेब तुमची फेसबुक पोस्ट जवान आणि पोलसांच्या बाजूने का आली नाही?
सगळ्या आंदोलनात इतर लोकांचा जो वावर आहे त्याचे समर्थक शरद पवार आणि संजय राऊत तुम्ही आहात. तुमची तोंडं आता का शिवली आहेत हा प्रश्न आम्ही तुम्हाला देशवासियांच्या वतीने विचारत आहोत, असं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.
पोलिसांच्या अंगावर ट्रॅक्टर घालणं कोणत्या देशभक्तीत बसतं हे शरद पवार आणि संजय राऊत यांनी स्पष्ट करावं. पोलिसांवर लाठ्या उचलणं, जवानांना लाथा बुक्क्याने मारणं, तलवारी काढणं कोणत्या देशभक्तीत बसतं हे स्पष्ट करावं.
या आंदोलनाला त्यांनी तीव्र रुप दिलं त्यांची चौकशी झाली पाहिजे पण ज्यांनी समर्थन दिलं त्यांचीही चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी आशिष शेलार यांनी केली आहे.
जवान असो किंवा दिल्ली पोलीस या सर्वांनी जो संयम दाखवला तो त्यांच्या देशभक्तीचा परिचय होता. विरोधकांना गोळीबार हवा होता का ? आंदोलन चिघळलं होतं का? त्यामुळे माथी भडकावण्याचं काम शरद पवार यांच्याकडून अपेक्षित नाही, असा संताप यावेळी त्यांनी व्यक्त केला.
केंद्र सरकारने २०१४ पासून २०२० पर्यंत जनहिताचा निर्णय घेतला की लाँग मार्च ते आंदोलन, पुरस्कार वापसी ते पुरस्कार वापसी करणाऱ्यांचं समर्थन ही सातत्याने भूमिका या देशातील शहरी नक्षलवादी आणि खासकरुन मोदी विरोधकांनी घेतली आहे,” अशी टीका आशिष शेलार यांनी केली.
केवळ राजकीय सूडापोटी आणि मोदी द्वेषापोटी या देशात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि दुर्दैवाने शिवसेना अराजकता आणू पाहत आहे. देश यांना सोडणार नाही,” असंही ते म्हणाले आहेत.
पोलिसांनी चौकशी जो दोषी असेल त्याला पकडावं. जो माथेफिरु असेल त्याच्या समर्थकांपर्यंतही पोहोचावं,असं आशिष शेलार यांनी सांगितलं.
दरम्यान हिंसाचारात काही भाजपाशी संबंधित लोकांची नावं समोर येत असल्याच्या प्रश्नावर ते म्हणाले की, ज्यांचे स्वत:चे हात रक्ताने माखले आहेत त्यांनी दुसऱ्यावर आरोप करु नये. जे सत्य आहे ते देशाने पाहिलं आणि बाकीचं सत्य चौकशीत समोर येईल.
२००३ पासून ज्यांनी कृषी कायद्याची वकिली केली ते आज संयमाच्या चर्चेची गोष्ट करत आहेत. १४ वर्षानंतर तरी वनवास समाप्त होतो.
पवार साहेब…१७ वर्ष झाली कायदा आणून आणि चर्चा करुन आणि अजूनही तुम्हाला चर्चा करायची आहे. याचा अर्थ चर्चेचं बांडगूळ हे दुतोंडी हत्यार हे महाराष्ट्र विकास आघाडीचं आहे, अशी टीका आशिष शेलार यांनी यावेळी केली.