महात्मा गांधी ग्रामीण रोजगार योजनेच्या संयोजनातून ‘शरद पवार ग्रामसमृध्दी योजना’ राबविण्यात येणार आहे.
शेतीसोबत शेती पुरक व्यवसायाला चालना मिळावी, तसेच ग्रामीण आर्थिक चक्राला चालना मिळावी यासाठी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या नावाने राज्य शासनाने मनरेगा संयोजनातून “शरद पवार ग्रामसमृध्दी योजना” राबविण्याचे निश्चित केले आहे.
यामुळे ग्रामीण भागातील रोजगाराची मागणी पुर्ण होणार आहे. अशी माहिती राज्याचे पर्यावरण, पाणीपुरवठा, संसदीय कार्ये, रोजगार हमी राज्यमंत्री, संजय बनसोडे यांनी दिली.
मनरेगा योजनेच्या संयोजनातून शरद पवार ग्रामसमृध्दी योजनांतर्गत खालील 4 वैयक्तिक कामांचा समावेश करुन अनिवार्यपणे सर्व ग्रामपंचायत क्षेत्रात राबविण्याचे प्रस्तावित केले आहे.
त्यानुसार गाय व म्हैस यांच्याकरिता पक्का गोठा बांधणे, शेळीपालन व शेड बांधणे, कुक्कुटपालन व शेड बांधणे, भूसंजीवनी नाडेप कंपोस्टींग यांचा समावेश या योजनेत केला आहे.
या योजनेत शेतकऱ्यांना भरीव अनुदान मिळणार आहे. “शरद पवार ग्रामसमृध्दी योजनेमुळे” शेतकऱ्यांच्या जीवनात अमुलाग्र बदल घडणार आहे. मंत्री मंडळाच्या बैठकीत याला मान्यता देण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीकोणातून तसेच राज्याच्या ग्रामीण अर्थ व्यवस्थेला चालना देण्यासाठी ही योजना अत्यंत उपयोगी ठरणार आहे.
महाराष्ट्रात अनेकवेळा पावसामुळे शेतक-यांचे बरेच नुकसान होत आहे. विशेषत: मराठवाडा व विदर्भ या भागात सतत ओला दुष्काळ व कोरडा दुष्काळ यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक समिकरणे कोलमडली आहे, अशा परिस्थितीत ही योजना शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरेल.
शेतीपुरक व्यवसायातून शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होईल व शेतीसाठी उत्तम प्रकारचे शेंद्रीय खत निर्माण होण्यास मदत होणार आहे. मंत्री मंडळाच्या बैठकीत या योजनेला मंजूरी मिळाली असून लवकरच ही योजना कार्यान्वित होणार आहे. अशी माहिती रोजगार हमी राज्यमंत्री, संजय बनसोडे यांनी दिली आहे.