नागपूरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली असून एका युवतीने होमगार्डवर बलात्काराचा आरोप केला आहे.
होमगार्डने डॉक्टर असलेल्या युवतीला फेसबुकवरून जाळ्यात ओढले. त्याने डॉक्टर तरुणीला इम्प्रेस करण्यासाठी पोलिस अधिकारी असल्याचे सांगून तिच्याशी जवळीक साधली त्यानंतर वर्दीचा धाक दाखवून मित्राच्या फ्लॅटवर नेऊन बलात्कार केला.
या प्रकरणी युवतीच्या तक्रारीवरून अजनी पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून सूरज लक्ष्मण मडावी (३१, रा. अर्जुननगर, काटोल) असे आरोपीचे नाव असून पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ वर्षीय तरुणी प्रिया (बदललेले नाव) मुळची कळमेश्वर तालुक्यातील आहे. तिचे वडील शेतकरी असून आई आणि बहिणीसह ती बजाजनगरात राहते.
पीडित डॉक्टर तरूणी बजाजनगरातील डोळ्याच्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आहे. तिची ऑगस्ट २०१९ मध्ये फेसबुकच्या माध्यमातून सूरज मडावीसोबत ओळख झाली. त्यानंतर त्यांच्यात एकमेकांशी चॅटिंग सुरू केली.
या चॅटिंग दरम्यान त्याने तिच्याशी जवळीक साधत पोलिस खात्यात नोकरीला असून पोलीस अधिकारी असल्याचे सांगितले. त्याने तिला इम्प्रेस करण्यासाठी वर्दीत काही फोटोही तिला पाठवले. त्यामुळे तिने पोलीस अधिकारी असल्याने सूरजशी तात्काळ मैत्री केली.
त्यानंतर दोघांचे संबंध वाढत गेले आणि त्यांच्यातील जवळीकही वाढत गेली. त्याने रियाच्या कुटुंबीयांची माहिती काढली आणि त्यानंतर त्याने तिला जाळ्यात ओढले. तिला भेटायला बोलावले.
जेव्हा भेटायला आला तेव्हा खाकी पॅंटवर तिला भेटायला आला. त्यामुळे तो पोलिस अधिकारी असावा असे तिला वाटले. त्याने तिला प्रपोज केले आणि लग्नाची मागणी घातली. तिनेही पोलीस दलातील सरकारी सेवेतील पती मिळत असल्यामुळे लगेच होकार दिला.
तिने आई-वडिलांनाही सूरजबाबत माहिती दिली. त्यांनीही मुलीला होकार दिला. दरम्यान सूरजने तिला लग्नाबाबत बोलायचे असल्याचे सांगून नरेंद्रनगर येथील गोदावरी अपार्टमेंट असलेल्या मित्राच्या फ्लॅटवर नेले.
तिथे तिच्याशी काही तास गप्पा केल्यानंतर शारीरिक संबंधाची मागणी केली. तिने नकार दिला असता पुढच्याच महिन्यात लग्न करणार असल्याचे सांगितले. तेव्हाही तिने नकार दिल्यानंतरही सूरजने तिच्यावर जबरी बलात्कार केला.
त्यानंतर सूरज रियाला वारंवार मित्राच्या फ्लॅटवर आणि लॉजवर नेऊ लागला. रियाने नकार दिल्यास वर्दीची धमकी देवून लैंगिक अत्याचार करू लागला. विरोध केला तर लग्न करणार नाही, असे सांगून तिला बळजबरी फ्लॅटवर नेऊन वारंवार लैंगिक शोषण करीत होता.
काही काळ गेल्यावर रियाने त्याला लग्नाबाबत विचारले असता, त्याने चक्क नकार दिला. पोलिस माझे काहीही बिघडवू शकत नाही, अशी धमकी दिली. त्यामुळे तरुणीने अजनी पोलिस ठाणे गाठून तक्रार केली. पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा नोंदवून आरोपी सूरज याला अटक केली.