मुंबई: शिवसेना वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या एका ऑनलाइन कार्यक्रमात मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वबळावर लढण्याच्या घोषणाबाजीवर कॉंग्रेसला बरेच खडे बोल सुनावले.
त्यानंतर आता राष्ट्रवादीनेही काँग्रेसला सबुरीने घेण्याचा सल्ला देत कान टोचले आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, कॉंग्रेसने शेवटपर्यंत स्वबळाचा नारा दिला तर राष्ट्रवादी-शिवसेना एकत्र येईल.
कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वारंवार स्वबळाचा नारा देत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीवर परिणाम होऊ लागला आहे. लोकामध्ये चुकीचे संदेश जात असल्याने कॉंग्रेसच्या स्वबळाचा विचार सेना व राष्ट्रवादीचे नाते घट्ट करीत आहे, असे म्हटले आहे.
माध्यमांशी बोलताना जयंत पाटील म्हणाले,”आम्ही तीनही पक्ष एकत्र आहोत. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष वेगवेगळ्या ठिकाणी सतत स्वबळाच्या घोषणा देत आहेत, पण मला वाटते की वेळ आल्यावर आम्ही तिघेही एकत्र राहू. कॉंग्रेस शेवटपर्यंत स्वबळाचा नारा देत असेल तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काहीही करून पुढे जाईल.”
नाना पटोले नेमके काय म्हणाले?
नाना पटोले हे गेल्या काही दिवसांपासून विविध ठिकाणांच्या दौर्यावर असताना कॉंग्रेस आगामी निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याचे त्यांनी जाहीरपणे सांगितले होते.
दरम्यान, अकोल्यातील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा उघडपणे व्यक्त केली होती. त्यांच्या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठा गदारोळ झाला.
भाजपने राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर टीका केली असताना शिवसेना आणि राष्ट्रवादीने याबाबत सावध भूमिका घेतली होती. तसेच, “राहुल गांधींना पंतप्रधान व्हायचे आहे आणि नाना पटोले मुख्यमंत्री व्हायचे आहेत पण लोकांना ते नको आहेत” अशा शब्दांत भाजपने कॉंग्रेसवर हल्ला चढविला होता.
उद्धव ठाकरे यांनी कॉंग्रेसला कोणता सल्ला दिला?
दरम्यान,19 जून रोजी शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त एका ऑनलाइन कार्यक्रमात मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारमधील घटक पक्ष असलेल्या कॉंग्रेसला अप्रत्यक्षपणे योग्य तो सल्ला दिला आहे.
मुख्यमंत्री ठाकरे यांनी कॉंग्रेसला उद्देशून म्हटले की, “सध्याच्या कोरोना काळात आपण राजकारण होऊ देऊ नये, कारण आता लोकाना आपल्या राजकारणाशी व आघाडी-युतीशी देणेघेणे नाही.
जर आम्ही सत्ता हातात असून असे राजकारण करण्याचा प्रयत्न केला तर जनता जोड्याने मारेल” असा जबर टोला ठाकरे यांनी कॉंग्रेसला लगावला आहे. सोबतच “शिवसेना कुणाच्या पालख्या उचलणारी नाही, अन्यायाविरोधात लढणं हेच आमच्यासाठी स्वबळ असल्याचे” उद्धव ठाकरे म्हणाले होते.
तुमच्या आवडीच्या निवडक बातम्या
- शिवसैनिकांनी शिवप्रसाद दिला, आता शिवभोजन थाळीची वेळ आणू नका : संजय राऊतांचा इशारा
- जगातील प्रसिद्ध मासिकाचा दावा : कोरोनामुळे जगभरात ७० लाख मृत्यू तर भारताची आकडेवारी ‘एवढी’ आहे !
- Maratha Muk Andolan Updates : कोल्हापुरात मराठा आरक्षणाचा ‘एल्गार’ | मराठा आंदोलनाची मशाल महाराष्ट्रभर धगधगणार