मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सिंधुदुर्ग दौऱ्याच्या दुसऱ्याच दिवशी भाजपाला वैभववाडीत शिवसेनेने जोरदार धक्का दिला आहे.
भाजपाचे ७ नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करत आहेत, शहांच्या दौऱ्यानंतर भाजपा नगरसेवक फुटल्याने या घटनेला राजकीय महत्त्व प्राप्त झालं आहे, सिंधुदुर्गात नारायण राणे यांच्या वर्चस्वाला धक्का देण्याचं काम शिवसेनेकडून केले जात आहे.
त्यामुळे आमदार नितेश राणेंनीही ट्विटच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला चिमटा काढला आहे. नितेश राणेंनी व्हिडीओत म्हटलंय की, वैभववाडीचे काही नगरसेवक शिवसेनेच्या वाटेवर असल्याची बातमी वाचली आहे, व्हेंलेनटाईन डे काही दिवसांवर आहे आणि शिवसेना आमचं जुनं प्रेम आहे.
Dear Uddhavji,
Happy Valentines Day !Love : Nitesh Narayan Rane 😅 pic.twitter.com/BOEiAnmBMq
— nitesh rane (@NiteshNRane) February 9, 2021
जुन्या प्रेमाला कधी विसरायचं नसतं असं सगळेच म्हणतात. वैभववाडीची सध्या परिस्थिती पाहिली तर शिवसेनेकडे मूळ शिवसैनिक सापडणार नाही. येणाऱ्या निवडणुकीत कोणी उमेदवार भेटणार नाहीत.
-
शिवसेना पक्ष हा हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष आहे, बाळासाहेब ठाकरेंवर आमचं नितांत प्रेम आहे, त्यामुळे शिवसेना पक्षाची अशी अवस्था होऊ नये अशी माझ्यासारख्या बाळासाहेब ठाकरेंवर प्रेम करणाऱ्या कुटुंबाची भावना आहे. म्हणून हे ७ नगरसेवक व्हेलेंनटाईन डे निमित्त उद्धव ठाकरेंकडे पाठवतोय असा टोला नितेश राणेंनी लगावला.
त्याचसोबत मेडिकल कॉलेजसाठी नारायण राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन लावला होता, तेव्हा उद्धव ठाकरेंनी सकारात्मक प्रतिसाद देत मेडिकल कॉलेजच्या फाईलवर सही केली.
आम्ही उद्धव ठाकरेंना काही देऊ शकत नाही, दिलं तरी ते घेणार नाही, गुच्छ दिला तरी ते स्वीकारणार नाहीत. त्यामुळे हे ७ नगरसेवक त्यांना आभार आणि धन्यवाद मानण्यासाठी पाठवत आहे.
त्याचा स्वीकार त्यांनी करावा असं सांगत नितेश राणेंनी व्हेलेंनटाईन डे निमित्त उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देत शिवसेनेला चिमटा काढला आहे.
नारायण राणे मैदान सोडणार नाहीत !
अमित शहा यांनी नारायण राणेंना कितीही बळ पुरवले तरी ते शिवसेनेला घाबरून मैदान सोडून पळ काढणार नाहीत, याची खातरजमा अमित शहा यांनी करून घ्यावी असा टोला आमदार वैभव नाईक यांनी लगावला होता.
त्याचसोबत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नारायण राणेंचा उल्लेख महाराष्ट्राचे दबंग नेते असा केला होता. मात्र या दबंग नेत्याला पक्षात प्रवेश देण्यासाठी वर्षभर का ताटकळत का ठेवले, असा सवाल वैभव नाईक यांनी फडणवीस आणि भाजपाला विचारला आहे.