मुंबई : राज्यात सत्तांतर होऊन एक वर्ष उलटले, या एक वर्षात कट्टर विरोधक एकत्र आले अन् मित्र दुरावले अशी राजकीय स्थिती पाहायला मिळाली.
महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना यांनी एकत्र येत महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केले, त्यानंतर अलीकडेच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीविरुद्ध भाजपा असा सामना रंगला.
यात महाविकास आघाडीने बाजी मारली तर भाजपाला ६ पैकी अवघ्या एका जागेवर समाधान मानावं लागलं. आगामी काळात राज्यात महापालिका, जिल्हापातळीवरील निवडणुका येणार आहेत.
महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढते का? हे पाहणं गरजेचे आहे. तत्पूर्वी मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसनं स्वबळावर लढावं अशी मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे.
शिवसेना दिलेला शब्द पाळत नाही, कोणत्याही निर्णयात सामाविष्ट केले जात नाही, एकहाती निर्णय घेतले जातात असा आरोप काँग्रेसचे महापालिकेतील गटनेते रवी राजा यांनी केला आहे.
यावेळी रवी राजा म्हणाले की, सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून कॉमन मिनिमम प्रोग्रोमची आठवण करून दिली, शिवसेना महापालिकेतही दिलेला शब्द पाळत नाही, निर्णय प्रक्रियेत काँग्रेसला सामावून घेत नाही.
त्यामुळे पुढील निवडणूक काँग्रेसने स्वबळावर लढवावी अशी मागणी आम्ही काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींकडे केली असल्याचं त्यांनी सांगितले.
दरम्यान, सोनिया गांधी यांनी दिलेलं पत्र दबावतंत्र नाही असं शिवसेना नेते संजय राऊत यांच्याकडून सांगण्यात आलं आहे. संयुक्त पुरोगामी आघाडीच्या सोनिया गांधी प्रमुख नेत्या आहेत.
राज्यात महाविकास आघाडी सरकार आलं तेव्हा किमान समान कार्यक्रम बनवला गेला त्यातील काही मुद्दे सोनियांनी पत्राद्वारे मांडले, म्हणून याचा अर्थ दबावतंत्राचा भाग आहे असं समजण्याचं कारण नसल्याचं राऊतांनी स्पष्ट केलं.