‘संभाजीनगर’साठी शिवसेना मोठ्या ‘गेम चेंजिंग’ खेळीच्या प्रयत्नात?

183

मुंबई : ऐतिहासिक औरंगाबाद शहराचं नामकरण संभाजीनगर करण्यासाठी आता शिवसेना ‘गेम चेंजिंग’ राजकीय खेळी खेळण्याच्या प्रयत्नात असल्याचं समजतं आहे. 

हा प्रस्ताव थेट मंत्रिमंडळापुढे आणण्याच्या हालचाली शिवसेनेनं सुरू केल्या असल्याची माहिती समोर येत आहे.

विशेष म्हणजे, महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांचा याला विरोध आहे.

जर असा प्रस्ताव आणला जात असेल तर त्यामागे मोठी राजकीय खेळी असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी औरंगाबाद शहराच्या नामांतराला तीव्र विरोध केलेला आहे.

संजय राऊत यांनी म्हटले की, ‘नामकरण होणे आवश्यक आहे. काँग्रेसच्या भूमिका वेगळ्या आहेत मात्र मनातून ते ही संभाजी महाराजांसोबत आहेत. औरंगाबद विमानतळाचे नाव सुद्धा धर्मवीर छत्रपती शिवाजी महाराज करण्यात यावे.’

दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील यावर स्पष्ट भूमिका मांडली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की, “यात नवीन मी काय केले आहे, जे वर्षानुवर्ष बोलत आलो आहे, जे शिवसेनाप्रमुख बोलत आले होते, तेच मी करणार आहे.

एक गोष्ट अशी आहे, औरंगजेब सेक्युलर नव्हता, आमच्या अजेंड्यात सेक्युलर हा जो शब्द आहे, त्यात औरंगजेब बसत नाही.”

संजय राऊत यांनी देखील संभाजीनगरबाबत शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली होती. नाशिकमध्ये बोलताना त्यांनी म्हटलं की, संभाजीनगर हे संभाजीनगरच आहे आणि राहणार. त्यामध्ये काही मतभेद नाही.

काँग्रेस विरोध करत आहेत. पण ते मनातून संभाजी राजे यांचेच भक्त आहेत. ते औरंगजेबाचे भक्त असू शकत नाहीत. औरंगजेब हे काय सेक्युलर व्यक्तिमत्व नव्हतं.’

औरंगाबाद शहाराच्या नामकरणाचा वाद इतक्यात शांत होईल असं दिसत नाहीये. याआधी मुख्यमंत्री कार्यालयाने मंत्रिमंडळ निर्णयाची माहिती देताना औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा केला होता.

त्यानंतर महसूल मंत्री आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी याबाबत आक्षेप घेतला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली होती. हे कोणी जाणीवपूर्वक केले का हे तपासलं जाईल असं त्यांनी म्हटले होतं.

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here