अजान उत्तम प्रकारे म्हणणाऱ्या मुलांना शिवसेनेकडून बक्षीसं दिली जातील. या संपूर्ण स्पर्धेचा खर्च शिवसेना करेल.
मुंबई : काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन करणाऱ्या शिवसेनेवर भारतीय जनता पक्षानं वारंवार हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून निशाणा साधला आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी ठाकरे सरकारनं सहा महिन्यांहून अधिक काळ राज्यातील प्रार्थनास्थळं बंद ठेवली होती. त्यावरूनही भाजपनं शिवसेनेला लक्ष्य केले होते.
यानंतर आता पुन्हा एकदा भाजपकडून शिवसेनेवर जोरदार टीका होण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे दक्षिण मुंबईचे विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांनी शालेय विद्यार्थ्यांसाठी अजान स्पर्धेचं आयोजन केलं आहे.
बसीरत ऑनलाईनशी संवाद साधताना पांडुरंग सकपाळ यांनी अजान स्पर्धेची माहिती दिली. याबद्दलचा त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
अजानमध्ये फार गोडवा असतो. ती ऐकदा ऐकल्यावर पुन्हा कधी ऐकायला मिळेल, असं मनाला वाटतं राहतं, अशा शब्दांत सकपाळ यांनी अजानचं कौतुक केलं आहे.
‘शालेय विद्यार्थ्यांसाठी आम्ही अजान स्पर्धेचं आयोजन करणार आहोत. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या मुलांसाठी आवाज, उच्चार हे निकष असतील. ते किती मिनिटांत अजान संपवतात, कशी प्रकारे म्हणतात, याकडे मौलाना लक्ष देतील. ते परीक्षक म्हणून काम पाहतील.
अजान उत्तम प्रकारे म्हणणाऱ्या मुलांना शिवसेनेकडून बक्षीसं दिली जातील. या संपूर्ण स्पर्धेचा खर्च शिवसेना करेल,’ असं सकपाळ यांनी सांगितलं.
काहींना अजानच्या आवाजामुळे त्रास होतो, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं, असा प्रश्न सकपाळ यांना विचारण्यात आलं. त्यावर सगळेच धर्मग्रंथ मानवता आणि शांततेची शिकवण देतात.
अजानचा कालावधी फार कमी वेळ असतो. त्यामुळे अजानच्या आवाजाबद्दल अडचण वाटण्याचं काहीच कारण नाही. अशांकडे लक्ष देण्याची गरज नाही, असं सकपाळ म्हणाले.
आम्ही मानवतेच्या दृष्टीकोनातून समाजासाठी काम करतो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे सर्वांना सोबत घेऊन काम करत आहेत, असंदेखील त्यांनी पुढे सांगितलं.