सरकारने कोरोनारुग्णांवर उपचारात कोणतीही कमतरता भासू नये म्हणून राज्य सरकारं ठोस उपासयोजना केली आहे.
मुंबई : राज्यात कोरोनाच्या काळात रुग्णालयांमध्ये रक्ताची टंचाई जाणवत आहे. त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला स्वयंस्फूर्तीनं पुढे येऊन रक्तदान करावं, असं आवाहन केलं आहे.
मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतर शिवसेनेचे युवा नेते आणि राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या मतदार संघात चक्क रक्तदानासाठी प्रलोभन दाखवलं जात आहे.
प्रत्येक रक्तदात्यास एक किलो चिकन मोफत देण्यात येईल तर शाकाहारी रक्तदात्यांना पनीर देण्यात येईल, अशी ऑफर नगरसेवक आणि युवासेना कार्यकारिणी सदस्य समाधान सदा सरवणकर यांनी दिली आहे.
सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, राज्यात 5 ते 7 दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा आहे. राज्यात एकूण 344 रक्तपेढ्या असून त्यात 19 हजार 59 रक्ताच्या युनिट आहेत.
तर प्लेटलेटच्या 2583 युनिट आहेत. मुंबईत 58 रक्तपेढ्या असून त्यात 3239 रक्ताच्या युनिट आणि 611 प्लेटलेट युनिट उपलब्ध आहेत.
आदित्य ठाकरे यांचा मतदार संघ माहिम-वरळी विधानसभा क्षेत्रातील राजाभाऊ साळवी मैदान, न्यू प्रभादेवी रोड, मुंबई येथे येत्या 13 डिसेंबर रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत महा रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आलं आहे.
नगरसेवक समाधान सदा सरवणकर हे या रक्तदान शिबीराचे आयोजक आहेत. कोविडच्या या संकटात रक्तदान करू लोकांचे प्राण वाचवू या मथळ्याखाली एक जाहिरात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
‘फ्री चिकन ब्लड डोनर’ असं म्हणत प्रत्येक रक्तदात्यास 1 किलो चिकन देण्यात येईल (शाकाहारी रक्तदात्यांना पनीर देण्यात येईल.) अशी ऑफर देण्यात आली आहे.
या रक्तदान शिबीरासाठी पूर्व नोंदणी 11 डिसेंबरपूर्वी शिवसेना शाखा 194, सामना प्रेस शेजारी करावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.
मुख्यमंत्र्यानी काय केलं आवाहन…
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, कोरोना हा अज्ञात शत्रू असून त्याच्याशी दोन हात करण्यासाठी राज्यातील डॉक्टर, पोलीस आणि आरोग्य कर्मचारी मोलाचं योगदान देत आहेत.
त्याचबरोबर रक्तदानात अग्रेसर असलेल्या बहुतांश कंपन्यांचे कर्मचारी घरातून काम (Work Form Home)करत आहेत. त्यामुळे रक्त संकलनात मोठी समस्या निर्माण झाली आहे.
महाविद्यालयातील युवावर्ग हा रक्तदानासाठी महत्त्वाचा स्त्रोत आहे. मात्र, कोरोना संसर्गामुळे राज्यातील महाविद्यालये सध्या बंद आहेत.
मात्र, राज्यातील रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा साठा कमी असल्यामुळे रुग्ण त्याचबरोबर त्यांच्या नातेवाईकांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.