शिवसेनेत मी शिवसैनिक म्हणूनच काम करणार आहे असंही उर्मिला मातोंडकर यांनी म्हटलं आहे.
अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी आज शिवसेनेत पक्षप्रवेश केला. त्यानंतर उर्मिला मातोंडकर यांनी पत्रकार परिषद घेतली. माझ्याबाबत अनेक प्रश्न साठले होते, त्यांना उत्तर देण्यासाठी आपल्यासमोर आल्याचे सांगितले.
शिवसेना प्रवेशानंतर आज (दि.१ डिसेंबर) उर्मिला मातोंडकर यांनी पत्रकार परिषद घेतली. कोविड काळात पत्रकार परिषदेला मोठ्या प्रमाणात माध्यम प्रतिनिधी उपस्थित राहिल्याबद्दल उर्मिला मातोंडकर यांनी आभार मानले.
मी जन्माने आणि धर्माने हिंदू आहे. हिंदू धर्म हा अत्यंत सहिष्णू आहे. त्यामुळे हे म्हणजे सॉफ्ट हिंदुत्व हे म्हणजेच हिंदुत्व असं काही नसतं. हिंदू धर्म हा प्रत्येकाला सामावून घेणारा धर्म आहे.
सेक्युलर या शब्दाचा अर्थ इतर धर्मांचा द्वेष करणं असा होत नाही. मी जन्माने हिंदू आहे आणि कर्मानेही हिंदू. आठ वर्षांची असतानाच योगा केला आहे.
खरं तर या सर्व गोष्टींवर बोलण्याची मला आतापर्यंत गरज वाटली नाही. कारण मला असं वाटत आपला जो धर्म असतो, तो देव जसा मंदिराच्या गाभाऱ्यात असतो. तसाच आपला धर्म जिव्हाळ्याचा, आस्थेचा विषय असतो.
मी सुद्धा महाविद्यालयात असताना तत्त्वज्ञान हा विषय घेतला होता.हिंदुत्व या विषयावर मला बोलायला नक्की आवडेल मात्र आजच मी त्यावर फार बोलणार नाही असंही उर्मिला मातोंडकर यांनी म्हटलं आहे.
एक पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात १४ तासात गेलेली नाही
“मी एक पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात १४ तासात गेलेली नाही. मी आज १४ महिन्यानंतर पक्ष बदलला आहे, १४ तासात एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाणे वेगळं असतं.
सध्या सारखं धर्म सेक्युलॅरिझम एवढं चाललंय पण आधी माणूस म्हणून काही आपण बघणार आहोत की नाही. आपण देशाचा प्रदेशाचा विचार करणार आहोत की नाही.
मी कंगनाच्या टीकेला अजिबात उत्तर देणार नाही
कंगनाला तुम्ही शिवसेनेत आल्यावर उत्तर देणार का असा प्रश्न देखील विचारला गेला. यावर उर्मिलाने शिवसेना स्टाईलमध्ये उत्तर दिलं. मी कंगनाच्या टीकेला अजिबात उत्तर देणार नाही.
कारण कंगनाच्या विषयावर खूप चर्चा आधीच झालेली आहे. आपण त्या विषयाला नको तितकं महत्त्व दिलेलं आहे. त्यामुळे मी त्या टीकेला उत्तर देणार नाही.
शिवसेनेत मी लोकांची कामं करण्यासाठी आले आहे.
शिवसेनेच्या प्रत्येक वाटचालीत मला त्यांची साथ द्यायला आवडेल. उद्धव ठाकरे यांनी खूप चांगलं काम केलं आहे. त्यामुळे दरवेळी वेशीवर उभं राहून उहापोह करून वापरण्याची मला आतापर्यंत गरज वाटली नाही.
मागील वर्षभरात करोनाचं संकट येऊनही हे महाविकास आघाडीचं सरकार डगमगलं नाही. करोनाचं संकट, नैसर्गिक आपत्ती यांचा योग्य पद्धतीने सामना या सरकारने केला आहे असंही उर्मिला मातोंडकर यांनी म्हटलं आहे.
महाविकास आघाडीने गेल्या वर्षात चांगलं काम केलं
गेल्या वर्षभरात महाविकास आघाडी सरकारकडून केल्या गेलेल्या कामाबाबत उर्मिला मातोंडकर यांनी वाच्यता केली. महाराष्ट्राच्या महाविकास आघाडीकडून गेल्या वर्षात चांगलं काम केलंय असं मुद्दाम उर्मिला यांनी नमूद केलं.
माझ्यावर शिवसेना पक्ष जॉईन करण्याची कोणतीही सक्ती नव्हती. मुळात मला काम करण्याची इच्छा आहे म्हणून मी आज शिवसेनेत पक्षप्रवेश केल्याचं उर्मिला मातोंडकर यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटलंय.