कोरोनाच्या महाभयंकर संकटात रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठा तुटवडा जाणवत आहे. त्याचा फायदा काही लोक घेऊन कोरोना रुग्णांच्या जीवाशी खेळत आहेत.
लखनऊ : कोरोनाच्या महाभयंकर संकटात ऑक्सिजन बरोबरच रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांच्या नातेवाईकांची मोठी फरफट होत आहे.
कोरोना रुग्णाला वाचवण्यासाठी नातेवाईक कितीही रुपयांमध्येही रेमडेसिवीर इंजेक्शन घेण्यास तयार आहेत. याच गोष्टीचा फायदा घेऊन काही नराधमांनी रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार सुरु केला आहे.
सर्वात धक्कादायक म्हणजे, उत्तर प्रदेशच्या लखनऊ शहरात त्याहीपेक्षा भयानक प्रकार समोर आला आहे. काही नराधमांनी 98 रुपयांच्या PPT 4.5 GM इंजेक्शनवर रेमडेसिवीरचं लेबल लाऊन 700 पेक्षा जास्त लोकांना 15 ते 20 हजार रुपयात विकल्याचं समोर आलं आहे.
दुसऱ्या इंजेक्शनला लेबल लावून विक्री
महाराष्ट्रात रेमडेसिवीर इंजेक्शनची किंमत जर हजार ते बाराशे रुपये केली असली तरी उत्तर प्रदेशात या इंजेक्शनची किंमत जवळपास 4800 रुपये इतकी आहे.
गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या वाढल्याने या इंजेक्शनची मागणी वाढली आहे. मात्र, या संकटात मदत करण्याऐवजी काही लोक या संकटात संधी साधून लोकांना प्रचंड लुबाडत आहेत.
कोरोना बधितांना लुबाडणे इतक्या खालच्या थरावर गेले आहे की रुग्णांचा कोणताही विचार न करताना दुसऱ्या इंजेक्शनला लेबल लावून ते हजारो रुपयांना विकून अनेकांचा जीव धोक्यात टाकला जात आहे.
पोलिसांकडून मोठा साठा जप्त
अखेर या प्रकरणी काळाबाजार करणाऱ्या काही लोकांना पकडण्यात लखनऊ पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी आरोपींकडून इंजेक्शनच्या 59 बाटल्या, PPT 4.5 GM चे 240 पॅकेट इंजेक्शन आणि रेमडेसिवीर इंजेक्शनचे 4,224 लेबल तसेच 85,840 रोख रक्कम जप्त केली आहे. तसेच पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे.
मोठे रॅकेट असावे
आरोपींना कोर्टात सादर केल्यानंतर त्यांना कारावासात पाठवले जात आहे. पोलीस आयुक्त डी. के. ठाकूर यांनी आरोपींसोबत बातचित केली तेव्हा काही महत्त्वपूर्ण माहिती देखील समोर आल्याचं सांगितलं जात आहे.
रेमडेसिवीर इंजेक्शनच्या काळाबाजारचे मोठे रॅकेटज असल्याची माहिती समोर येत आहे. पोलिसांचा सध्या याप्रकरणी तपास सुरु आहे.