गोरखपूर : कोरोना (COVID-19) च्या काळात सध्या अनेक शाळा बंद आहेत. त्यामुळे मुलांच्या शैक्षणिक भवितव्याच्या काळजीत असलेल्या पालकांनी त्यांना खासगी कोचिंग क्लासेसमध्ये पाठवण्यास सुरुवात केली आहे.
पालक मोठ्या विश्वासाने त्यांची मुलं खासगी क्लासेसमध्ये पाठवतात. मात्र, या क्लासेसमध्ये देखील विद्यार्थ्यांची मारहाण आणि शिक्षेतून सुटका झालेली नाही.
सात वर्षाच्या एका चिमुरडीला त्याचा नुकताच अनुभव आला. या चिमुरडीनं होमवर्क केला नाही म्हणून, तिला शिक्षिकेनं भयंकर शिक्षा केली आहे.
मुलांना खासगी कोचिंग क्लासेसमध्ये पाठवणाऱ्या प्रत्येक पालकांनी वाचली पाहिजे अशी ही घटना उत्तर प्रदेश मधील गोरखपूरमध्ये घडली आहे. गोरखपूरमधील एका शिक्षिकेवर विद्यार्थीनीचा हाताला भाजत्या तेलाचा चटका दिल्याचा आरोप आहे.
क्लासमध्ये दिलेला होमवर्क केला नाही इतकाच या चिमुरडीचा गुन्हा होता, अशी तक्रार मुलीच्या आईने पोलिसांमध्ये केली आहे. विशेष म्हणजे या प्रकरणातील आरोपी शिक्षिका देखील अल्पवयीन असून शाळेची विद्यार्थीनी आहे.
काय आहे प्रकरण?
गोरखपूरमधल्या बाजारा भागातल्या एका कुटुंबाने त्यांच्या सात वर्षांची मुलगी शेजारच्याच घरी ट्यूशनला जात असे. ट्युशनमधल्या शिक्षिकेने दिलेला होमवर्क केला नाही, म्हणून चिमुरडीच्या हाताला उकळत्या तेलाचे चटके दिले.
यावेळी उकळत्या तेलाचे शिंतोडे चिमुरडीच्या चेहऱ्यावरही पडले, त्यामुळे तिचा चेहराही भाजला असा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला. या कुटुंबीयांनी केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.
या प्रकरणातील आरोपी शिक्षिका देखील अल्पवयीन असल्याने पोलीस या गुन्ह्याचा अत्यंत काळजीपूर्वक तपास करत आहेत. आरोपीने ही अघोरी शिक्षा जाणीवपूर्वक दिली का? याचा तपास सुरु असल्याचं पोलिसांनी सांगितलं.