पुणे : मंत्र्याशी संबंधित आत्महत्या प्रकरणातल्या मुलीच्या लॅपटॉपमध्ये खळबळजनक व धक्कादायक माहिती असल्याचा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
संबंधित मंत्र्याचे नाव घेण्याचे टाळतानाच त्यांनी ही माहिती पोलिसांनी जाहीर करावी; अन्यथा दोन-तीन दिवसांमध्ये ती लोकांसमोर येईलच असे म्हटले आहे. गुरुवारी (दि.११) ते पुण्यात बोलत होते.
पुण्यात रविवारी एका २२ वर्षीय तरुण मुलीने आत्महत्या केली होती. या प्रकरणी महाविकास आघाडीतल्या विदर्भातील एका मंत्र्याचा थेट संबंध असल्याचा आरोप होतो. या मुलीची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे.
या संदर्भात पाटील म्हणाले की पोलिसांनी या तरुणीच्या जप्त केलेल्या लॅपटाॅप आणि मोबाईलमध्ये प्रचंड भयानक माहिती आहे.
हे संपूर्ण प्रकरण भयानक असून, यासंबंधी पोलिसांनीच ही माहिती जाहीर करावी, अशी मागणीही पाटील यांनी केली.
‘आगामी निवडणुकांत राष्ट्रवादी, सेना आणि काँग्रेससोबत जाण्याचा प्रश्न उद्भवत नाही. राहिला प्रश्न मनसेचा. त्यांनी त्यांची भूमिका बदलावी हे आम्ही यापूर्वीच स्पष्ट केले आहे. त्यांनी जर भूमिका बदलली तर त्यांना सोबत घेऊ, अन्यथा आम्ही एकटेच लढू,’असे पाटील म्हणाले.
धनंजय मुंडे यांचे प्रकरण देखील दाबले गेले असल्याचा दावा करत या आत्महत्या प्रकरणातली माहिती मात्र बाहेर येईलच.
ठाकरे-पवार सरकारमधल्या अनेक मंत्र्यांच्या बाबतीत वेगवेगळ्या गुन्ह्यांच्या तक्रारी आहेत, असे पाटील म्हणाले.
दरम्यान, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी पुण्यात स्वबळाचा नारा दिलेला असतानाच चंद्रकांत पाटील यांनी मात्र मनसेने भूमिका बदलली तर त्यांना सोबत घेऊ, असे वक्तव्य केले आहे.
दरम्यान, दोन्ही कॉंग्रेस आणि शिवसेना हे तीनही पक्षांनी भाजप सत्तेत येऊ नये यासाठी कंबर कसली आहे. हे पक्ष अधिकृतपणे एकत्र येणार नाहीत. मात्र सामंजस्याने एकत्रित निवडणूक लढवतील, असे पाटील म्हणाले.