धक्कादायक : प्राथमिक आरोग्य केंद्रात लाखो रुपयांची औषधी उघड्यावर जाळून टाकली !

216
निलंगा फोटो

लातूर : जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील अंबुलगा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या केळगाव प्राथमिक उपकेंद्रात अनेक गोळ्या औषधे उघड्यावर टाकून दिली तर काही जाळून टाकण्यात आली आहेत.

तर काही औषधी चक्क कचर्‍यात फेकण्यात आली असल्याचे धक्कादायक वास्तव गावकऱ्यांच्या निदर्शनास आले आहे. याबद्दल गावकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

जिल्ह्यातील ग्रामीण भागात सामान्य नागरिकांपर्यंत आरोग्य सुविधा पोहचवण्यासाठी सरकार कोट्यवधी रुपये खर्च करत आहे. लाखो रुपयांची औषधी पुरवठा करते, मात्र कर्मचाऱ्यांच्या उदासीनत्यामुळे त्याला उकिरड्यावर फेकावे लागत असल्याचे दिसून आले आहे.

अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना लाखों रुपयांचे पॅकेज देऊन ग्रामीण भागात सेवा देण्यासाठी नियुक्त्या दिल्या आहे. मात्र, आरोग्य विभागाची उदासिनता, वैद्यकीय अधिकाऱ्यांची अनास्था आणि कर्मचाऱ्यांची चालढकल वृत्ती यामुळे आजही ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सेवा सुरळीत व दर्जेदार मिळत नसल्याचे निराशाजनक चित्र पहायला मिळते.

निलंगा तालुक्यातील अंबुलगा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत केळगाव प्राथमिक उपकेंद्र चालते परंतु कोरोनाच्या भयानक परिस्थिती मध्ये मागील दोन महिन्यापासून येथील आरोग्य केंद्र कुलूप बंद आहे.

कोणताही अधिकारी याठिकाणी फिरकत नाही. नागरिकांच्या प्राथमिक आजारांच्या समस्या दूर व्हाव्यात यासाठी शासन स्तरावर लाखो रूपये खर्च करून औषध पुरवठा केला जात आहे. मात्र अधिकारी रुग्णांना औषधी बाहेरून आणायला सांगतात. त्याचा फटका रुग्णांना बसत असतो.

दुसरीकडे मात्र केळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ही औषधी व गोळ्या कचऱ्यात फेकून देत असल्याचे उघडकीस आले आहे. तसेच या उपकेंद्रात अनेक औषध गोळ्या जाळून टाकण्यात आल्या आहेत तर काही कचर्‍यात फेकण्यात आल्या असल्याचे धक्कादायक वास्तव गावकऱ्यांच्या निदर्शनास आले आहे.

या प्रकरणात जाब विचारला असता अधिकाऱ्यांनी एक्सपायरी झालेली मुदबाह्य औषधी असल्याचे सांगितले आहे. या औषधीमध्ये शक्तिवर्धक औषधी सोबत इतर आजारावर वापरली जाणारी महागडी औषधी आहेत, ही औषधी उकिरड्यावर टाकली पण रुग्णांना दिली नाहीत, त्याबद्दल नागरिक संतप्त झाले आहेत.

वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या उदासीन वागण्यामुळे आरोग्य यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. सध्या सर्वत्र संचारबंदी सुरू आहे. ग्रामीण भागामध्ये स्थानिक पातळीवर नागरिकांना मूलभूत आरोग्य सुविधा उपलब्ध होण्यासाठी मोठ्या प्रमाणात शासनाकडून वैद्यकीय सामुग्री व औषध गोळ्यांचे वितरण करण्यात येते.

परंतु या महामारीच्या काळामध्ये मागील दोन महिन्यापासून प्राथमिक आरोग्य केंद्र केळगावला टाळे असल्यामुळे गावातील नागरिकांना उपचासाठी निलंगा किंवा लातूरला जावे लागत आहे.

सध्या गावोगावी करोनाच्या भीतीचे वातावरण आहे. अशा वातावरणात आरोग्याची काळजी घेणारे वैद्यकीय अधिकारी नसतील तर ते आरोग्य केंद्र काय कामाचे ? असा सवाल सामान्य जनतेतून केला जात आहे.

आता या सर्व प्रकाराला जबाबदार कोण? यावर लक्ष देवून वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी केळगाव येथील ग्रामस्थांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here