बीड : बीड तालुक्यातील रामनगर येथे ही घटना घडल्यानंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे.
‘तू माझ्याशी का बोलत नाहीस’ असे विचारत 23 वर्षीय तरुणाने एका अल्पवयीन मुलीवर तिच्या घरात जाऊन थेट तलवारीने वार केल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
तलवारीच्या हल्ल्यात अल्पवयीन मुलगी गंभीर जखमी झाली आहे.
तिच्यावर बीडच्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.
न्यायालयाने पाच तारखेपर्यंत पोलीस कस्टडी सुनावली आहे.
30 डिसेंबरला संध्याकाळच्या सुमारास आरोपी पोपट बोबडे हा रामनगर येथील पीडित मुलीच्या घराजवळ गेला होता.
मुलगी किराणा दुकानात साहित्य आणण्यासाठी गेली होती.
त्याच ठिकाणी दबा धरून बसलेला आरोपी पोपट बोबडे याने मुलीला अडविण्याचा प्रयत्न केला.
मात्र मुलगी घाबरलेल्या अवस्थेत धावत घरी पोहोचली.
आरोपीने घरात जाऊन माझ्याशी का बोलत नाहीस म्हणून तिच्यावर तलवारीने हल्ला चढविला.
त्याने थेट मानेवर वार करण्याचा प्रयत्न केला.
मुलीने वार चुकविल्यामुळे तिच्या हाताला गंभीर दुखापत झाली.
हल्ल्यानंतर आरोपी पोपट बोबडे हा फरार झाला होता.
दरम्यान मुलीवर बीडच्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.
बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांनी पीडित मुलीची विचारपूस करून गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांचं एक पथक आरोपीच्या शोधासाठी रवाना करून आरोपीला सध्या बेड्या ठोकल्यात.
पुढील तपास बीड ग्रामीण पोलीस करीत आहेत.