मग, अब्दुल सत्तार बोलले ते खरंय का? मनसेचा मुख्यमंत्र्याना सवाल

234

मुंबई : महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी अशी ओळख असलेल्या औरंगाबाद शहराचं नामांतर करुन या शहराला ‘संभाजीनगर’ हे नाव देण्याची शिवसेनेची आग्रही मागणी राहिलेली आहे.

औरंगाबादचे नाव ‘संभाजीनगर’ ठेवण्यात यावे, ही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती. आता उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री आहेत, त्यांनी शिवसेना प्रमुखांची इच्छा पूर्ण करावी.

मात्र, गेल्या 5 वर्षे शिवसेना सत्तेत असतानाही आणि विशेष म्हणजे गेल्या वर्षभरापासून शिवसेना पक्षप्रमुख हेच राज्याचे मुख्यमंत्री असतानाही औरंगाबादचे संभाजीनगर झाले नाही.

मात्र, या नावबदलासाठी हलचाली सुरू असल्याचे वृत्त माध्यमांत झळकले. त्यानंतर, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी, आमचा त्यास विरोध असल्याचं ठामपणे सांगितलं.

त्यावरुन चांगलच राजकारण होत आहे. आता, मनसेनं शिवसेनेला संभाजीनगर नावावरुन कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी अब्दुल सत्तर यांच्या वक्तव्याचा हवाला दिला आहे.

उद्धव ठाकरे यांनी दबावाला बळी न पडता औरंगाबादचे संभाजीनगर नामकरण लवकर करावे, अशी मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी केलीय.

संभाजीनगर हे नामकरण करण्याचा निर्णय कोणाच्याही दबावाला बळी न पडता घ्यावा, असे राजू पाटील यांनी म्हटलंय. तसेच, बाळा नांदगावकर यांनीही मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारत अब्दुल सत्तार यांच्यासंदर्भातील बातमीचा दाखला दिला आहे.

नांदगावकर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन ही बातमी शेअर केली असून सत्तार बोलतात ते खरंय का? असा प्रश्न केला आहे.

उद्धव ठाकरेंनीच मला औरंगाबाद म्हणण्याची मुभा दिली, असे अब्दुल सत्तार यांनी म्हटले आहे. यासंदर्भातील एक बातमीचे कात्रण आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी शेअर केले आहे.

या बातमीसह औरंगाबादच्या नामांतरणावरुन नांदगावकर यांनी मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला आहे. ”संभाजीनगर हेच नामकरण झाले पाहिजे, श्रेय केंद्र अथवा राज्य सरकार कोणीही घ्यावे.

सेनेला केवळ एवढे विचारावे वाटते की तुमचे मंत्री अब्दुल सत्तार खरे बोलले कि खोटे? सोबत जोडलेला फोटो बरेच काही सांगून जात आहे. माननीय बाळासाहेबांचा शब्द व स्वप्न पूर्ण करावे.”, असेही नांदगावकर यांनी म्हटले आहे.

संजय राऊत म्हणतात

राऊत यांनी औरंगाबादच्या संभाजीनगर या नामांतराच्या विषयावर भाष्य केलं. “महाविकास आघाडीमध्ये नामांतरावरून कोणतेही मतभेद नाहीत.

बाळासाहेब थोरात असतील, अशोक चव्हाण किंवा अन्य कोणी महाराष्ट्रातील नेते आहेत त्यांचं औरंगजेबापेक्षा छत्रपती संभाजी राजे यांच्यावरच प्रेम आणि श्रद्धा आहे.

प्रत्येक व्यक्तीची, हिंदूंची छत्रपती संभाजी महाराजांवर श्रद्धा असायला हवी. जसा बाबर आमचा कोणी लागत नाही तसा औरंगजेबही लागत नाही. दिल्लीतील काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी राम मंदिर उभारण्याची परवानगी दिली आहे.

कारण, या भूमीचं जसं बाबरशी नातं नाही तसंच औरंगजेबाशीही नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे नेते एकत्र बसून यासंदर्भात चर्चा करुन निर्णय घेतील, असेही राऊत यांनी सांगितलं.

शिवसेना मंत्र्यांकडून संभाजीनगर असा उल्लेख

शिवसेना नेत्यांकडून औरंगाबादचा उल्लेख नेहमीच संभाजीनगर असाच केला जातो. विशेष म्हणजे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनीही आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक बातमी शेअर करताना औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा केला होता.

तर, उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनीही आपल्या पत्रावर औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर केला होता. त्यामुळे, सरकारकडून औरंगाबादचे नामकरण करुन संभाजीनगर हे नवीन नाव ठेवण्याच्या हालचाली होत असल्याचं चर्चा होती. यासंदर्भात बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली आहे.

काँग्रेसची भूमिका स्पष्ट

महाविकास आघाडीमध्ये कॉमन मिनिमम प्रोग्राम ठरलेला आहे, त्यामुळे जेव्हा नाव बदलासंदर्भात प्रस्ताव येईल, तेव्हा आमचा विरोध राहिल. पण, अद्याप तसा कुठलाही प्रस्ताव समोर नसल्याचंही थोरात यांनी स्पष्ट केलंय.

महाविकास आघाडीत काँग्रेस म्हणून आम्ही घटक पक्ष आहे, पण नामांतराला आमचा विरोध राहिल, असे थोरात यांनी स्पष्टपणे सांगितलंय.

आम्हाला सत्तासुद्धा दुय्यम ठरते, राज्यघटनेची शपथ घेऊन आम्ही सत्तेत आलोय. त्यामुळे, त्या शपथेची प्रताडना होईल, अशी कुठलीही गोष्ट आम्हाला मान्य होणार नाही.

महाविकास आघाडीही त्याचा आधारावर निर्माण झालेली आहे. सामाजिक मतभेदाला आमच्याकडे स्थान नाही, असे म्हणत संभाजीनगर या नामांतरणाला आमचा विरोध राहिल, असे बाळासाहेब ठाकरेंनी ठामपणे सांगितंलय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here