अनैतिक संबंधात ‘मुलगा’ ठरला अडसर | आई व तिच्या प्रियकराने काटा काढण्यात ठेवली नाही ‘कसर’

238

टेंभुर्णी (जि. सोलापूर) : २५ डिसेंबरला सकाळीच परितेवाडीचे पोलिस पाटील बिंदास हराळे यांना गावातील एका शेतातील चारीत एका युवकाचा मृतदेह असल्याची माहिती काही ग्रामस्थांनी दिली.

माहिती मिळताच हराळे घटनास्थळी पोहोचले. हा मृतदेह अर्धवट जळाला होता आणि डोक्यात वार केल्याचेही दिसत होते.

हराळे यांनी तातडीने पोलिस ठाण्यात वर्दी दिली. खुनाची घटना असल्याचे आतापर्यंत स्पष्टच दिसत होतं.

टेंभुर्णीचे साहाय्यक पोलिस निरीक्षक अमित शितोळे, सपोनि सुशील भोसले यांनी पोलिस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली.

परितेवाडी गाव तसं लहान आहे. गावाच्या शिवारात माळरानावर चारीत युवकाचा मृतदेह आहे, ही बातमी वाऱ्यासारखी गावभर पसरली होती आणि घटनास्थळी गर्दीही जमली होती.

गर्दीतील एकाने हा मृतदेह सिद्धेश्वर सुभाष जाधव याचा असल्याची माहिती दिली.

खुनाची घटना असल्याने उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. विशाल हिरे यांनीही भेट दिली.

मृतदेहाची ओळख पटल्यानंतर पोलिसांचे पुढचे काम सुरु होते. खुन्यांचा तपास घेणे.

सिद्धेश्वर जाधवचे वय २२ होते. गावातही त्याच्यासंदर्भात संशयास्पद माहिती काहीच मिळाली नाही.

सिद्धेश्वरशी कुणाचे काही वैर आहे का याचीही पडताळणी पोलिस करत होते, पण तसे काही निष्पन्न होत नव्हते.

ही चौकशी एकीकडे सुरू असतानाच पोलिसांचे एक पथक सिद्धेश्वरच्या घरी पोहोचले.

सिद्धेश्वरची आई मुक्ताबाईला मुलाच्या खुनाबद्दल माहिती मिळाली होती.

ती शोक करत घरी बसली होती. तिने रडतच गावातील काही लोकांबद्दल संशय बोलून दाखवला.

हा प्रकार सुरू असताना केंद्रे यांच्या नजरेत काही बाबी संशयास्पद वाटल्या.

मुक्ताबाई यांच्या घरातील अंगणातच काही जळालेले कपडे पडले होते आणि अंगणातील काही भाग शेणाने सारवलेला होता. केंद्रेच्या नजरेतून हा प्रकार सुटला नाही.

अंगण अर्धवट का सारवले असावे असा प्रश्न त्यांना पडला होता आणि जळालेले कपडे त्यांना तपासाची दिशा दाखवत होते.

पोलिस निरीक्षक राजकुमार केंद्रे, सपोनि अमित शितोळे यांनी गावात चौकशी सुरू केली असता मुक्ताबाई सुभाष जाधव (४५) आणि त्यांचा शेजारी तात्या महादेव कदम (३५) यांच्यात अनैतिक संबंध असल्याचे व त्यातून मुलगा सिद्धेश्वर बरोबर दोघांचा वादही होत होता अशी माहिती त्यांना मिळाली होती.

या माहितीच्या आधारे पोलिसांनी मुक्ताबाई हिला ताब्यात घेतले.

या दरम्यान भूमिगत राहून घडामोडीवर लक्ष ठेवून असलेला तात्या कदम फरार झाला.

इकडे मुक्ताबाई पोलिसांना चकवा देत वेगवेगळी माहिती व उडवाउडवीची उत्तरे देत होती.

तोपर्यंत पोलिसांनी सायबर प्रणालीच्या माध्यमातून तात्याला शोधून अटक केली.

पोलिसी खाक्या दाखवताच त्यांने व मुक्ताबाईने गुन्हा केल्याचे मान्य केले.

तात्याला अटक झाली असून त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली असल्याचे मुक्ताबाईस सांगताच तिचे अवसान गळाले. यामुळे सिद्धेश्वरचा खून केल्याचे तिनेही कबूल केले.

मुक्ताबाईंचा नवरा बेपत्ता

मुक्ताबाईंचा नवरा सुभाष व्यसनी होता. त्यातून गेली अनेक दिवस तो बेपत्ता आहे.

त्यातून घरातील अडीअडचणी आणि शेतातील काही कामांनिमित्ताने तात्या कदमची उठबस होती.

त्यातून दोघांत अनैतिक संबंध निर्माण झाले होते. यातून वादवादी होत असल्याने व मुलांना त्या दोघांचे संबंध मान्य नसल्याने मुक्ताबाईंच्या लहान मुलाने घरी येणे सोडून दिले होते.

सिद्धेश्वर हाही मिळेल तिथे काम करायचा आणि तिकडेच राहायचा. मात्र घरी असल्यास त्याचे आईबरोबर सारखे खटके उडायचे.

अनैतिक संबंधात ठरला अडसर

अनैतिक संबंधास सिद्धेश्वर अडचण ठरत होता. तो सतत वडिलांची चौकशी करायचा.

तसेच अलीकडे तर तो काय झाले ते सांग नाहीतर पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार करीन अशी धमकी देत होता.

त्यातून त्यांनी २४ डिसेंबरला मध्यरात्रीच्या सुमारास सिद्धेश्वरच्या डोक्यात दगड घालून, दांडक्याने मारून त्याचा निर्घृणपणे खून केला.

त्याचा मृतदेह माळरानावर त्यांच्या पांघरुणात गुंडाळून काठीस बांधून नेऊन टाकला.

अंगणातील रक्ताचा सडा शेणाने सारवला

अंगणातील रक्ताचा सडा शेणाने सारवला होता. तसेच रक्ताने भरलेली बेडशीट, चादर व अंगावरील कपडे जाळून टाकली होती.

पण अखेरीस या सारवलेल्या शेणाने आणि अर्धवट जळालेल्या बेडशीटने हा खून उघडकीस आणला.

तपास पथक

पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते, अपर पोलिस अधिक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक राजकुमार केंद्रे, सपोनि अमित शितोळे, सपोनि सुशील भोसले यांनी आरोपींना अटक करण्यात व तपास कामात महत्वाची भूमिका पार पाडली.

तपास कामी एएसआय अशोक बाबर, पोहेकॉ संजय भानवसे, पोहेकॉ सलीम पठाण, पोहेकॉ बिरुदेव हजारे, पोकॉ अजित उबाळे, पोकॉ धनाजी शेळके, पोकॉ चेतन पवार, पोकॉ झोळ आदींनी मदत केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here