सोयाबीन बॅगचे दर वाढल्याने शेतकरी आर्थिक संकटात

367

लातूर : जिल्ह्यातील शेतकरी या वर्षी कोणते पीक घ्यावे या विवंचनेत आहेत. कारण या परिसरात सिंचनाची सोय नसल्याने पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणारी पिके घ्यावी लागतात.

मागच्या वर्षी या परिसरात सोयाबीनचा पेरा मोठ्या प्रमाणात वाढला होता. सोयाबीन कापणी व काढणीच्या वेळेस झालेल्या पावसामुळे शेतातील सोयाबीन पीक हे खराब झाले होते.

त्यामुळे शेतकऱ्यांना साडेतीन हजार ते चार हजाराच्या दराने सोयाबीन विकावे लागले होते. शेतकरी दरवर्षी पुढच्या हंगामात लागणारे बियाणे शिल्लक ठेऊन उरलेले सोयाबीन विकत असतो.

मात्र सोयाबीनचा दर्जा खराब झाल्याने शेतकऱ्यांना पेरणीसाठी लागणारी घरचे बियाणे ठेवता आले नाही. त्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांना विकतचे बियाणे घेऊन पेरणी करावी लागणार आहे.

सध्या पेरणीचे दिवस जवळ आल्याने बाजारात बियाणे विक्रीसाठी आले आहे. प्रति बॅग सोयाबिनचे दर तीन हजार पाचशे ते तीन हजार सहाशे रुपये आहेत. शेतकऱ्यांना प्रति बॅग सोयाबिनचे उत्पादन घेण्यासाठी 15 ते 16 हजार रुपयांचा खर्च येतो.

सोयाबीन बॅग 3,600 रुपये, खत बाराशे रुपये, फवारणी खर्च दोन हजार, निंदणी खर्च चार हजार रुपये, कापणी खर्च अडीच हजार रुपये सोयाबीन मळणी यंत्र दोन हजार रुपये अशी एकूण पंधरा ते सोळा हजाराचा खर्च येत असतो.

लातूर जिल्ह्यात गेल्यावर्षी प्रति क्विंटल दोन ते तीन क्विंटलचा उतारा आल्याने शेतकऱ्याचे खूप मोठे नुकसान झाले होते. या वर्षी सोयाबीनच्या बॅगचे दर वाढल्याने कोणती पिके घ्यावी या विवंचनेत शेतकरी आहेत.

शेतकऱ्यांकडे पैसा नाही. लॉकडाऊनमुळे उधार उसनवारी कोणी देत नाही. घरात विकायला माल नाही. आडत व्यापारी आता आधीप्रमाणे उचल देत नाही. या सर्व संकटावर मात करून पेरणी करण्याचे आव्हान शेतकऱ्यांच्या पुढे उभे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here